रॉबर्ट हा पझलचा उत्तम आणि श्रीमंत खेळाडू असतो. त्याची बायको त्याची पार्टनर असते. मात्र, ती त्याला सोडून गेल्याने त्याला आता पझल पार्टनर हवा असतो. अग्नेस खरंच चांगलं खेळू शकते का हे रॉबर्ट तपासून पाहतो. यात अग्नेस 'बेस्ट' असल्याचं त्याच्या लक्षात येत. तो तिला पार्टनर होण्याची ऑफर देतो. एक महिन्यानंतर स्पर्धा असल्याने आठवड्यातून दोनदा सरावासाठी भेटावे लागणार असतं. मात्र, यासाठी घरातून परवानगी मिळणार नसल्याने ती मावशीच्या अपघाताचं कारण पुढे करीत तिच्या सेवेसाठी आठवड्यातून दोनदा जावे लागणार असल्याचे नवऱ्याला सांगते. या निमित्ताने ती पझलच्या सरावासाठी जाणार असते. मात्र, यालाही तिचा नवरा लुर्इ परवानगी देत नाही. असे असतानाही ती रॉबर्टकडे पझल सरावासाठी जाऊ लागते.
पझलमुळे तिला आपण वेगळं आणि आपल्या आवडीचं काही करू शकतो, याचा आत्मविश्वास आलेला असतो. त्यातच रॉबर्टच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव तिचावर पडल्याने ती त्याच्याकडे आकर्षित झालेली असते. तिच्या बाहेर जाण्याने नाराज झालेला अग्नेसचा नवरा लुर्इ तिच्याशी भांडण करतो. त्यानंतर एके दिवशी ती नवऱ्याला पझल गेमबद्दल सांगते. त्यावर नवरा तिच्यावर नाराज होतो. एखादी आर्इ आपल्या आवडीसाठी दैनंदिन काम बाजूला ठेवू लागली तर घरात काय होर्इल, तेच अग्नेसच्या घरात घडू लागतं. अग्नेसचा लहान मुलगा जिग्गी कुकिंगमध्ये करिअर करू इच्छित असतो, यासाठी नवऱ्याचा विरोध न जुमानता ती मुलाला पाठिंबा देते. आपल्या मर्जीशिवाय वागू लागल्याचा राग नवरा लुर्इमध्ये वाढत असतो. त्यांच्यात कडाक्याचं भांडण होतं. एकीकडे दुरावत चालेला नवरा आणि जवळ येत असलेला रॉबर्ट अशा वेगळ्या पझलमध्ये अग्नेस स्वत:ला शोधू लागते. दरम्यान, लुर्इला अग्नेसच्या बदलाची चाहूल लागते. तेव्हा अग्नेस त्याला सर्वकाही खरंखरं सांगून टाकते. लुर्इ दुखावतो आणि नाराज होऊ निघून जातो.
स्पर्धेच्या पात्रता फेरीचा दिवस येतो. पात्रता फेरी सुरू होते तेव्हा रॉबर्ट अग्नेसला त्याच्या पद्धतीने पझल सोडवायला सांगतो. मात्र, ती त्याचं ऐकत नाही. अग्नेस तिच्या पद्धतीने पझल सोडविते आणि दोघे जिंकतात. त्यानंतर त्यांना परदेशात स्पर्धेसाठी जायचं असतं. मात्र, अग्नेस स्पर्धेला येणार नसल्याचे सांगते. यावेळी रॉबर्ट तिच्यावर प्रेम करीत असल्याचेही सांगतो. मात्र, अग्नेसच्या लक्षात येते की, लग्नाआधी वडिलांचं ऐकावं लागलं, लग्नानंतर पतीचं आणि आता रॉबर्टचं ऐकावं लागणार. पुन्हा त्याच गर्तेत अडकण्यापेक्षा आपल्याला मनासारखं जगायचं असल्याचं मनाशी निश्चित करते. यासाठी अग्नेस सर्वकाही सोडून हातात एक बॅग घेतलेली एका रेल्वे स्टेशनवर आपल्या स्वातंत्र्याच्या शोधात एकटीच निघते.
अग्नेसनं जे केलं ते योग्य होतं का? संसाराच्या रगाड्यात अडकलेल्या अग्नेसला आतातरी तिचा मार्ग सापडेल का? तिच्या मुलांचं नवऱ्याचं काय झालं असेल? रॉबर्टचं काय झालं असेल? आणि महत्त्वाचं म्हणजे अग्नेस आपल्या मनाप्रमाणे जगतं असेल का? अशा अनेक प्रश्नांच पझल आपल्या मनात चित्रपट पाहताना तयार होतं. दररोजच्या जबाबदाऱ्यात अडकलेल्या बार्इनं आपल्या आवडीनिवडीही जपल्या पाहिजेत आणि कुटुंबाने त्यासाठी तिला सपोर्टही केला पाहिजे का? याचं उत्तर आपल्या प्रत्येकाकडे आहे, फक्त गरज आहे ती ते व्यक्त करून त्यापद्धतीने जगण्याची.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट