Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

...तर काही तरी चुकतंय

$
0
0

करुणा पुरी

बाई म्हणून स्त्रीला काही शारीरिक निसर्गदत्त देणग्या मिळाल्या आहेत. त्यांचा सौंदर्याशी संबंध आहे, की नाही हा आज वादातीत मुद्दा असला, तरी त्या देणग्यांचा आदर ठेवणे, त्याची योग्य ती निगा राखणे, स्वच्छता-ठेवण यांच्या बाबतीत खबरदारी पाळण्याची जबाबदारी ही पूर्णत: बाईचीच. 'इनर्स' विशेषत: ब्रा घालायची, की नाही यावरून सध्या सोशल मीडियावर गदारोळ उठलाय. कुणाला ब्रा घालून 'कम्फर्ट' मिळतो, तर कुणाला न घालता... कुणी घरात न घालता राहत असेल, तर कुणी त्याचे बंधन न पाळता बाहेर तसेच वावरत असेल... अर्थात हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. मुळात ब्रेसिअर या 'कम्फर्ट'साठी असतात; मात्र ती घालून अस्वस्थ वाटत असेल, तर तुमचे काही तरी चुकते आहे. एक तर, तुम्ही निवडलेले माप चुकीचे आहे किंवा कापड; त्यामुळे ब्रा घालायची की नाही हा मुद्दा सामाजिक, नजरा/दृष्टिकोन बदलण्याच्या अपेक्षेपेक्षा आरोग्य व ड्रेसकोडच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा वाटतो.

पूर्वी कुठे बायका ब्रा घालायच्या? पण तेव्हा त्या घरात असायच्या आणि ब्लाउजमध्ये पदराआड ब्रेसिअर असो अथवा नसो, त्यांना फार फरक पडत नव्हता. आजही अनेक जणी साडी नेसल्यावर ब्रेसिअर न घालायला पसंती देतात. आज मात्र स्त्री नोकरी-व्यवसाय किंवा इतर कामासाठी बाहेर पडते आहे, तेव्हा पेहरावाच्या काही प्राथमिक निकषांमध्ये नीटनेटकेपणा हा आपसूकच येतो आणि हा नीटनेटकेपणा 'इनर्स' विशेषत: ब्राबाबतही लागू होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ते घालून आत्मविश्वास वाढतो, देहबोली चांगली राहते. प्रत्येकीने हे स्वत:लाच विचारले, तर उत्तर मिळेल. सध्या उपस्थित असलेल्या चर्चेमध्ये, ब्रा आणि कम्फर्ट, ती का घालायची, त्याचा आरोग्याशी काही संबंध आहे का, काय बिघडते न घातल्याने, गावात कुठे बायका काही वापरतात, अवस्थ वाटते तर का ब्रा घालायची... असे अनेक प्रश्न उपस्थित होताहेत... पुन्हा याची उत्तरे स्त्रीगणिक बदलतील.

आपल्याकडे फॅशन विश्वामध्ये 'लाँजेरी' या विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर वर्षी यामध्ये करोडो रुपयांमध्ये उलाढाल होते, तरीही 'इनर वेअर' निवडीबाबत आपल्याकडे प्रचंड अज्ञान आहे. अनेकींना आपला नेमका 'साइज' कोणता हे माहीत नसते. 'वयाच्या ४२व्या वर्षी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला मी योग्य मापाची ब्रा खरेदी करून दिली आणि ती घातल्यानंतर तिला कम्फर्ट म्हणजे काय हे नव्याने कळले,' असा अनुभव माझ्याच एका सहकारीने या निमित्ताने सांगितला. केवळ 'स्मॉल', 'मीडियम', 'लार्ज' या तीनच साइज अनेकींना परिचित असतात. मात्र, बेल्ट साइज आणि कप साइज हा वेगळा असतो, तो नक्की ओळखायचा कसा आणि योग्य मापाची ब्रा कुठून खरेदी करायची, याबाबत अनेकींमध्ये अक्षरश: अज्ञान आहे. यामध्ये ब्रँड हा मुद्दा नाही, तर 'कम्फर्ट' महत्त्वाचा. किती आयांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलीला योग्य 'इनर्स' निवडीबाबत साक्षर केले आहे? किती जणींनी ब्रेस्ट मसाजच्या तंत्राबाबत सांगितले आहे? सुरुवातीला, आया आपल्या मुलींना तीन साइजपैकी एक साइज सर्रास घेऊन देतात. किंवा, मुलगी स्वत:च इंटरनेटच्या मदतीने किंवा मैत्रिणीच्या सांगण्यावरून स्वत:हून खरेदी करते. यातही पॅडेड घेण्याकडे त्यांचा कल जास्त. ब्रा घालायची असते म्हणूनच अनेक जणी घालतात. त्यामागचे शास्त्रीय कारण कोण समजून घेते? अनेक आया याबाबत अज्ञानी असतात; त्यामुळे वयात येणाऱ्या आपल्या मुलीला योग्य मार्गदर्शन कसे करणार?

स्तनामध्ये स्नायू नाही, तर टिश्यू असतात. हे नाजूक असतात. त्यांना योग्य 'सपोर्ट', 'होल्ड' दिला, तर त्यांची वाढ व्यवस्थित होते, खांद्यावरचा भार कमी होऊन देहबोलीमध्ये एक प्रकारचे स्थैर्य येते. देहबोली सुधारते, समोरचा भाग ओघळलेला दिसत नाही. हा 'सपोर्ट' योग्य मापाची ब्रेसिअर घातल्यानंतर मिळतो. घातलेला पेहरावही चांगला दिसतो. अन्यथा, पाठ आणि खांद्याचे दुखणे संभावण्याची शक्यता असते. कॉश्च्युम डिझायनर व अभिनेत्री संयोगिता भावे हा मुद्दा अधोरेखित करतात. 'योग्य 'इनर्स' घालणे 'कम्फर्ट'साठी महत्त्वाचे आहे. ब्रेस्टला योग्य मापाच्या ब्रामुळे 'सपोर्ट' मिळतो. सुरक्षा म्हणूनही ब्रा वापरली जाते. घरात कसेही राहिले, वावरले तरी चालते. मात्र, जेव्हा तुम्ही 'कम्युनिटी'मध्ये वावरता, त्या वेळी काही नियम पाळावे लागतात. मुळात 'ब्रा फिटिंग'विषयी माहितीच नाही आपल्याकडे. कोणत्याही कपड्यांवर कोणतीही साइज, प्रकार घातला जातो. हे 'इनर्स' सहा महिन्यांनी बाद करायचे असतात; पण तेही गांभीर्याने घेतले जात नाही. हे 'इंटिंमेट गारमेंट' असतात, त्यांचा थेट संबंध स्वच्छतेशी येत असल्याने ते वेळोवेळी बदलायला हवेत. 'आतच घालायचे आहेत', 'कुणाला दिसणार आहेत,' 'कोण बघणार आहे,' असा दृष्टिकोन आहे. 'इनर्स' म्हणजे फक्त ब्राच नाही, तर पँटी, पेटिकोटच्या योग्य निवडीबाबतही काणाडोळाच केला जातो. ब्रेसिअर घालायची, की नाही हा जिचा तिचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी स्वत:ला नीटनेटके 'प्रेझेंट' करताना पाळायचा तो एक किमान 'नॉर्म' आहे. ती फॅशन नाही, तर गरज आहे. ब्रा घातली नाही, ब्रेस्ट ओघळलेले दिसण्याची प्रक्रिया लवकर होऊ लागते. तरुण वयात स्ट्रेचमार्क दिसू लागतात. परदेशात 'इनर्स' वापरण्याचा ट्रेंड नाही; पण याचा नंतर परिणाम त्यांना भोगावाच लागतो. ब्रा घातली पाहिजे हे काही समाजाने सांगितलेले नाही, तो तुमचा 'कम्फर्ट' आहे आणि तो योग्य मापानेच मिळतो,' असे संयोगिता सांगतात.

'इनर्स' घालणे हा सामाजिक, स्त्रीमुक्ती किंवा केवळ फॅशनचा हा मुद्दा नाही, असे प्रसिद्ध यू-ट्यूबर ऊर्मिला निंबाळकरचे मत आहे. योग्य ब्रा साइज (बेल्ट साइज व कप साइज) कसा निवडायचा या बाबत व्हिडिओ मध्यंतरी ऊर्मिलाने यू-ट्यूब चॅनेलवर पोस्ट केला होता. ती सांगते, की ब्रा घालणे, न घालणे हा 'सोशल' वाद असू शकत नाही, तर ती घालण्यामागे शास्त्रीय, वैद्यकीय कारणे आहेत. ब्रेस्ट हे टिश्यूंपासून बनलेले असतात. हे टिश्यू एकमेकांवर आदळून ईजा होण्याची शक्यता असते. ही ईजा होऊ नये आणि ते सैल पडू नयेत म्हणून ब्रामुळे 'सपोर्ट' मिळतो. गरोदरपणातही ब्रेसिअर घालण्याबाबत संभ्रम आहे. गरोदरकाळात छातीचा आकार वाढायला सुरुवात होते. खरे तर, तिथूनच गरोदर स्त्रीच्या शरीरात बदल व्हायला सुरुवात होते. ही अतिशय नैसर्गिक आणि सुंदर प्रक्रिया आहे. संप्रेरकांमधील बदल आणि दुधाच्या निर्मितीसाठी स्तन वेगाने वाढू लागतात. त्यांना मापात असलेल्या ब्रामुळेच सपोर्ट मिळतो.

या ठिकाणी, 'फ्री निप्पल मूव्हमेंट'चा उल्लेख करावा लागेल. या चळवळीची रुजवात ही पाश्चात्य देशांत झाली. तिथून ती आपल्याकडे येते आहे; पण तेथील स्त्रियांच्या शरीररचनेत भौगोलिकता, अनुवंशिकता आणि जनुकीय गुणधर्मांमुळे भारतीय स्त्रियांच्या तुलनेत वेगळेपण असते. तिथल्या स्त्री शरीररचनेत 'कर्व्हज्' अभावानेच असतात; म्हणून कदाचित ते 'मेंटेंन' ठेवण्यासाठी त्यांना ब्रेसिअरची फारशी गरज कदाचित पडत नसावी. भारतीय स्त्रीला हे 'कर्व्हज्' लाभल्याने ते 'मेंटेन' राहण्यासाठी अंतर्वस्त्र महत्त्वाचे ठरतात. अर्थात ही गोष्ट सौंदर्याशी नाही, तर आरोग्याच्या प्राथमिक गरजेशी संबंधित आहे. ब्रा घालणे किंवा न घालणे, हा व्यक्तिगत प्रश्न असला, तरी ती घालणे हे वैद्यकीयदृष्ट्या फायद्याचे आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी ब्रेसिअर घालणे हा वेगळा व वैयक्तिक मुद्दा असला, तरी ब्रा घालण्याचा मुख्य हेतू हा स्त्रीला आरामदायी वाटणे हाच असतो. योग्य मापाची ब्रेसिअर घालण्याचे वैद्यकीय फायदे नक्कीच आहेत. हे फायदे समजून घेण्यासाठी स्तनांची रचना कशी असते हे पाहायला हवे. स्तनांमध्ये ग्रंथी, चरबी व तंतूमय टिश्यू (उतक) असतात. याशिवाय, रक्तवाहिन्या, नसा व लसिकाही असतात. जेव्हा स्तनांचा आकार वाढतो, तेव्हा त्याला बाहेरून सपोर्ट देण्याची गरज असते. अन्यथा स्तन ओघळणे, स्तन, पाठीत, खांद्यात दुखणे यांसारखे त्रास होऊ शकतात. हे टाळण्यासाठी योग्य मापाची ब्रेसिअर घालायला हवी. गरोदरपणात व स्तनपान करताना ब्रेसिअर घालण्याचा सल्ला आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ आवर्जून देतो. ब्रेस्टमध्ये स्नायू नसल्याने त्यांच्या 'अपलिफ्टमेंट'साठी व्यायाम लागू पडत नाही. तिथे 'सपोर्टिंग ब्रेसिअर' उपयोगात येते. ब्रेसिअर घातली नाही किंवा ती चुकीच्या मापाची घालती, की बाकीच्या अवयवांवर ताण येतो. ती घट्ट असल्यास रक्ताभिसरणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. झोपताना ब्रेसिअर घालती नाही, तरी चालते; कारण त्या अवस्थेत ताण जा‌णवत नाही आणि शरीर रिलॅक्स झालेले असते. पुन्हा तेच सांगेन, की ब्रा घालणे, न घालणे हा व्यक्तिगत मुद्दा असला, तरी ती न घातल्याने, काही साइड इफेक्ट तर होत नाही ना, हे पाहणेही गरजेचे आहे.

- डॉ. वैशाली बिनीवाले, स्त्रीरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>