मैत्री म्हणजे 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना...' जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी भेटणे म्हणजे जिवंतपणी मिळालेला स्वर्गच जणू. वयाची साठी ओलांडल्यावर आपले शरीर हळूहळू छोट्या-मोठ्या आजारांचा, ताणाचा 'अलार्म' द्यायला लागते. एकटेपणामुळेही ताण वाढतो. या वयाच्या व्यक्ती एकत्र आल्यावरही तक्रारींचा पाढाच वाचला जातो. गुडघे दुखतात, झोपेच्या तक्रारी, मनही कशात रमत नाही. साधारण चाळिशी-पन्नाशीनंतरच्या वयातील मैत्रीमधील गप्पांचा रोख हा तक्रारींच्या पाढा वाचण्याकडे जास्त असतो. मग यात नकारात्मक गोष्टींबद्दल गप्पा, नैराश्य, चिडचीड, द्वेष, कुणा ना कुणाबाबत तक्रारी अशा अनेक गोष्टी येतात. आपल्या सारखेच काही तरी दुसऱ्यात असेल, तर मैत्री होते. या सगळ्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी मला असे वाटते, की आनंदी, ऊर्जादायी, प्रेरणादायी आयुष्य जगण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने लहान मित्र मैत्रिणी 'ऑक्सिजन' सारखे असतात. ते आपल्याला नवचैतन्य देतात.
मैत्री असावी स्वच्छंदी, फुलपाखरासारखी
मैत्री असावी नात्यांपलीकडची, जात, धर्म, वय, भाषा न झुगरणारी
आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या वयोगटासोबत आपण स्वत:ला नव्यानं गवसतो, स्वत:कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो आणि वाढत्या वयाचा बाऊ होत नाही हा माझा अनुभव आहे. 'आमच्या काळात असं नव्हतं,' असं म्हणण्यापेक्षा बदलत्या काळानुसार तरुणाईच्या रंगाढंगात मिसळून जाण्यातच खरी मजा आहे. तरुणाईचा फिटनेस फंडा आपल्याला निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे. चांगले दिसणे आणि स्वतःबद्दल चांगले 'फिल' करणे याने आत्मविश्वास वाढतो.
आजच्या कम्प्युटर आणि इंटरनेटच्या युगात तरुणांची जीवनशैली बदलली आहे. या तरुण पिढीशी मैत्री केली, तर आधुनिक व ऑनलाइन जगात वावरताना सोपे जाते. सध्या मी असे टेक्नोसॅव्ही असण्याचे फायदे अनुभवते आहे. उदा. ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन बिलं भरणं, ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ मागवणे इत्यादी. पगार भरपूर असल्याने बचत करून खर्चही भरपूर करणारी सध्याची पिढी आहे. नावीन्याची ओढ एकसारखी वाढत आहे. त्यांची राहण्याची व जगण्याची जीवनशैली मला खूप भावते. त्यांच्या सोबत राहिल्याने आपल्यालाही टापटीप व छान राहावेसे वाटते. त्यांचे विचार स्वीकारावेसे वाटतात. त्यांची भाषा वेगळी आहे, आधुनिकतेच्या व्याख्येत बसणारी. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्त्व आहे. ते वापरत असलेल्या नवीन शब्दांचा वापर म्हणा किंवा एसएमएस लँग्वेजचा वापर आपणही आपल्या बोलीभाषेत करू लागतो. सुंदर हस्ताक्षर ग्रुपमधील तरुण मित्रमैत्रिणींकडून दिग्गज कलाकार, लेखक यांची सुंदर वचने, मोत्यासारख्या अक्षरात पाहून मन प्रसन्न ताजेतवाने होते.
कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या सपना या मैत्रिणीसोबत सकाळी फिरायला जाताना अनेक पुस्तकांवर आमची चर्चा होते. तिचा आणि माझा दृष्टिकोन समजतो. विचारांची देवाणघेवाण होते. आपले विचार मांडण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी तसेच कोणत्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी कुणी तरी सोबती हवाच असतो. ती सोबत मला तरुण पिढीतील मित्रमैत्रिणींपासून मिळते. अर्थात यामुळे ज्ञानातही भर पडते. आज कालच्या स्पर्धात्मक युगात सगळेच घड्याळाच्या काट्यावर धावताहेत. डोक्यावर प्रचंड तणाव घेऊन काम सुरू आहे. या धकाधकीच्या दिनक्रमात बरेचदा कळत नकळत शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत जाते. कोणतेही काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी शारीरिक, मानसिक आरोग्याची साथ असणे फार महत्त्वाचे.
मुलगी व तिच्या काही मैत्रिणी झुंबा नृत्यकला या क्लासला जात होत्या. मलाही येण्याचा आग्रह केला. सुरुवातीला मला संकोच वाटला; पण या छोट्या मैत्रिणींच्या उत्साहाने संकोच गळून पडला. मी कितीही दमलेली असले, ताण व थकवा आलेला असला, तरी नृत्यवर्गाला गेल्यावर हे सर्व विसरून जाते. नृत्य केल्यानंतर मन ताजेतवाने होते. राग शांत होतो. विविध गोष्टींवर शांतपणे विचार करण्याची संधी मिळते. नृत्यामुळे मनावर होणाऱ्या चांगल्या परिणामांमागे तशी वैज्ञानिक कारणांची जोडही आहे. नृत्यावर केल्या गेलेल्या वैज्ञानिक चाचण्यांमध्ये असे सिद्ध झाले आहे, की नृत्य केल्यावर मेंदूमध्ये 'एंडॉर्फिन' संप्रेरक स्रवते. हे संप्रेरक 'हॅपी हॉर्मोन' म्हणून ओळखले जाते. आनंद वाटण्याच्या भावनेसाठी हे संप्रेरक काम करते. त्यामुळे मूड चांगला होतो. नृत्यामुळे मेंदूत स्त्रवत असलेल्या 'हॅपी हार्मोन'मुळे नृत्य केल्यावर मन आनंदी होते. नृत्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन, नॉन एपिनेफ्रिन, डोपामाइन या न्युरोट्रान्समीटरची पातळी वाढण्यास मदत होते. परिणामी, निराशा, दुःख कमी होण्यास मदत होते; कारण या न्युरोट्रान्समीटरची पातळी नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये घटलेली दिसून येते. नृत्यामुळे शरीर व मन यांचे संतुलन सुधारण्यास मदत होते. हे केवळ आणि केवळ या छोट्या मैत्रिणींमुळे शक्य झाले. मानसशास्त्र सांगते, की कमी वयाच्या लोकांच्या संपर्कात राहिल्यास खूप ऊर्जा व प्रेरणा मिळते.
आजच्या करोनाच्या गंभीर परिस्थितीत, आपण सर्वच जण चिंताग्रस्त आहोत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी फिटनेस चांगला हवा. त्यासाठी माझी लहान मैत्रीण डॉ. लता पाडेकरने सर्व मैत्रिणींना एकत्र केले. सर्वांसाठी योगा, प्राणायाम व मेडिटेशनचा ऑनलाइन वर्ग घेतला. खरे तर, आमच्या सर्वांसाठी ही पर्वणीच होती. तरुण वयाच्या सख्यांसोबत वावरणे हा सकारात्मक ऊर्जेचा 'बूस्टर डोस'च वाटतो मला. मन चांगल्या गोष्टीत गुंतविले, की अँटिबॉडीज् वाढतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आनंदाच्या भरात सध्या मी वयाच्या या टप्प्यावर झुलते आहे. चला, तर मग यंदाच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने मैत्रीचा नवा अध्याय सुरू करू या...
(लेखिका माजी मुख्याध्यापिका आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट