रविवारच्या महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक मस्त ट्रीट.. उन्हाच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो एक झक्कास ज्यूसपार्टी होऊन जाऊ द्या !
सध्या हेल्दी आणि डाएट फूडचा जमाना आहे. त्यामुळे कमी तेलकट, फायबर युक्त पदार्थांच्या सेवनाकडे लोकांचा कल दिसून येतोय. त्यातही आहार आणि आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या मंडळींमध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि फळांच्या ज्युसेसची जबरदस्त क्रेझ दिसून येतेय. आजकाल तर चक्क मोठमोठ्या समारंभातून जंक फूडऐवजी ज्यूस काउंटरवर लोकांची जास्त गर्दी असते.
ज्यूस अर्थात फळांचा रस हे नक्कीच एक उत्तम डाएट आहे. कामाच्या धावपळीत बसून नाश्ता करायला वेळ मिळत नाही, अशावेळी एनर्जीसाठी वर्कआउटनंतर एक ग्लासभर ज्यूस नक्कीच फायदेशीर आहे. या ज्यूसमुळे पचन सुधारतं, तजेलदार कांती मिळते. त्यामुळेच सध्याच्या पार्टी लव्हर्सचं लेटेस्ट आकर्षण आहे, 'ज्यूस बार'. तुमचीही पार्टी हटके बनवायची असेल तर ज्युसेससाठी गाजर, सफरचंद, संत्री यासारख्या वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे तयार ठेवा. नेहमीच्या जंकफूड किंवा फास्टफूड्पेक्षा वेगवेगळ्या फळांचं किंवा भाज्यांचं मिश्रण करून हेल्दी ज्युसेस बनवा. या ज्यूसना 'पॉवर पंच', 'पेप इट अप', 'गारेगार रसदार' अशी भन्नाट नावं देऊन तुम्ही आपल्या पाहुण्यांना चकित करू शकता. हा आगळा मेन्यू हेल्दीही असेल आणि चवदारही. मिक्सर किंवा ब्लेंडरमधून ज्यूस बनवताना त्यातील उपयुक्त पोषक द्रव्यांचा नाश होतो. त्यामुळे 'कोल्ड प्रेस' टेक्निकने केवळ फळाचा गर कुस्करून निघालेला रस नक्कीच अधिक पोषक असतो.
ज्युसला आणखी एक पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या जेवणात 'सूप्स'चा समावेशष करू शकता. कधीतरी जड खाण्याऐवजी भाज्यांचं सूप घेतलंत तर पुरेशा जीवनसत्त्वांबरोबरच पोषक अशी खनिजं आणि मूलद्रव्यंही मिळू शकतील. ज्यूसमुळे अतिरिक्त साखर आणि ग्लुटेन यांसारख्या विषारी द्रव्यांची पातळी नियंत्रित केली जाते. आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
असा सेट करा तुमचा ज्यूस बार:
तुम्हाला गरज आहे फक्त एका टेबलाची, ज्युसिंग मशीनची आणि कापलेल्या भाज्या व फळांची. तुमच्या आवडत्या संत्री, मोसंबी, सफरचंद, यांसारख्या फळांबरोबरच रासबेरी, ब्लुबेरी, पिअर, अशा वेगळ्या फळांचाही समावेश करू शकता. चवीला मध, ब्राउन शुगर, आणि पुदिन्याची पानंही फळांच्या रसात वापरू शकता. जोडीला हेल्दी कुकीजसुद्धा ठेऊ शकता.
फळांच्या रसाचे फायदे
१. व्हिटामिन 'सी'चा स्त्रोत: विषारी किरणांच्या हानिकारक प्रभावापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी संत्र्याच्या रसातून मिळणारं व्हिटामिन सी लाभदायक ठरतं.
२. प्रतिकारकशक्ती वर्धक: अननसाच्या रसातील ब्रोमेलीन नावच्या विकरामुळे सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.
३. जलवर्धक: शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्याच्या दृष्टीने यंदाच्या उन्हाळ्यात ज्युसेसला पर्याय नाही.
४. पचनशक्ती वर्धक: बीटामधील फायबरमुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.
५. यकृतासाठी फायदेशीर: सफरचंदातील अल्कधर्मी गुण यकृत स्वच्छ करून मजबूत बनवण्यात उपयोगी ठरतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट