प्रश्न : सध्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने माझ्या टीनएजर मुलीला काही भेट वस्तू मिळालेल्या आहेत. ती त्याबद्दल विचार करताना दिसते. मी तिच्याशी प्रेम, डेटिंग आदी विषयांवर कसं बोलू हे समजत नाही?
उत्तर : खास करून टीनएज हे बाल्य आणि प्रौढत्व यांमधील पूल आहे. या काळामध्ये फँटसीच्या जगात वावरणं, कल्पनेवर स्वार होऊन सैरभैर होणं, शारिरीक आकर्षणातून, कधी कधी लोकप्रिय होण्यासाठी तर कधी मैत्रिणीने केलं म्हणून असुरक्षिततेच्या भावनेतून टीनएजर मुलं-मुली प्रेमात पडलेले दिसतात. आता हे प्रेमात पडण्याचं वयही कमी होताना दिसत आहे. पालक म्हणून कदाचित तिच्या वागणुकीतून काही अडचणी निर्माण होत आहेत, असं तुम्हाला दिसतंय. फँटसीमध्ये असलेल्या टीनएजरला वर्तमानकाळातील वास्तवाचं भान आणून खडबडून जाग करणं आणि भविष्याचा विचार करायला लावणं यासाठी पालकांचा आटापिटा चालू होतो. खरं तर अशा प्रकारच्या केसमध्ये त्यांना न ओरडता, भाषणं न देता त्यांच्याशी प्रेम आणि इतर गोष्टींबद्दल मोकळेपणाने संवाद साधणं, गरजेचं आहे. त्यासाठी मुलीच्या भावनांचा स्वीकार करणं, आदर करणं आणि त्याची खिल्ली न उडवणं, हे महत्त्वाचं आहे. हा संवादाचा मार्ग अवलंबण्यापूर्वी स्वत: आपण किती कंफर्टेबल आहात, हे तपासून घेणं गरजेचं आहे. क्रश, इममॅच्युअर लव्ह, मॅच्युअर लव्ह या संकल्पनांबद्दल तिच्याशी बोलून तिची मतं समजावून घेणं आवश्यक आहे. त्यावर टिका टिपणी न करता किंवा खिल्ली न उडवता ते समजून त्यावर शांतपणे मत व्यक्त करा. या सर्व प्रकारच्या प्रेमाबद्दल तिला समजावून सांगा. प्रेम म्हणजे संयम, जबाबदारी हे तिला पटवून द्या. नातं फुलण्यासाठी आणि ते परिपक्व होण्यासाठी पुरेसा वेळ देणं कसं आवश्यक आहे, हे समजावून देऊ शकता. आवेगात घेतलेले निर्णय कसे चुकीचे होऊ शकतात आणि त्याचा दुष्परिणाम कसा होऊ शकतो, हे उदाहरणातून सांगू शकतात. या सर्वात तिची प्रायव्हसीही जपा. पण तिला तिच्या लक्ष्मणरेषांची माहितीही करून द्या. त्या पाळण्याबद्दल आग्रही राहा. आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांबद्दल तुम्ही तिला साक्षर करत आहात. मुलीला प्रेमाबद्दल तर माहिती द्याच पण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करण्यासही शिकवा. जोडीदाराला पूर्ण स्वातंत्र्य आणि मोकळीक देण्याविषयी सांगा. त्यासाठी तुमचं स्वतःचं उदाहरणही देऊ शकता. हे सगळं करत असतानाच तिच्या ध्येयाकडे तिचं दुर्लक्ष तर होत नाही ना, हे पाहा.
शब्दांकन : दीपेश वेदक
डॉ. संदीप केळकर, बालरोग तज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ (एमडी, डीसीएच)