'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरूनच काम करणे, हे सोपे वाटत असले, तरी ती एक कसरत आहे. ती साधावी लागते. ती साधत असताना, 'तू घरातूनच काम करतेस,' हेही ऐकून घ्यावे लागते. हे सारे असले, तरी अनेकींसाठी हा चांगला पर्याय आहे. घरून काम करताना माझ्यासमोर आलेल्या अडचणी, त्यांवर मी शोधलेला मार्ग कदाचित काहींना उपयोगी ठरेल. सायली परांजपे काळ १३-१४ वर्षांपूर्वीचा. लोकलमध्ये दिसलेला एक बोर्ड, 'वर्क फ्रॉम होम, अर्न सिक्स थाउजंड.' त्यावर फारसा विचारही केला नव्हता. घरात राहून करायची कामे म्हणजे लोणची-पापड किंवा फॉल-पिको एवढ्याच कल्पना. फारतर डीटीपी वगैरे. करिअर होते ते घराबाहेर पडूनच, ही ठाम कल्पना. काळ दहाएक वर्षांपूर्वीचा. एका वेबसाइटसाठी काम करत होते. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडायची वेळ आली होती. ऑफिसमध्ये फोन केला, तर टेक्निकल स्टाफमधला मुलगा म्हणाला, 'घर से भी कर सकती है आप अपडेट.' अरे, हा पर्याय मनात आलाच नव्हता. एखाद्या लेखासाठी मुद्दे काढणे वगैरे कामे घरी केली होती त्यापूर्वी; पण मला वाटते ते माझे पहिले 'वर्क फ्रॉम होम.' मग त्या आणि पुढल्या पावसाळ्यांमध्ये, मध्यरात्रीनंतर मोठा अपडेट आला, तर घरून साइट अपडेट करणे सुरू झालं, तरीही पूर्णवेळ घरून काम करण्याचा विचार शिवलाही नाही. काळ दोन वर्षांपूर्वीचा. माझे आयुष्य पुरते बदललेले. वृत्तपत्रातील नोकरी मुलगा तान्हा असताना सोडलेली. आता तो शाळेत जायला लागलेला, तरीही बाहेर जाऊन नोकरी शक्य नव्हती. एव्हाना आपले काहीतरी असावे, अशी ऊर्मी पुन्हा वर येऊ लागलेली. मुलगा तान्हा असल्यापासून भाषांतराची थोडीफार कामे करत होते; पण आता ठोस वेळ देऊन, कमीटमेंटने काही करावे, असे वाटत होते. त्याचवेळी एका वेबपोर्टलचे काम समोर आले. या कामाबद्दल आकर्षण वाटावे असे मुद्दे बरेच होते; पण आश्चर्य म्हणजे मला सर्वांत आकर्षक वाटलेला मुद्दा होता 'घरून काम करता येईल' हा. तो वर्क फ्रॉम होमचा बोर्ड पाहिला, त्याला बराच काळ लोटला होता. आयटीसारख्या क्षेत्रातल्या मैत्रिणींना घरून कामाचा पर्याय स्वीकारताना बघितलेले होते. मुळात सध्या बाहेर जाऊन काम करणे शक्य नाही; त्यामुळे घरातून का होईना काम करायला मिळणार, याचा आनंद होता. तात्पर्य, काही वर्षांपूर्वी विचारही केला नव्हता, ते वर्क फ्रॉम होम माझ्या आयुष्याचा भाग होणार होते. खरे आव्हान पुढे होते. 'वर्क फ्रॉम होम' या शब्दसंचाला उगाचच कम्फर्टचा वास असतो. 'घरून काम करतेस का, मजा आहे,' असे क्वचित मीही बोलले होते. प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर मात्र यातल्या अडचणींनी नखे काढायला सुरुवात केली आणि हे तेवढे सोपे नाही, असे सांगणारे अनुभव रोज उठून हजर होऊ लागले. मला जाणवले, की मी ठराविक वेळी लॅपटॉप उघडून बसते खरी; पण काम ऑफिसमध्ये व्हायचे त्या वेगाने होत नाही. काहीतरी महत्त्वाचे अपलोड करायचे असताना बेल वाजते. उठण्यावाचून पर्याय नसतो. घरातच आहोत असे म्हणून स्वयंपाकासारखी कामे एकीकडे उरकायला जावे, तर तारांबळ ठरलेली. बारीकसारीक गोष्टी ऑफिसमध्ये पटकन वरिष्ठांना विचारता येत होत्या. येथे फोन, मेसेजेस वगैरे वगैरे. त्यात मुलगा घरी असेल, तर काही विचारायलाच नको. आई लॅपटॉपवर काहीतरी मजेशीर बघत बसली आहे, अशी त्याची ठाम समजूत. मग वैताग, चिडचिड. त्याची रडारड. घरातील आणि बाहेरची दोन्ही कामे एकमेकांमध्ये घुसत आहेत अशी अवस्था व्हायला लागली. कोठून हे काम घेतले, असा विचार पहिल्या महिनाभरात अनेकदा मनात आला. अर्थात, या प्रत्येक गोष्टीवर मात करणे शक्य आहे, हेही हळूहळू कळू लागले. काम सोडायचे नाही, असा पक्का निग्रह मी केला आणि गुंते बऱ्याच अंशी सुटू लागले किंवा त्या गुंत्यांसकट पाय पुढे टाकण्याची कसरत जमू लागली. आता हास्यास्पद वाटते; पण सुरुवातीचा दीडेक महिना मी सकाळी अंघोळ उरकून, बाहेर जाण्याचे कपडे घालून लॅपटॉपसमोर बसत होते. त्याशिवाय आळस जाणारच नाही, असे मला वाटायचे. हळूहळू कामासाठी मनाची तयारी आपोआप व्हायला लागली. मग हा बाहेरचा मेकअप गरजेचा वाटेनासा झाला. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी ऑफिसमध्येही कमी नसतात, हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर घरातील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष शक्य होऊ लागले. मुलाबाबत सांगायचे, तर त्याच्या शाळेच्या वेळात बहुतेक काम पूर्ण करायचा प्रयत्न मी करते. तो शाळेतून आल्यानंतर त्याला वेळ दिला, तर मग त्यानंतर थोडा वेळ काम करायला त्याची हरकत नसते. या प्रत्यक्ष अडचणींची तीव्रता कमी झाल्यावर एक गोष्ट डाचू लागली. आपण शंभर टक्के देऊन काम करत असलो, तरी बाकीचे हे काम फारसे गांभीर्याने घेत नाहीत, याकडे कितीही दुर्लक्ष करू म्हटले तरी 'ती ना, घरूनच तर काम करते,' हा दृष्टिकोन टोचत होता. त्यात आपल्याकडे बाई आणि पुरुष करत असलेल्या कामांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात विनाकारण मूलभूत असा फरक आहे. तो 'वर्क फ्रॉम होम'लाही लागू आहे. अर्थात, या सगळ्याचा सामना ऑफिसमध्येही करावा लागतो हे लक्षात घेतल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते. किमान त्या मुद्दयाशी अडकून पडायला होत नाही. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे आपण घरून करतो, ते काम ऑफिसमध्ये जाऊन केलेल्या कामाइतकेच महत्त्वाचे आहे, हे ठामपणे सांगण्याची गरज अनेकदा भासते. इतरांना आणि स्वत:लाही. त्यात अजिबात संकोच करू नये. अनेकदा एखादे काम दुसऱ्या दिवसापर्यंत पूर्ण करून द्यायचे असते. त्यासाठी वेळाचे नियोजन डोक्यात तयार असते; पण आयत्यावेळी घरी कोणीतरी येते. मग गप्पा, सरबराई यात वेळ निघून जातो आणि रात्री जागून काम पूर्ण करून द्यावे लागते. असे क्वचित झाले, तर ठीक आहे; पण सारखे व्हायला लागले तर त्याला आवर घालावाच लागतो. घरून केलेल्या कामांचेही वेळापत्रक ठरवून घ्यावे लागते आणि शक्य तेवढ्या कसोशीने ते पाळावे लागते. नाहीतर मग याचा ताण तब्येतीवर येऊ लागतो आणि ते होता कामा नये. शिवाय लहान मूल असलेल्यांनी तर स्वत:साठी एक मार्जिन कायम ठेवले पाहिजे; कारण आयत्या वेळी काय इमर्जन्सी येईल सांगता येत नाही. आणखी एक प्रॅक्टिकल मुद्दा म्हणजे, कामासाठी बसण्याची जागा. घरूनच काम करतो आहोत म्हणून कुठेही लॅपटॉप उघडला आणि काम केले, असे अनेकदा होतं. आपण बसतो आहोत, ती जागा आपल्या पाठीसाठी योग्य आहे, याची खात्री करून घ्यावी लागते. नाहीतर त्यातून कल्पनाही केली नव्हती, असे गंभीर आजार होऊ शकतात. घरातून काम करण्याचेही अनेक प्रकार आहेत. एखाद्या कंपनीसाठीच; पण ऑफिसला न जाता घरातून काम करणे वेगळे आणि मी करते त्याप्रमाणे घरातून फ्री-लान्सिंगसारखे काम करणे वेगळे. घरातून नियमित नोकरी करणाऱ्यांसाठी बरेच नियम असतात. ते कितीवेळ लॉग्ड इन आहेत यावर बारीक लक्ष ठेवले जाते. हातातील कामानंतर सहाएक महिन्यांनी मी भाषांतरांची कामे बऱ्यापैकी घ्यायला सुरुवात केली. भाषांतरांबाबत काम हातात येईपर्यंत तुम्ही बांधील नसता; पण एकदा काम हातात घेतले, की तुमच्यासाठी ती कमीटमेंट होऊन जाते. चार ठिकाणांहून घेतलेली कामे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळामध्ये डेडलाइन्स पाळून पूर्ण करायची, तर मनात काही अल्गोरिदम्स घोळवावे लागतात. त्यात घरगुती कामांचीही भर असते. सुरुवातीला गोंधळ होतात. सगळ्या लोकांशी वागताना एक प्राथमिक प्रामाणिकपणा ठेवला, तर कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागत नाही, असा माझा अनुभव. ऑफिसमध्ये जाऊन काम करणे शक्य नसेल, त्यावेळी वर्क फ्रॉम होम हा एक उत्तम पर्याय आहे, अशा मतावर मी आता आलेली आहे. विशेषत: स्त्रियांना गरोदरपणात, मूल लहान असताना काम सुरू ठेवायचे असेल, तर तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेली ही मोठी सोय आहे. घरून काम करून आपण केवळ अर्थार्जनच नव्हे, तर करिअरही करू शकतो. त्याला काही मर्यादाही आहेतच. क्रिएटिव्ह कामांसाठी एकांत हवासा वाटत असला, तरी काही वेळा संवादाची गरज प्रकर्षाने जाणवते. घरातून काम करताना मेसेजेस, ई-मेल्स या माध्यमांतून संवाद होत असला, तरी प्रत्यक्ष चर्चांची सर त्याला येत नाही. ऑफिसमध्ये जात असताना मला प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा संवादाचा हा मार्ग सोयीचा वाटायचा. आता मात्र मी कोणाशीही प्रत्यक्ष बोलायला उत्सुक असते. येत्या काही वर्षांत जेथे आपला लॅपटॉप, ती कामाची जागा, हे समीकरण होऊन जाईल असे म्हटले जात असले, तरी मला ऑफिस ही संकल्पना कायम टिकावी असे वाटते. पाचेक वर्षांपूर्वी याहूच्या सीईओ मरिसा मायर यांनी वर्क फ्रॉम होमवर निर्बंध आणले, तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र, लोक एकत्र येतात, तेव्हा ते अधिक उत्पादनक्षम आणि शोधक असतात, असे कारण त्यांनी दिले होते. त्यात तथ्य आहे. काम कोणत्या प्रकारचे आहे, यावरही ते अवलंबून आहेच. मलाही पुढे घराबाहेर पडणे शक्य होईल, तेव्हा नक्कीच बाहेर जाऊन काम करायला आवडेल, सध्याची वर्क फ्रॉम होम कसरत जमलेली असली तरीही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट