मुलीचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या नवऱ्याशी हितगुज वाढलं, की मैत्रिणींचे, मोठ्या बहिणींचे सल्ले यायला सुरुवात होते. 'आत्तापासूनच ताब्यात घे बरं का नवऱ्याला, म्हणजे पुढे सासू त्रास द्यायची नाही.' 'अगदी ममाज बॉय नाही ना गं तुझा होणारा नवरा? असेल तर सावधान बरं का.' 'आतापासूनच हो ला हो म्हणायचं नाही गं! विचार करून सांगते असं म्हण, नाहीतरी गृहीत धरतील तुला. पुढे त्रास होईल उगाच.'
'खाष्ट सासू आणि चलाख सून''या अशा सूत्रात बांधलेल्या सासू -सून नात्याची पहिली ओळख आणि सुरुवात ही बऱ्याचदा अशाचप्रकारे होत असते. अनेक वर्षांपासून 'सासू-सून' या नात्याला याच अर्थाने आपण मानत आलो आहोत. सासू म्हणजे त्रास देणारी, सारखं काम सांगणारी, टोचून बोलणारी, अजिबात समजून न घेणारी अशी जाचक स्त्री, हे चित्र आपल्या मनात फार पूर्वीपासून रंगवले गेले आहे. आजही हेच पुन्हा पुन्हा गिरवले जाते आहे. या नात्याला नको तितक्या नकारात्मक पूर्वग्रहाने विळखा घालून ठेवलाय. 'जुलमी सासू' नामक गैरसमजाचं मूळ कारण म्हणजे 'माझ्या सासूकडून मला झालेला जाच मी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो पुढे माझ्या सुनेलासुद्धा दिला पाहिजे', ही काही सासवांची मानसिकता. सुनेची सासू झाली की केवळ सूड उगवण्यासाठी अर्धवट आणि चुकीच्या मानसिकतेने काही सासवा सुनेला जाच करीत असत. सुनेची मानसिकता समजून न घेणं, घरातील कामाचा संपूर्ण भार तिच्यावर टाकणं, आपल्या मुलात आणि सुनेत योग्य संभाषण निर्माण न होऊ देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेच्या माहेरच्या लोकांना कमी लेखणं आणि त्यांच्याकडून अवाजवी मागण्या करीत राहणं. या आणि अशाप्रकारच्या अनेक जाचाला सुनांना सामोरे जावे लागे. किंबहुना आजही जावे लागते. सासू-सून या नात्याला अशाच तक्रारींची आणि दोषांची झालर होती.
सध्या ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीनुसार सासू-सून नात्याला नवीन दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. हल्ली सून शिकलेली हवी अशी मागणी करणाऱ्या बहुतांश सासवा स्वतः उच्चशिक्षित असतात आणि उच्चशिक्षित नसल्या तरी शिक्षण आणि शिक्षणातून येणारं शहाणपण याचं महत्त्व त्यांना पूर्णपणे पटलेलं असतं. त्यांच्या आचरणातदेखील ते दिसून येतं. घरात येणारी सून शिकलेली असेल तर तिच्या शिक्षणाला महत्त्व देणं, सुनेला अजून शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर तिला शिकू देणं, नोकरी करणाऱ्या सुनेच्या नोकरीचं महत्त्व समजून घेणं, तिच्या वेळा, अडचणी आणि त्यापुढे जाऊन तिचा मान ठेवणं या सगळ्या गोष्टी हल्ली सासवा सहज करताना दिसतात. या नाजूक नात्याची सकारात्मक सुरुवात जर एका बाजूने होत असेल, तर केवळ 'सासू अशीच असते', या पूर्वग्रहातून सासू-सून नात्याची सुरुवात करणे कितपत योग्य आहे? माझ्या बहिणीची सासू अशीच आहे. मैत्रिणीची सासू त्रासदायक आहे म्हणजे माझी सासूसुद्धा खाष्टच असणार, असा समज करून घेणं योग्य नाही.
अलीकडच्या काळात लग्न या विषयात अनेक बदल झाले आहेत आणि समाजात त्याचा स्वीकार देखील झाला आहे. अशाचप्रकारे 'सासू' या नात्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा बदल होणे देखील गरजेचे आहे. पूर्वग्रहाच्या नादात एक सुरेख नातं दूषित होणं योग्य नाही. लग्न झाल्यानंतर नवीन घरातील प्रत्येक माणसाचा स्वभाव ओळखणं आणि तो स्वीकारण्याचं काम प्रत्येक स्त्री सहज करीत असते. नवीन घरात गेल्यावर घरातील प्रत्येक नात्याशी सूर जुळवण्यासाठी प्रत्येक नात्याला वेळ दिला जातो. परंतु, सासू या नात्याला मात्र घरात येण्याआधीच पूर्वग्रहाच्या चौकटीत बांधून ठेवलं जातं. या नात्याला हवा तितका वेळ देण्याआधीच 'जुळणार नाही', असा समज केला जातो. हा समज आणि ही मानसिकता बदलायला हवी.
खरं तर समाजमनावर ज्याचा विशेष पगडा आहे अशा दृश्य माध्यमांमध्येदेखील 'खाष्ट सासू' ते 'हवीहवीशी वाटणारी सासू' हा प्रवास पार केलेला दिसतो आहे. चंदेरी पडद्यावरील अगदी जुन्या काळातील सासूची भूमिका वठवणाऱ्या ललिता पवार ते हल्लीच्या काळात सुनेला नोकरीसाठी प्रोत्साहन देणारी 'द इंडियन किचन'मधील आणि मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सासू हे अंतर माध्यमांनी पार केलं आहे. अगदी जाहिरातीच्या माध्यमांतूनदेखील सासू-सून या नात्यातील गोडवा हळूहळू पाहायला मिळतो आहे. असं म्हणतात की, घराला घरपण देणाऱ्या घरातल्या स्त्रिया खुश असतील, तर घरात आनंद नांदत असतो. 'सासू-सून' या घरातील दोन महत्त्वाच्या आधारस्तंभांनी एकमेकांशी गट्टी करणे गरजेचे आहे. असं झालं तरंच 'नवरा-बायको' किंवा 'आई आणि मुलगा' या नात्यातील अनामिक तेढ किंवा दुरावा जाणवणार नाही आणि नाती मोकळी आणि समाधानी होतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट