Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मातृत्व आणि आहार

$
0
0

डॉ. श्यामा जगदीश कुलकर्णी

काही दिवसांपूर्वी एका मातेने जीव दिल्याची बातमी ऐकली आणि गेल्या छत्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमधील असंख्य माता मनःपटलावर तरळून गेल्या. सर्व घराचे पोषण काळजीपूर्वक करणाऱ्या आईच्या पोषणाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत आहे, असेच म्हणावे लागेल. आई घराचा कणा असते हे वाक्य अनेकजण बोलतात, पण ते फक्त बोलण्यापुरतेच असते. तिच्या आहाराकडे लक्ष देण्याची तिला स्वत:लाही सवय नसते.

विजयाताई माझ्याकडे त्यांच्या मुलांना घेऊन येत असत. सतत उत्साहाने सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचे काम स्वयंपाक घरात चालू असे. सतत पाहुण्यांचा राबता. हाताखाली कोणी नाही. दिवसभरात किती कप चहा होईल याची गणतीच नसे. त्यात कोणी चहा कमी करायला सांगे तर कोणी नको म्हणे. त्यामुळे विजया ताईंचे पोट चहानेच भरून जाई. सर्वांना नाश्ता देणाऱ्या त्या माऊलीला निवांत बसून खाण्यास क्वचितच वेळ उरे. जेवणात शिळे आधी त्या संपवून टाकत. दुपारी थोडा वेळ झोप घेतात हे जवळ जवळ त्यांना माहीतच नव्हते. स्वत:साठी व्यायाम वगैरे करणे म्हणजे वेडेपणा असे त्यांचे मत होते. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कमी झाले होते, बीपी वाढलेले होते. पण हे त्यांना माहीतच नव्हते. मागील वर्षी त्यांच्या घरात सर्वांना करोना झाला. त्यांनाही झाला. त्या मात्र त्याच्यामध्ये वाचल्या नाहीत. अशीच पण थोडी वेगळी पल्लवी या आईची गोष्ट. पल्लवी वजन वाढू नये म्हणून उपाशी राहत होती. अत्यंत लुकडी आणि सतत आजारी असायची. पल्लवी लग्नाच्या आधीपासूनच कमी जेवत असे. या मातांपेक्षा वेगळ्यासुद्धा काही माता दिसतात. वीणा ही त्यातीलच एक. तिला पिझ्झा, बर्गर, ब्रेड व तत्सम जंक फूडची प्रचंड आवड होती. तिचे वजन प्रचंड वाढले होते. तिची मुलगी ज्यावेळेस पोळी-भाजी मागे, तेव्हा ती तिला मॅगी देत असे.

या सर्व मातांची उदाहरणे पाहिल्यानंतर लक्षात येते की, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या मातांचे योग्य आहार घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्त्रीचे पोषण हे ती जन्माला आल्यापासूनच महत्त्वाचे असते. मुलगी वयात आली की तिला चौरस आहार मिळायला हवा. किशोर अवस्थेत जर कुपोषण असेल तर ती पुढे कदाचित कुपोषित माता बनते. कुपोषित मातेच्या गर्भावरदेखील त्याचा परिणाम होतो. अशा मुलांना पुढे विविध आजार होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर पहिल्या हजार दिवसात बाळाच्या मेंदूची वाढ होत असते. त्या कालावधीत मातेचा आहार, तिची झोप, तिचे विचार, तिचे आनंदी असणे हे सारेच महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींचा बाळाच्या बुध्यांकावर परिणाम होत असतो. विजयाताईंसारख्या माता स्वतःहून इतरांना महत्त्व देतात. झोप, नाश्ता, जेवण, याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून कामे करत राहतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे, याकडे तर त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे कदाचित असे जीवावर बेतते. पल्लवी सारख्या माता, सौंदर्य प्राप्तीच्या चुकीच्या कल्पनांनुसार वागून उपाशी राहतात. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे खूप नुकसान होते. मुलांना याचे खूप अधिक काळापर्यंत परिणाम भोगावे लागतात. वीणासारख्या माता स्वतः जंक फूड खातात आणि मुलांनाही तेच देतात.

कारण कोणतेही असो, मातेच्या पोषणाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आले आहे. पूर्वीच्या काळी सासुरवासामुळे मातेला कुपोषणाला सामोरे जावे लागत असे. त्यानंतरच्या काळात माता स्वतःच घरकामात एवढी गढून जात असे, की तिला खाण्याची शुद्धच राहत नसे. त्यानंतरचा फॅशनचा जमाना आला. झिरो फिगरची क्रेझ आली. माता मुद्दाम उपाशी राहू लागल्या. याउलट जंक फूड खाण्याचे काहींना जवळजवळ व्यसनच लागले. त्यांच्या घरात सर्वांचेच वजन वाढू लागले. एकूण काय तर जागरूकतेचा आभाव किंवा जाणीवपूर्वक डोळेझाक! पण माता हा कुटुंबाचा कणा आहे. त्यामुळे ती गर्भवती असल्यापासूनच तिच्या पोषणाची काळजी घेणे, तिला आनंद वाटेल असे वातावरण ठेवणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येक मातेने स्वतःच्या पोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास पूर्ण कुटुंब आनंदित राहील हे विसरून चालणार नाही. मुलांच्या नावाने जशी पैशांची गुंतवणूक करतो, तशी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांना चौरस आहार खाणे शिकवणे ही देखील मोठी गरज आहे. त्यांच्यासाठी आपण सुदृढ राहणे हे मोठे बक्षीस आहे.

(लेखिका बालविकासतज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>