प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा एक क्षण येतोच. हा क्षण काही सांगून येत नाही किंवा १४ फेब्रुवारीचा मुहुर्त पाहूनही येत नाही. आपल्या आयुष्यातल्या त्या अविस्मरणीय प्रसंगाबद्दल बोलत्या झाल्या आहेत, मुक्ताच्या वाचकमैत्रिणी...
कोल्हापूर ते मुंबई बाइकने
आमचा प्रेमविवाह. मी मुंबईची आणि नंदादीप कोल्हापूरला बीएएमएस करत होता. त्यामुळे भेटणं तसं व्हायचं नाही. फोनचाच तेवढा आधार. व्हॅलेंटाइन डेही कुरिअरने ग्रीटिंग्ज वगैरे पाठवून साजरा होत असे. एकदा त्याला बोललेही, की आपण व्हॅलेंटाइन डे एकत्र साजरा कधी करणार? त्यानंतरचा १४ फेब्रुवारी मात्र स्पेशल ठरला. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचले. तेव्हा शिवाजी पार्कला नोकरीला होते. तितक्यात नंदादीपचा फोन आला, नेहमीसारखा. मीही नेहमीचीच विचारपूस केली आणि त्यानेही. नंतर थोड्यावेळाने तो म्हणाला, तू खाली ये, मी उभा आहे. तो थट्टा करतोय, असं वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर मी खाली जाऊन पाहिलं तर खरंच तो उभा होता. मग ऑफिसमधून हाफडे घेऊन आम्ही दोघं तिथल्या तिथेच फिरलो. तो दिवस साधेपणानेच साजरा केला. पण तो इतक्या दुरुन बाइकने माझ्यासाठी आला होता, याचं समाधान अधिक होतं.
-चैताली जाधव
प्रेमाचं प्रमाणपत्र
माझं लग्न होऊन काही महिन्यांनंतर आम्ही अमेरिकेला गेलो. लग्नानंतर दुसरा व्हॅलेंटाइन डे अमेरिकेत असतानाच आला. त्यावेळी आमच्याकडे गाडी वगैरे नव्हती. त्यामुळे तेथे व्हॅलेंटाइन डेला गिफ्ट आणण्यासाठी जाणं शक्य नव्हतं. मी माझी सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन तिथे गेले होते. माझे पती कृणाल यांना वेगळी कल्पना सुचली. त्यांनी माझं एमएससीचं पदवी प्रमाणपत्रं घेतलं आणि ते स्कॅन करून त्यावरील मजकूर बदलला. आमच्या नात्याचे बंध त्या गुंफले आणि एक चांगली सहचरिणी म्हणून मला ए प्लस ग्रेड दिली. त्या दिवशी मला काहीच गिफ्ट दिलं नाही, म्हणून मी काहीशी नाराजच होते. त्यांना त्याबद्दल विचारलेही. त्यावेळी त्यांनी मला ते प्रमाणपत्रं दिलं. ते प्रेमाचं प्रमाणपत्र मला खूप काही देऊन गेलं. तो क्षण अनमोल असाच आहे.
-सोनल चव्हाण
आणि प्रेम व्यक्त झालं
माझी आणि तेजसची ओळख बऱ्याच वर्षांपासून होती. पण आम्ही एकमेकांशी प्रत्यक्ष असे बोललो नव्हतो. काही दिवसांनी आम्ही ऑनलाइन बोलू लागलो. म्हणजे आम्हा दोघांना कधी रिकामा वेळ असतो, हे जाणून आम्ही त्याच वेळी ऑनलाइन राहू लागलो. एकमेकांची मतं कळू लागली. शेअरिंग होऊ लागलं. त्या दरम्यान आम्ही एकमेकांचे फोन नंबरही दिले आणि आमचे फोन कॉलही सुरू झाले. जवळपास वर्षभर हे ऑनलाइन चॅटिंग सुरू होतं. नंतर एके दिवशी तेजसने मला ऑनलाइनच लग्नाची मागणी घातली. अर्थात मी लगेच होकार दिला नाही. त्यासाठी चार-पाच दिवस घेतले. पण तो दिवस माझ्यासाठी व्हॅलेंटाइन डेसारखाच होता. माझा होता. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. पण ते व्यक्त होत नव्हतं. मी थोडीशी रिझर्व्ह असल्याने मी तसा प्रयत्न केला नाही. पण अखेर तेजसने त्यासाठी पुढाकार घेतला आणि तो दिवस साठवून ठेवावा, असं त्यावेळी वाटून गेलं.
-श्रुती कुलकर्णी
अनमोल गिफ्ट
तो काळ २०००चा. त्यावेळी आतासारखा व्हॅलेंटाइन डेचा तितका जोर नसायचा. पण हा प्रेमाचा दिवस आपण साजरा करावा, असं मला नेहमी वाटायचं. लग्न ठरल्यानंतर भावी पतीबरोबर आपल्याला सेलिब्रेशन करता येईल, या विचाराने मी सुखावून गेले. अखेर तो दिवस उजाडला. आमचं भेटायचंही ठरलं. त्याने माझ्यासाठी काही सरप्राइज आणलं असेल का, डिनर वगैरे अरेंज केला असेल का, असे आडाखे मी मनातल्या मनात बांधत होते. आम्ही भेटलो. भरपूर गप्पा मारल्या. त्यावेळी त्याच्या बोलण्यातून कळलं की व्हॅलेंटाइन डे वगैरे त्याच्या संकल्पनेत बसणारं नाही. प्रेमाला असा एखादा दिवस का असावा, सगळे दिवस प्रेमाचे, हा त्याचा विचार त्याने माझ्यासमोर मांडला. इतकी वर्ष हा दिवस साजरा करण्याच्या प्रतीक्षेत असलेली मी खट्टू झाले. पण त्याच वेळी त्याने त्याच्या बॅगेतून गुलाबाचं फुल काढलं आणि मला दिलं. तो क्षण खूप भावला. माझ्यासाठी ते अनमोल गिफ्टच ठरलं. माझी इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती.
-मेघना मराठे
फटफजिती
अमोलसोबतचा पहिलाच व्हॅलेंटाइन डे अगदी कायमचा लक्षात राहिला. तो रोमॅण्टिक म्हणून नाही, तर आमची चांगलीच फजिती झाली म्हणून. आम्ही दोघेही पार्ल्यात राहणारे. १४ फेब्रुवारीला तिथेच भेटलो आणि वांद्रे रेक्लमेशनला फेरफटका मारायचं ठरवलं. त्यावेळी अमोलने नवी बाइक घेतली होती. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर आम्ही समुद्रकिनारी बसलो. पण अमोलचं अर्ध लक्ष बाइककडे होतं. ती टो केली तर, ही भीती त्याला होती. तो म्हणालाही, तुझ्याकडे बघू की बाइककडे? मी म्हटलं तुझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्याकडे बघ. त्यावेळी त्याने बाइककडे पाहिलं. तेव्हा नेमकी त्याची बाइक टो केली होती. तो गाडीच्या मागे पळत सुटला आणि मला खुणेनेच पाच-दहा मिनिटांत येतो, असं सांगितलं. मी मग तिथे एकटीच बसले होते. थोड्या वेळाने तो आला, तेव्हा कुठे हायसं वाटलं. बाइक मुलांचं पहिलं प्रेम असतं, याची प्रचिती मला पहिल्याच व्हॅलेंटाइन डेला आली.
-अनुष्का शिंदे
नव्या नात्याची सुरुवात
आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण आईवडिलांचा विरोध होता. मग तीन वर्षांच्या प्रेमानंतर १० मे २०१०ला आईबाबांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न केलं. सचिनचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा स्वभाव फारच समजूतदार आहे. तो कायमच प्रत्येक गोष्टीत मला समजून घेतो. साथ देतो. घरच्या धाकामुळे आम्ही दोघं लग्नापूर्वी कधी व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकलो नाही. लग्नानंतर आता कामाच्या व्यापामुळे ते जमत नाही. त्यामुळे १० मे हा आमच्या लग्नाचा वाढदिवसच आमचा व्हॅलेंटाइन डे आहे. याच दिवशी एका नवीन नात्याला सुरुवात झाली होती. हाच माझा प्रेमदिन आहे.
अनुप्रिता वाघमारे, कामोठे
शब्दांकन - ऋतुजा सावंत