स्त्री मुक्ती संघटनेने कोपरखैरणे येथे स्त्रियांसाठी 'कौशल्य प्रशिक्षण केंद्रा'ची भव्य वास्तू उभारली आहे. दहा वर्षांच्या अथक परिश्रमाने हे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. मध्यमवर्गीय तसेच गरीब स्त्रियांना मध्यवर्ती ठेवून यातील प्रशिक्षण उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्याविषयी सांगत आहेत स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर. (मुलाखत : शर्मिला कलगुटकर)
दहा वर्षांनंतर स्त्रियांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले, कसा होता हा प्रवास?
स्त्री मुक्ती संघटनेने काही वर्षांपूर्वी स्त्रियांसाठी एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. मुंबईत स्वतःची हक्काची जागा नव्हती. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, उस्मानाबाद, बुलडाणा, पुणे येथे आम्ही स्त्रियांसाठी करीत असलेले काम विखुरलेले होते. त्यातून नवे अनुभव मिळत होते. आम्हीही खूप शिकत होतो, घडत होतो, शिकवत होतो. हे सारे एकाच ठिकाणी, एकाच छत्राखाली करता यावे यासाठी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे हे कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. अनंत अडचणी, अडथळ्यांना तोंड देत आम्ही हे स्वप्न साकार केले. मुंबईत जागा घेणे अवाक्याबाहेर आहे. सिडकोने कमी दरात १४ हजार चौ. फुटांचा हा प्लॉट संमत केला आणि आम्ही तो दहा वर्षांपूर्वी विकत घेतला. तेथे बांधकामासाठी आम्ही आर्थिक मदत गोळा करत होतो. पाच वर्षांपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू झाले. असंख्य हितचिंतक, स्नेही, चळवळीतील कार्यकर्ते, बँकानींही मोलाचा सहभाग दिला, आर्थिक मदत केली. 'सत्यमेव जयते'मधून आमचे काम हजारोंपर्यंत गेले. त्याचाही मोठा हातभार लाभला.
या केंद्रामध्ये नेमके काय असेल?
समाजातील मध्यमवर्गीय, तसेच गरीब स्त्रियांचा या केंद्रात संपूर्ण सहभाग असेल. यात नोकरदार, मध्यमवर्गीय स्त्रियांच्या गरजा पूर्ण करण्यासह गोरगरीब स्त्रियांनाही स्वयंपूर्ण करणारे, रोजगार मिळवून देण्यासाठी स्वयंसिद्ध करणारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तीन मजल्याच्या वास्तूमध्ये विविध प्रकारची प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यात किशोरवयीन मुलींसाठी जिज्ञासा उपक्रम, ज्येष्ठ नागरिक महिलांसाठीही केंद्र, गरजू महिलांसाठी आधारगृह, डॉक्युमेंटेशन सेंटर, सांस्कृतिक केंद्रासह पाळणाघर, तसेच अन्य नाविन्यपूर्ण प्रशिक्षण वर्गाची सुविधा येथे आहे. कम्प्युटरपासून गार्डनिंगपर्यंत अनेक प्रकारचे प्रशिक्षण अतिशय माफक दरात गरजू, तसेच इच्छुक स्त्रियांना देण्यात येणार आहे. हे केंद्र सर्व स्त्रियांसाठी उपलब्ध असून, निवासी प्रशिक्षण केंद्राचाही यात समावेश आहे.
येथे गारबेज गॅलरीही आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे?
सर्वसामान्यांना कचरा ही संपत्ती कशी होऊ शकते हे कळावे, यासाठी आम्ही गारबेज गॅलरीची संकल्पना आखली आहे. घनकचराव्यवस्थापनाचे महत्त्व सर्वसामान्यांना आजही ठाऊक नाही, कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आजही संकुचित आहे. या गॅलरीत कचऱ्याचे विघटन, विनियोग आणि वापर याचे महत्त्व सांगण्याबरोबरच कचऱ्यापासून खतनिर्मिती, घनकचरा व्यवस्थापन. बायोगॅसनिर्मिती, कम्पोस्टिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यात पर्यावरणविधायक व पूरक दृष्टिकोन असणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट