रज्जू, संजू, गौरी, बाबुसारख्या वडार समाजातील नऊ-दहा वर्षांच्या मुलांचा अख्खा दिवस मातीत खेळण्यात जायचा. या मुलांचे आई-वडील बांधकाममजूर. अक्षराची ओळख सोडाच, शाळेचा साधा ठावठिकाणाही त्यांना माहीत नव्हता. या मुलांच्या आयुष्यात गोरेगावच्या पाटकर कॉलेजातील कविता पावसकर आणि मयुरी गुरव या दोन्ही मुलींनी ज्ञानज्योती फुलवल्या. पूर्वी मातीत धुळाक्षरे गिरवणारी ही मुले आता अक्षरयात्रेमध्ये सामील झाली आहेत. या दोघी पाटकर कॉलेजातून बी.एमएस करत आहेत. एकदा बसची वाट पाहत असताना, कांदिवलीतील नरवणे कॉलेजसमोरील वडार समाजाच्या वस्तीतल्या रज्जू नावाच्या मुलीशी त्यांची ओळख झाली. गप्पांच्या ओघात रज्जू शाळेत जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. रज्जूसारख्याच या वस्तीतील अनेक मुले शाळेपासून वंचित होती. या दोघींनी या वस्तीशी दोस्ती वाढवली. मुलांनी शाळेत जायला हवे यासाठी त्यांनी या वस्तीतील पालकांशी गाठीभेटी घेतल्या. पालकांना शाळेचे महत्त्व सांगू लागल्या. मुलांना शाळेत पाठवायचे, तर भाषेचा मोठा अडसरही होताच.
कविता आणि मयुरीला यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही जिद्द न सोडता या दोघींनी रज्जूसह तिच्या चार भावंडांना कांदिवली पूर्वेकडील पालिका शाळेत प्रवेश मिळवून दिला. वस्ती आणि शाळेमध्ये खूप अंतर होते. रोजची पायपीट नको म्हणून या मुलांनी कंटाळून शाळाच सोडून दिली. तरीही हार न मानता या दोघींनी या मुलांना वस्तीशेजारील 'शिशूविकास ट्रस्ट' या खासगी शाळेत प्रवेश दिला. त्यांची शाळेतून पुन्हा गळती होऊ नये म्हणून त्या मुलांच्या, शिक्षकांच्या संपर्कात राहिल्या. या दोघींमधील जिद्द, चिकाटी शाळेलाही जाणवली. शाळेनेही या मुलांची भाषेची, वेळेची अडचण ओळखून या मुलांसाठी वेगळा वर्गच केला. त्याची जबाबदारी या दोघींना देण्यात आली. आता त्या या मुलांच्या शिक्षक झाल्या आहेत. घरून विरोध होईल म्हणून त्यांनी आपल्या घरीसुद्धा या मुलांबद्दल, शाळेबद्दल काहीच सांगितले नाही. आज मात्र त्यांच्या पालकांना मुलींविषयी खूप अभिमान वाटतो. अ. भि. गोरेगावकर शाळेसह पाटकर विद्यालयातील शिक्षकांनाही या दोघींच्या या आगळ्या कामाचे अप्रूप आहे. तर अक्षराचा गंधही नसलेली ही मुलेही बाराखडी गिरवण्यात, आयुष्याची नवी स्वप्ने रंगवण्यामध्ये गुंग झाली आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट