Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मैं हूं ना..!

$
0
0

राधिका गोडबोले

साधारण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी पदोपदी फोन करण्याची सुविधा आणि सवय नव्हती, गावाला सहज येणे जाणे शक्य नव्हते तेव्हाची गोष्ट. सासरी लांबच्या गावी गेलेल्या लेकीला हवे-नकोसे व्हायला लागले. जावयाच्या नोकरीच्या गावी घरात कोणी मोठे माणूस नव्हते. तिच्या चिंतेने कासावीस झालेल्या आई-वडिलांनी मग लेकीच्याच गावात राहणाऱ्या त्यांच्या भाची व पुतणीला पत्र लिहून लेकीकडे लक्ष द्यायला हक्काने सांगितले. अनोळखी, नव्या गावात या बहिणीनीच तिला त्या नाजूक अवस्थेत धीर दिला.

दुसरी घटना अशाच एका लेकीची/सुनेची. नवऱ्याच्या नोकरीच्या गावी घरात तीन वर्षांचे बाळ, दुसऱ्याची चाहूल लागलेली. सांभाळायला मोठे कुणी नाही, तशात कामानिमित्त नवऱ्याला दोन दिवस गावाला जावे लागणार होते. कशी राहणार एकटी, शेजारीही गावी. हिने सरळ गावापासून थोडे दूर अंतरावर राहणाऱ्या मामाला फोन करून दोन दिवस राहायला येतेय असे सांगितले. मामे भाऊ-बहिणी, मामा-मामी यांच्यात ती सुरक्षित आहे समजल्यावर नवराही निश्चिंत झाला.

तिसरी घटना परदेशातील. 'आई, रवीमामाला अनेक वर्षांत तू पाहिलंही नाही म्हणतेस आणि त्यानं या म्हंटलं म्हणून असं आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे जायचं? अगं ही अमेरिका आहे, बिझी असतील ते, त्यांचं रुटीन...' मुलांना थांबवत आईने उत्तर दिले, 'अरे, त्यात काय? माझा सख्खा मावस भाऊ आहे तो.' नंतर नुसते भेटायला म्हणून गेलो आम्ही; पण मामा-मामीच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलेही त्यांच्यासोबत एवढी रुळली, की हॉटेलचे बुकिंग रद्द करून दोन दिवस त्यांच्याकडेच राहिली.

पूर्वी अनेक घरांत उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधी हमखास ऐकू यायचे, 'कधी एकदा परीक्षा संपतेय आणि आम्ही काका/मामाकडे जातोय असं झालंय', 'बाबा, परीक्षा संपेल त्याच दिवशी आम्हाला गाडीत बसवून द्या हं!' अशा अनेक घटना आता साधारण चाळिशी-पन्नाशीत असलेल्यांनी अनुभवल्या असतील. भावंडांमधील प्रेम, जिव्हाळा वय, अंतर, पैसा या कशाहीमुळे कमी होत नाही. अर्थात एखाद्याच्या स्वभावात तुलना आणि त्यामुळे ईर्षा असेल, तर तो माणूस आणि त्याचे कुटुंबीयही अशा निर्व्याज प्रेमाला पारखे होतात. लहानपणी सुटीत अथवा काही कार्याच्या निमित्ताने एकत्र जमून धमाल करणारी चुलत-मावस-आत्ते-मामे भावंडे मोठेपणी नोकरी व्यवसायामुळे व्यस्त होतात आणि एकमेकांपासून दूर जातात. पूर्वी घरातच भावंडे असायची आणि काका, मामा, आत्या किंवा मावशी यांची मुलेही पाहुणी नव्हे, तर घरातलीच वाटायची.

अर्थात आताही बऱ्याच ठिकाणी असे वातावरण असते; पण अनेक ठिकाणी एकुलते एक मूल आणि तेही लाडावलेले असते. आई-वडिलांकडे वेळ नसेल आणि घरात कुणी दुसरे माणूस नसेल, तर मुलाला वेळ देऊ शकत नाही याची बोच त्याला हवे ते घेऊन देऊन भरून काढली जाते. कुणाशी काही वाटून घ्यायची सवय, तयारी नसते. शाळा ट्यूशन, मोबाइल, टीव्ही यात मग्न असल्यामुळे कुणाविषयी काही वाटून घ्यायला वेळ नसतो. या परिस्थितीत राखी, भाऊबीज असे भावंडांना एकत्र आणणारे पारंपरिक पद्धतीनं साजरे केले गेल्यास भावंडांमधील प्रेम नक्कीच वाढेल.

काही पाश्चात्य देशांमध्ये २४ जुलै हा 'कझिन्स डे' म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात कधी झाली माहीत नाही; पण आपल्याकडेही ही प्रथा सुरू करायला हवी. राखी पौर्णिमा साधारण याच सुमारास येते. सर्वसाधारणपणे परदेशातील कपडे, खाद्य-पेय याची फॅशन अथवा इतरही परंपरा याचे प्रत्येक काळातल्या तरुण पिढीला आकर्षण वाटत असते. आई, आजी अथवा मोठी माणसे काही पारंपरिक, पारिवारिक प्रथा पाळायला सांगतात तेव्हा का, असा बाणेदार प्रश्न केला जातो. त्यामागे काही वैज्ञानिक, सामाजिक कारण असो-नसो आपल्या पद्धती मागासलेल्या वाटतात. मात्र, हॅलोविन डे आणि असे अनेक डे कौतुकाने साजरे केले जातात. (अर्थातच हे सरसकट सर्वांना लागू होत नाही.) त्या मानाने 'कझिन्स डे' हा आजच्या एकलकोंड्या होत चाललेल्या मुलांसाठी खरेच आवश्यक वाटतो.

करोना काळात एकलकोंडेपण (काहींचे) वाढले. यातून बाहेर पडून मित्रमैत्रिणी तसेच भावंडांशी खेळायची, दंगा करायची, भटकायची त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. सख्खे भावंड नसलेल्या मुलांसाठी कझिन म्हणजेच चुलत, मावस, आते, मामे भावंडे जवळचा मित्र/मैत्रीण होऊ शकतात. लहानपणी चिमण्या दातांनी चिंचा-बोरे, गोळ्या वाटून खाल्लेली ही भावंडे प्रौढत्व आल्यावरही सुख-दुःख वाटून घेऊ शकतात. अडीअडचणीला धावून येतात. यश, प्रतिष्ठा, पद अशा कशाचीही आडकाठी न येता खऱ्या मित्रासारखी ही भावंडे 'मैं हू ना...' म्हणतात. हे नाते असे असते, की संपर्कात नसलो, तरी अनेक वर्षांनीही कधी अचानक त्यांच्याकडे जाऊन धडकायला काही 'फॉर्मालिटी' लागत नाही, संकोच वाटत नाही. त्यामुळे या 'कझिन्स डे' निमित्त आपल्याकडे वेगवेगळी नात्यांची नावे आणि छटा असलेल्या सगळ्या 'कझिन्स'शी तुटलेला संपर्क पुन्हा साधायला हवा, अथवा असलेला संपर्क त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देऊन वाढवायला हवा. पुढच्या पिढीला 'फर्स्ट कझीन'च नव्हे, तर सेकंड, थर्ड अशा म्हणजेच चुलत-चुलत, मावस आत्ते वगैरे नात्यांचीही ओळख असायला हवी. हल्ली आधुनिक संपर्क साधनांमुळे हे शक्य होते आहे. व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून कुटुंबाच्या अशा विविध शाखांचे ग्रुप तयार असतात. अनेक वर्षे नसलेला संपर्क होऊन नात्यांना उजाळा मिळतोय, ही या माध्यमांची सकारात्मक बाजू आहे. 'कझिन्स डे'चा हाच संदेश आहे, स्टे कनेक्टेड...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>