आज वेगवेगळ्या क्षेत्रात धडपडणाऱ्या, स्वतःला सिद्ध करणाऱ्या मुली समाजासाठी अभिमानास्पद ठरत आहेत. त्यांचं स्त्रीपण हा कमकुवतपणा नव्हे, तर त्यांची मोठी ताकद आहे. म्हणूनच एक स्त्री असल्याचा अभिमान वाटला, असा त्यांच्या आयुष्यातला क्षण कोणता? हे सांगतायत, मुक्ताच्या वाचकमैत्रिणी.
पालकत्त्वाचा खंबीरपणा
मी इंजिनीअरिंगचं शिक्षण आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आईपणाला प्राधान्य दिलंय. मला पहिली मुलगी. त्यावेळी दुसऱ्या बाळाची चाहूल लागली तेव्हा त्याला वाढवावं की नाही, जन्म द्यावा की नाही, या द्विधेत आम्ही अडकलो होता. दोघांच्या घरून कोणताही आधार नसताना दोन मुलांचं पालकत्व स्वीकारणं शक्य होईल का, याचा निर्णय घेऊ शकत नव्हतो. पण, एका क्षणी मी बाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सगळा त्रास पुन्हा सोसण्याची तयारी ठेवली. माझ्या मुलाला मी जेव्हा जन्म दिला, तेव्हा एक स्त्री म्हणूनच मी हा कणखरपणा दाखवू शकले. मुलाच्या शाळेत एका प्रदर्शनावेळी त्याचं कौतुक झालं. तेव्हा त्याने 'हे आईने शिकवलं', असं सांगितलं. मग त्याच्याबरोबरच आई म्हणून मलाही वाहव्वा मिळाली, त्या क्षणी मला स्त्री म्हणून मिळालेल्या आईपणाचा अभिमान वाटला.
विजया सुर्वे, गृहिणी
पहिला पगार देताना
मी मूळची लोणीची. शाळा, इंजिनीअरिंगचं शिक्षण मुलींच्याच कॉलेजात. इंजिनीअरिंगनंतर अचानक नोकरीसाठी बाहेर राहण्याची वेळ आली. पहिल्यांदाच घर सोडून जात होते. आईवडिलांनाही काळजी होतीच. इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर म्हणून कंपनीची नोकरी करताना नानाविध लोकांशी संपर्क येत होता. त्यातच बरोबरच्या नऊ पुरुषांना डावलून केवळ गुणवत्तेच्या आधारावर मला प्रमोशन मिळालं. त्या क्षणी क्षमता असेल, तर मुलगीही जग जिंकू शकते, हा विचार माझ्या मनात आला आणि स्वतः स्त्री असण्याचा प्रचंड अभिमान वाटला. घरातली मोठी मुलगी म्हणून आईवडिलांच्या हातावर पहिला पगार ठेवतानाही त्यांचे उजळलेले चेहरे पाहून तिला हाच अभिमान वाटतो.
अर्चना कांबळे, इंजिनीअर
आई झाले तो
एक स्त्री म्हणून आई होण्याची एक वेगळी शक्ती मिळालेली असते. त्यातही एका मुलीची आई होण्याचं सुखच निराळंच. त्यामुळेच माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळचा प्रसंग माझ्यासाठी खरंच अभिमानाचा आहे. तिच्यावेळच्या प्रसूतीवेदना आणि त्यानंतर मुलगी झालीये, हे ऐकणं माझ्यासाठी सर्वात मोठं सुख होतं. आजही स्त्री म्हणून विचार करताना, मी एका मुलीची आई आहे, याच मला खरंच खूप अभिमान वाटतो. त्याशिवाय समाजातील बदलती परिस्थिती, मुलींना मिळू लागलेल्या संधी, स्वतःला सिद्ध करण्यासाठीची धडपड या सगळ्यातच मुलगी म्हणून जन्माला आल्याचं खरोखर समाधान वाटतं.
यशश्री काळे,गृहिणी
आईवडिलांच्या आनंदाचं कारण
इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल आला आणि तो बाबांच्या हातावर ठेवला. मी इंजिनीअर झालेय, याचं समाधान माझ्यापेक्षा त्यांच्याच चेहऱ्यावर अधिक झळकताना पाहिलं आणि मुलगीही आईवडिलांच्या आनंदाचं कारण असते, हे सिद्ध केल्याचा खूप अभिमान वाटला. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत मी चांगल्या हुद्द्यावर रूजू झाले तेव्हा बाबांच्या हातावर पहिला पगार ठेवताना त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आलेला अभिमान पाहून मलाही मी मुलगी असल्याचं खूप समाधान वाटलं.
स्वप्नाली आठवले, इंजिनीअर
मी बाबांची ताकद
दोन बहिणी आणि एका भावानंतरचं मी शेंडेफळ. खरंतर नातेवाईकांच्या मते माझ्यावेळी आईला मुलगाच व्हायला हवा होता. त्यामुळेच मुलगीच का, असा सूरही काही जणांनी लावला होता. पण आज आम्हा तिघींची प्रगती पाहून वडिल अभिमानाने सांगतात, 'मी तीन मुलींचा बाप आहे आणि माझ्या घरी आज लक्ष्मी नांदताहेत.' बाबांचं हे वाक्यं ऐकून खरंच खूप समाधान वाटलं. आमच्या जडणघडणीतही वडिलांनी कधीच मुलगा, मुलगी असा भेद केला नाही. शिक्षण, नोकरी प्रत्येक पायरीवर आमच्या पाठीशी ठामपणे ते उभे राहिले. आपले वडील आपल्याला त्यांची ताकद मानतात, हा विचार माझ्या स्त्रीजन्माचे सार्थक करणारा वाटतो.
अंजली गुंजकर, नोकरी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट