Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 3450 articles
Browse latest View live

त्यांना इम्प्रेस करताना...

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन', असं नेहमी म्हटलं जातं. कोणत्याही नव्या व्यक्तीला भेटताना स्वतःचं वागणं, बोलणं आणि पेहराव या बाबींबाबत साशंक असणं, काळजी घेणं ओघानं आलंच. मात्र, तुम्ही तुमच्या प्रियकर/प्रेयसीच्या घरच्यांना पहिल्यांदा भेटत असाल तेव्हा गोंधळून जाऊ नका. आत्मविश्वासानं त्यांना सामोरं जा आणि या गोष्टींची दखल घ्या.

तुमच्या प्रियकर/प्रेयसीला त्यांच्या घरच्यांबाबत प्रश्न विचारा. त्यांना अधिकाधिक जाणून घ्या, म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी, जडणघडण, सामाजिक-राजकीय मतं, रुची याबाबत जागरूक असल्यानं त्यांच्याशी गप्पा मारताना विषय शोधावे लागणार नाहीत.

त्यांना इम्प्रेस करणं हा हेतू असला, तरी उगाच खोटा आविर्भाव बाळगू नका. तुम्ही आहात तसंच त्यांच्यासमोर वागा. स्वतःबद्दल बढाई मारणं किंवा उगाच ओशाळून जाणं टाळा. मुख्य म्हणजे आत्मविश्वासानं वावरा.

घरी भेटत असाल किंवा त्यांच्याबरोबर बाहेर जात असाल, तर त्या-त्या कार्यक्रमानुसार तुमचा पेहराव असू द्या. तुमच्या पोषाखावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आडाखे बांधले जातात म्हणून कपडे, परफ्युम, चांगले बूट याबाबत चोखंदळ राहा.

टेबल मॅनर्सकडे लक्ष द्या. तुमचे हातवारे, बोलताना होणारे आवाजातले चढउतार आणि समोरच्याला संभाषणावेळी दिला जाणारा आदर यामुळेही तुमची प्रतिमा ठरत असते.

स्वतःची मतं व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचाही आदर करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेहमीच सॉरी म्हणू नका!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

एकमेकांवर कितीही प्रेम असलं, तरी न भांडता राहणारी जोडपी अगदी क्वचितच पाहायला मिळतात. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’अशीच परिस्थिती बऱ्याच जणांची असते, तेव्हा एकाला माघार ही घ्यावीच लागते आणि त्यासाठी ‘सॉरी’या शब्दाचा आधार घ्यावा लागतो; पण या सततच्या ‘सॉरी’ची सवय होऊन बसणं हेसुद्धा काही प्रमाणात चुकीचं आहे. एकदा आपल्याला समजलं, की माफी मागण्यानं सगळ्या समस्या तात्पुरत्या का होईना; पण सुटताहेत, की मग आपण छोट्या-छोट्या करणांवरूनही माफी मागायला लागतो. मग आपल्याला ती सवयच होऊन जाते. काही गोष्टी या माफी मागण्यासाठी नसतात, तर त्या स्वतःसाठी करायच्या असतात आणि त्या केल्याबद्दल दोषी वाटून घेण्यासारखं काहीही नाही. काही गोष्टींसाठी कधीही जोडीदाराची माफी मागू नका. उलट वाद होणार असतील, तर दोघांनी मिळून त्यावर तोडगा काढा. या गोष्टींसाठी माफी मागू नका.

ध्येयवादी असण्यासाठी- आयुष्यात कोणतंही ध्येय असणं चुकीचं नाही. उलट डोळ्यांसमोर काही लक्ष्य ठेवून काम करत राहिलात, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. त्यामुळे तुमच्या जोडीदारासाठी तुमचं ध्येय बाजूला ठेवू नका. यामुळे तुम्ही आयुष्यात एक पाऊल मागे राहाल; पण करिअरकडे लक्ष देत असतानाच, तुमचं नातं फुलतंय ना याकडेही लक्ष द्यायला शिका.

तुमच्या भूतकाळासाठी- भूतकाळ हा काहीही झालं, तरी बदलता येत नाही. त्यामुळे तुमच्या भूतकाळातल्या गोष्टींचा परिणाम तुमच्या सध्याच्या आयुष्यावर होऊ देऊ नका. ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत, त्यांच्यासाठी माफी मागणं, हे चूकच आहे; कारण त्यानं गोष्टी बदलत नाहीत, तर उलट आपल्याला माफी मागायची सवय लागते आणि त्यामुळे नात्यात अडथळा येतो.

मतभेदांसाठी- आयुष्यात काही गोष्टींवर तुमची भिन्न मतं असू शकतात. प्रत्येकच गोष्टीवर तुमचं एकमत झालं पाहिजे, असं नाही. तुमच्या गरजा तुम्ही उघडपणे सांगितल्या पाहिजेत. प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारापेक्षा काही वेगळं वाटत असेल, तर त्यासाठी माफी मागायची गरज नाही. यात तुमचा स्वाभिमान कुठंही दुखावू नका.

अपेक्षा ठेवल्याबद्दल- तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा असते, तेव्हा त्यासाठी प्रत्येकच वेळी माफी मागण्याची गरज नाही. मात्र, याच अपेक्षा तुम्ही वेगळ्या प्रकारे व्यक्त करू शकता. ‘सॉरी; पण आपण कधीच बाहेर जेवायला जात नाही, तुला वेळच नसतो’यापेक्षा ‘तू मला मागच्या महिन्यात बाहेर जेवायला नेलंस, तेव्हा मला खूप छान वाटलं,’अशाप्रकारे अपेक्षा व्यक्त केल्यास त्याचा वेगळा आणि चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल.

प्रामाणिक असण्यासाठी- ज्या नात्यात दोघांनाही आपली मतं व्यक्त करता येत नाहीत, त्या नात्यात एकाची घुसमट ठरलेलीच असते; पण तुमचं स्पष्ट मत मांडण्यासाठी कधीही माफी मागू नका. जेव्हा तुमचा जोडीदार चुकीचा असेल, तेव्हा त्याला त्याची चूक जरूर जाणवून द्या आणि त्यासाठी त्याची माफी मागण्याची गरज नाही. प्रामाणिकपणानं तुमच्या नात्याचा पाया भक्कम व्हायला मदत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोष्ट सांगण्याची गोष्ट

$
0
0

बहुतांश लोक ससा कासव, माकड आणि दोन मांजरी अशा साध्या गोष्टी मुलांना सांगणे जास्त रास्त समजतात. आपल्याकडे पुराणे, रामायण, महाभारत असा गोष्टींचा खजिना आहे. त्यांचाही आपल्याला नक्की वापर करता येतो. काही कल्पना लढवून त्या गोष्टी अधिक रंजकही करता येतात.

केतकी देशपांडे-वस्पटे

गोष्टी ऐकायला आवडत नाहीत, असे मूल सापडणे अवघड. बालपणात गोष्टींवर गोष्टी सांगितल्या गेल्याच पाहिजेत. गोष्टी हे करमणुकीचे माध्यम आहे, असे आपल्याला वाटत असले, तरी त्यातून खूप प्रभावीपणे संस्कार केले जाऊ शकतात.

भागवतामधील गोष्टींसारख्या अजरामर आणि चिरतरुण कथा या पृथ्वी तलावर दुसऱ्या नाहीत. जोडीला रामायण, आनंद वृंदावन चंपु असे ग्रंथ असतील तर काय विचारावे. त्यामुळे माझा गोष्टी संदर्भातला सगळा भर यावरच आहे. एव्हाना माझ्या मुलीला भागवतामधील तिच्या वयानुरूप ग्राह्य असलेल्या सगळ्या कथा माहिती आहेत. या कथांमध्ये आध्यात्म, समाजशास्त्र, राजकारण, भक्ती, भगवद महिमा, मानसशास्त्र, खगोलशास्त्र असे विविध विषय हाताळलेले आहेत. या कथा केवळ ऐकल्यामुळे माणसाची आंतरिक प्रगती होते, याबद्दल दुमतच नाही. माझी मुलगी हृदयाला लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी खूप आवडीने ऐकायची. ती कितीतरी गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायला लावायची. या कथांचीच ही किमया आहे, की त्या कितीही वेळा ऐकल्या, तरी जुन्या किंवा रसहीन वाटत नाहीत.

बहुतांश लोक ससा कासव, माकड आणि दोन मांजरी अशा साध्या गोष्टी मुलांना सांगणे जास्त रास्त समजतात. मला माझ्या मुलीच्या एकंदरच आकलनशक्तीचे कधीकधी नवल वाटते. अगदी मोठ्या व्यक्तींनाही जड वाटतील असे प्रश्न मी तिला या भागवतामधील गोष्टी सांगताना विचारते आणि आमची चर्चा रंगते. अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांचेही ती इतके नेमके उत्तर देते, की मी चाट पडते. एखाद्या सूर्यासारखे हे 'अमल पुराण' झळाळते आहे आणि आपल्या मनात प्रकाश पाडते आहे. या खजिन्यापासून आपण जर आपल्या मुलांना वंचित ठेवणार असू आणि स्वत:ही राहणार असू, तर आपण दोघांचेही मोठे नुकसान करून घेतो आहोत, असे मला वाटते.

गोष्टी नुसत्या सांगण्याशिवाय आपण काही कलात्मक पद्धतींनी त्या मुलांना अधिक रंजक करून सांगू शकतो. यामुळे मुलांमध्ये वेगळाच उत्साह आणि कुतूहल निर्माण होते. ते अधिक एकाग्रतेने गोष्टी ऐकतात, असा माझा कायम अनुभव आहे. माझ्या मते या उपक्रमासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायची गरज नसते; कारण सगळ्या कलाकृती एकदम सहज, सोप्या, कमी वेळात होणाऱ्या आहेत. यासाठी होणारा खर्चही अगदी नाममात्र येतो.

मी हृद्याला गोष्टी सांगताना वापरलेल्या काही कलाकृती :

१. लाकडी पपेट थिएटर : हे बनविण्यासाठी थोडासा खटाटोप असला, तरी माझ्या मते प्रत्येक लहान मूल असलेल्या घरात एक पपेट थिएटर असायलाच हवे. नेटवर पपेट थिएटरची विविध डिझाइन मिळू शकतात. मी निखळलेल्या दाराच्या खालचे प्लाय काढून घरच्या घरी पपेट थिएटर बनवले. मागे खिळे ठोकून पडदा लावला. काही चित्रांनी त्याच्या बाजू सजवल्या आणि शोभेसाठी एक महिरप लावली. बाजारात तयार पपेट थिएटरही मिळतात; पण त्यापेक्षा स्वत: बनवून घेतलेले जास्त चांगले. या व्यतिरिक्त कापडी किंवा खोक्याचेही पपेट थिएटर बनवता येतात.

२. पेपर प्लेट पपेटस : हे एकदम सोपे आहे. हवा तो चेहरा पेपर प्लेटवर रंगवा. आपल्या इच्छेप्रमाणे केवळ चेहरा किंवा पूर्ण शरीर असेही आपण काढू शकतो. केवळ रंग वापरून बनवू शकतो किंवा क्राफ्ट पेपरच्या साहाय्याने इफेक्टस आणू शकतो. त्याच्या मागे अजून एक प्लेट स्टेपल केल्यास हातात घालून ते धरता येर्इल.

३. फिंगर ड्रॉ पपेटस : याचा अर्थ बोटांवर पेनाने चित्र काढणे. एक बोट एका पात्रासाठी देता येते. बोटे नाचवत गोष्ट सांगायची. बोटांव्यतिरिक्त तळ हाताचा उपयोग गोष्टीतला देखावा काढण्यासाठी वापरू शकतो.

४. फिंगर रिंग पपेटस : असे पपेट थिएटर मी विकत घेतले होते. यात बोटात घालण्यासाठी प्लास्टिकच्या अंगठ्या येतात आणि त्यावर चिकटविण्यासाठी स्टिकरही. मी माझ्या पद्धतीने कृष्ण-कालियाची गोष्ट यावर स्टिकर्स लावून बसवली. सोबत पुठ्ठ्याचा देखावाही मिळाला होता. तो घडी मोडून एका मनोऱ्यासारखा उभा राहू शकायचा. त्यातच बोट नाचवण्यासाठी एक खिडकी होती.

५. आइस्क्रीम स्टिक पपेटस : आइस्क्रीम स्टिकवर स्केच पेनने हवे ते पात्र बनवा. या हाताळायला खूप सोप्या आणि आकर्षकही दिसतात.

६. मिनिएचर्स : मला हौस असल्यामुळे मी हृदयासाठी गंमत म्हणून छोट्या जगातल्या गाय, स्कूटर, घर, झाड अशा कितीतरी गोष्टी जमविलेल्या आहेत. गोष्ट सांगताना त्यांचा वापर करते. याव्यतिरिक्त मी शाडू मातीच्या छोट्या प्रतिकृतीही बनवल्या. त्यांचा वापर मला गोष्ट सांगताना करता येतो.

७. प्रिटेंड प्ले प्रॉप्स : प्रिटेंड प्ले म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी बनायचा खेळ. या प्रकारच्या खेळण्यासाठीही मी हृदयाला मडकी, डॉक्टर सेट, मुकुट, सुदर्शन चक्र, ढाल-तलवार, धनुष्य-बाण, कमळाची खोटी फुले, गदा, खोट्या फुलांची माळ, भाजीवालीच्या टोपल्या, नोटा, कमंडलू अशा खूप गोष्टी जमवून दिल्या आहेत. या सगळ्यांचा उपयोग मला गोष्टी सांगतानाही होतो. गंमत म्हणजे हृदया त्यांचा जेव्हा उत्स्फूर्तपणे उपयोग करते, तेव्हा मजाच वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...और वो

$
0
0

हेमा मालिनीने धर्मेंद्रचे, श्रीदेवीने बोनी कपूरचे, शिल्पाने राज कुंद्राचे घर मोडले, असे त्यांच्या पत्नीने आरोप जाहीर केले. अशी जाहीर दूषणे त्यांनी आपल्या नवऱ्यांना दिल्याची उदाहरणे नाहीत. असली तरी अगदी बोटांवर मोजता येतील एवढीच.

पियू शिरवाडकर

'ही बघा हीच, ती जिच्यामुळे तिचे घर मोडले.'

'हिला एवढेही कळू नये, की लग्न झालेल्या पुरुषाच्या मागे लागू नये.'

'काय हे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे दुःखही कळू नये?'

असे संवाद आपल्याला टेलिव्हिजनवरील विविध मालिका, चित्रपट आणि दुर्दैवाने काही घरांच्या तर वास्तवाचा भाग झालेले दिसून येतात. 'घरवाली बाहरवाली', 'सौतन', 'सवत माझी लाडकी' यांसारखे अनेक चित्रपट, नाटके, मालिका आजही अनेक घरांतून बघितली जातात. 'तेच तेच विषय असतात हो,' असे म्हणूनही ते बघणे आपण टाळत नाही; कारण बऱ्याचदा आजूबाजूला देखील हेच चाललेले असते.

आपल्या समाजाने पुरुषांना लग्नाव्यतिरिक्त एखाद्या स्त्रीविषयी आकर्षण वाटणे अगदी लेखी नाही; पण मनोमन स्वीकारले आहेच. आता सतत घराबाहेर राहणार म्हटले म्हणजे आकर्षण, एखादे अफेअर होतेच त्याचा काय एवढा बाऊ करायचा! त्याला वाटत असेल असावी अशी एखादी मैत्रीण, बायको, मुलांना संभाळतोय ना, असे म्हणणाऱ्यांचीही काही कमी नाही. दुसऱ्यांदा 'प्रेमात(?)' पडणारे पुरुष (समस्त पुरुष वर्ग नव्हे) कसे आहेत, याबद्दल पुढील उद्गार काढले जातात.

'छे हो, आमचा मुलगा अगदी नाकासमोर चालणारा आहे हो. हिनेच जादूटोणा केला असेल.'

'आमचे हे अगदी धुतल्या तांदळासारखे आहेत. त्यांना काही बोलू नका. तिनेच भुरळ पाडली असेल.' अशा वेळेस 'आपला तो बाब्या' असे मानले जाते किंवा किमान तसेच आहे, असे इतरांना भासवले जाते. संसार दोघांचा असतो, तो चुकला तर सांभाळून घ्यावे, अशा समजुतीचे डोस आजही स्त्रीलाच ऐकून घ्यावे लागतात. या अवांतर प्रेमात पुरुषाची चूक काहीच नसते. त्याच्या या अवांतर प्रेमातील स्त्रीच सर्वस्वी दोषी असते. पुरुषांच्या वागण्याचे एवढे उदात्तीकरण स्त्रियांनीच केल्याचे याहून मोठे उदाहरण नसावे. येथे दोष कोणाचा, हे शोधायचे नाही, तर येथेही स्त्रीलाच कसे बोल लावले जातात याची जाणीव व्हावी, एवढेच आहे.

परवा टीव्हीवर एका चर्चासत्रात एक महिला म्हणाली, 'आजकाल उठले, की घटस्फोट घे असे झाले आहे. मुली नवऱ्याचे जरा एखादे अफेअर झाल्यावर लगेच घर सोडतात. नाही तर मी अफेअर केले तर चालेल का, असे लगेच विचारतात. ही आपली संस्कृती आहे का? आम्ही पस्तीस वर्षे संसार केला; पण तडजोड केली म्हणून तो टिकला.' संसाराची गरज ही स्त्रीलाच असते, असे आपणच का ठरवतो आणि अनेक मनांवर बिंबवतो? असल्या गोष्टी आपल्या संस्कृतीत कोणी सांगितल्या आहेत? अशावेळेस आपल्या संसाराचा गाडा आणि त्याची दोन चाके हे उदाहरण कोठे जाते? एक चाक पंक्चर झाले, तर गाडी चालेल का? चाक बदलालच ना? मग एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला मान देत नसेल, तर तडजोड का करावी? आपला जोडीदार आपल्या घरी बायको, मुले आहेत याची तमा बाळगत नसेल, तर त्यात बाहेरच्या स्त्रीचा काय दोष, हे न समजण्याइतके आंधळे प्रेम काय कामाचे.

आमच्या ओळखीतल्या एका महिलेच्या नवऱ्याने आपल्या बायकोच्या बहिणीशी गुपचूप लग्न केले, तर या दोन बहिणींनी एकमेकींशी बोलणं सोडले. दोघीही त्याच पुरुषाबरोबर राहतात. त्याच्यापासून झालेली मुले सांभाळतात, एकाच शाळेत एकाच वडिलांचे नाव ही मुले लावतात आणि याचा दोष एकमेकींना देतात; पण एक होऊन असा दगा देणाऱ्या पुरुषाला धडा शिकवत नाहीत. अगदी चित्रपटसृष्टीतही हेच दृश्य बघायला मिळते. पूर्वी हेमा मालिनीने धर्मेंद्रचे, श्रीदेवीने बोनी कपूरचे, शिल्पाने राज कुंद्राचे घर मोडले, असे जाहीर आरोप त्यांच्या पत्नीने केले; पण कोणी आपल्या पतीला अशी जाहीर दूषणे दिल्याची उदाहरणे नाहीत. असली तरी अगदी बोटांवर मोजता येतील एवढीच. ज्याच्याबरोबर साताजन्माच्या आणाभाका घेतल्या, काही महिने, वर्षे ज्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून घर सांभाळले, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला, तो सरळ खोटे बोलून घराबाहेर राहतो. बिझनेस ट्रिपच्या नावाखाली वेगळे संबंध जोपासतो, तो दोषी की तुम्हाला कधीही न पाहिलेली, कुठलेही भावनिक संबंध नसलेली स्त्री दोषी?

अनेकदा आर्थिक स्वावलंबन नसणे, मुले झाली आता काय करणार, माहेरी काही घरगुती अडचणी, तर काही वेळा सासर-माहेरचे फॅमिली स्टेटस या नावाखाली स्त्रिया गप्प बसतात किंवा बसविल्या जातात. जेव्हा आपले हक्काचे माणूस आपला विचार करत नाही, तर बाहेरील व्यक्ती करेल का, हा विचार करून आपण ज्याचे श्रेय त्याला देऊ का? एका प्रसिद्ध मालिकेतील शनाया आणि गुरुनाथमधे शनाया तेवढी घर तोडणारी आणि गुरुनाथ अगदी भोळा, अशी चर्चा महिला वर्ग अगदी हिरीरीने करतो. वरून शनायाला सोडून गुरुनाथने पुन्हा राधिकाकडे जावे आणि राधिकानेही गुरुनाथचा स्वीकार करावा, अशी अपेक्षाही करतो. मराठी बिगबॉसमधील रेशम आणि राजेशमधे फक्त रेशमच वाईट ठरते. अशा ठिकाणी फक्त महिलाच नव्हे, तर पुरुषही स्त्रीलाच दोषी ठरवताना दिसतात.

येथे परत नेहमीचा मुद्दा उपस्थित होतो. पुरुष नेहमी एकमेकांना सांभाळून घेतात, मग हा अभाव आपल्यात का? आपण सगळे खापर दुसऱ्या स्त्रीवरच का फोडतो? आपण जेव्हा दुसऱ्याला एखाद्या परिस्थितीत सरसकट दोष देतो, तेव्हा आपण योग्य वागतो का? अशा परिस्थितीत स्त्रीचा दोष नसतोच असे नाही; पण कुठलाही विचार न करता तिला दोषी ठरवण्याचा हक्क आपल्याला असतो का? की दोघांची सारखीच चूक असते? भावनेचा गुंता सोडवताना त्यात कोण अडकते, याचा विचार आपण करू शकतो. एखाद्या घरात नक्की काय घडले, चूक नक्की कोणाची आहे हे माहीत नसताना आपण बाहेरून एखाद्या व्यक्तीला बोल लावणे तरी टाळू शकतो. इतरांच्या आयुष्यातील घटनांबद्दल जाणून घेण्याची मानवी प्रवृत्ती असली, तरी कोणाचे आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो नाही. त्यात समाजात चालणारी कुजबुज ही वेदना वाढविण्याचेच काम करते आणि नात्यांमध्ये निर्माण झालेला हा तिसरा कोन अधिक पीडादायक करते. समाज आपला एकटेपणा दूर करण्यासाठी निर्माण झाला आहे, एकटे पाडण्यासाठी नाही. तेव्हा या गोष्टी चवीने चघळण्याचा किंवा एखाद्यावर बोचरी टीका करण्याचा मोह टाळलेला बराच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास।

$
0
0

स्त्रियांना याच जन्मी मुक्ती शक्य आहे, हा उदार विचार मांडणारे पुरुष महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेत आहेत, हा आजच्या संदर्भात दिलासा देणारा भाग आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायात रचना करणाऱ्या कवयित्रींची खूप मोठी परंपरा निर्माण झाली.

प्रा. रूपाली शिंदे

अवघाची संसार सुखाचा करीन।

आनंदे भरीन तिन्ही लोक।

स्वत:चे घरदार, गणगोत असलेला संसार आणि शिव-शक्तीच्या समावेशनातून उभा राहिलेला विश्वाचा संसार, असे दोन वेगळे संसार नाहीत, ही वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे. त्यामुळेच प्रपंच विरुद्ध परमार्थ, स्त्री विरुद्ध पुरुष असे विरुद्ध अर्थाचे गट, समूह निर्माण झाले नाहीत. प्रपंच परमार्थाच्या विरोधात असण्याचे कारण नाही आणि परमार्थही प्रपंचाला जाचक, बाधक नाही. 'मी'पण काढून टाकल्यानंतर केलेले कर्म म्हणजे ईश्वर भक्तीचेच एक रूप आहे, एक प्रकार आहे, असा भक्तियोग प्रधान कर्मयोग ज्ञानेश्वरांनी मांडला. प्रपंचातील कोणतेही काम ईश्वराच्या, विठोबाच्या चरणी समर्पित केले, त्याची साक्ष प्रमाण मानून केले, तर अहंकार, गर्व, दंभ अथवा निराशा वाट्याला येण्याचे काहीच कारण नाही, हे वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान भक्ती आणि कर्म यांच्यातील विरोध नाहीसा करते. भक्तिप्रधान कर्मनिष्ठा ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केली. पुढे नामदेवांनी या भक्तिप्रधान कर्मयोगाला सगुण भक्तीची जोड दिली. विठोबाच्या सगुण, साकार रूपाचे नामस्मरण करीत संसारातील नित्य व्यवहार करत जाणे, असे या सगुण भक्तीचे स्वरूप होते. नामस्मरणाच्या माध्यमातून मनावर विठोबाचा अंकुश तर होताच; पण तो सक्तीचा, भीतीचा नव्हता. ईश्वराच्या प्रेमळ सहवासातून प्राप्त झालेल्या सलोकता, समीपता या मुक्तीचा अनुभव देणारी सगुण भक्ती संत नामदेवांनी वारकरी संप्रदायात रुजवली. भक्तिनिष्ठ कर्मयोगाचे तत्वज्ञान आणि ईश्वराच्या सहवासाचा आनंद देणारी सगुण भक्ती आत्मसात करण्यासाठी जात-धर्माची, स्त्री-पुरुष असण्याची पूर्व अट वारकरी संप्रदायाने ठेवलीच नाही. या संप्रदायाने समाजनिर्मित, जात, धर्म, स्त्री, पुरुष हे भेदभाव भक्तिनिष्ठ कर्मयोगाच्या आणि नामस्मरणाच्या योगाने बाजूला ठेवले. वारकरी संप्रदायाने मांडलेला भक्तिनिष्ठ कर्मयोग आणि सगुण भक्तीचा प्रसार समाज, कुटुंब, स्त्री, पुरुष, जात, धर्म अशा सर्व स्तरांवर झाला. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये संत कवयित्रींची संख्या सर्वाधिक दिसते. बाराव्या शतकाच्या अखेरच्या काळातील मुक्ताबाई ते सतराव्या शतकातील बहिणाबाई शिऊरकर अशी एक दीर्घ, सातत्याने अनुभव व्यक्त करणारी संत कवयित्रींची परंपरा आपल्याला दिसते.

हे केवळ वारकरी संप्रदायामध्ये का घडले? आधीच्या आणि तत्कालीन संप्रदायांमध्ये अशी परंपरा निर्माण झाल्याचे दिसत नाही. स्त्रियांना संन्यास घेऊन मठात दीक्षा देणाऱ्या महानुभाव संप्रदायातही स्त्री कवयित्री अपवादापुरतीच दिसते. याचा विचार आज अगदी एकविसाव्या शतकातही करायला हवा. स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्याची महाराष्ट्राची परंपरा कोणती आहे? या मूल्याचा शोध पुरुष कशा पद्धतीने घेत होते? स्त्री स्वातंत्र्याचा शोध घेताना सगळेच पुरुष केवळ विरोधक होते का? स्त्री स्वातंत्र्याचा विचार आणि ईश्वराचे स्वरूप जाणून घेण्याचा स्त्रीचा अधिकार यांचा विचार भक्तिसंप्रदायाच्या संस्थापक संत, सत्पुरुषांनी कसा केला, याचा विचार करायला हवा. स्त्री स्वातंत्र्याच्या वाटचालीतील पुरुषांचा सहभाग, त्यांचा स्त्री देहाकडे, स्त्री जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यातून निदान महाराष्ट्राची, मराठी भाषकांनी रचलेली, स्त्री-पुरुष सहभाग असलेली स्त्री स्वातंत्र्याची परंपरा स्पष्ट होते. स्त्रीला स्वातंत्र्य आणि साधनरूप देणाऱ्या आजच्या जमान्यात ही परंपरा जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींची शिष्या बाईसा हिच्या मुक्तीसंबंधीचे विचार, स्वामींनी स्वत:च मांडलेले आहेत. बाईसा ही स्वामींची निस्सीम भक्त. स्वामींच्या निर्याणाची अफवा ऐकून बाईसेने नदीत देहत्याग केला. तिला आत्महत्येचे पातक लागणार नाही; कारण ईश्वरवियोगाच्या दु:खामुळे तिने तसे केले, असे चक्रधरस्वामी म्हणतात; परंतु त्याचवेळी ते स्त्रीदेह पर्यायाने स्त्री जन्म 'भक्तगुणांचा रावो' असल्यामुळे स्त्रीजन्मात बाईसेला मुक्ती नाही. मुक्ती मिळविण्यासाठी बाईसेने 'सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष जन्म' घेणे आवश्यक आहे. मग तिला मुक्ती शक्य आहे, असेही सांगतात. यावर अधिक काही बोलण्याची आजही गरज नाही. स्त्री देह असणे हा मुक्तीच्या मार्गावरील सर्वांत मोठा अडथळा आहे. स्त्री-पुरुष हा नैसर्गिक भेद समाजजीवनामध्ये, धर्मसंस्थेच्या अंतर्गत निषिद्धतेचे प्रतीक होतो. समाजजीवनात त्यासाठी लागणारी कारणे, युक्तीवाद आकार घेतात. स्त्री स्वातंत्र्याच्या निमित्ताने होणारे विचारांचे अभिसरण समाज, संस्कृतीमध्ये कसे होते, हे बाईसेच्या निमित्ताने समजते.

समाज व्यवहारात, समाजाने निर्माण केलेल्या, रचलेल्या सामाजिक संस्थांमध्ये स्त्री स्वातंत्र्य या मूल्यावरील वाद-प्रतिवाद कसे होतात, हे समर्थ रामदासांच्या उक्तीमधूनही स्पष्ट होते. समर्थ संप्रदायातील वेणाबाई या संत कवयित्री म्हणून आपल्याला माहीत आहेत; पण काव्यरचना करणाऱ्या कवयित्रींची फार मोठी परंपरा या संप्रदायात निर्माण झाली नाही. स्त्री जन्मामध्ये मुक्ती नाही आणि स्त्री कारणे पुरुषाच्या हातून होणारे अक्षम्य अपराध, असा स्त्री असण्याचा अर्थ केवळ शारीर पातळीवरच, देहनिष्ठ विचार ही मराठी भाषक समाजाची परंपरा आहे.

या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाने रचलेली स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारी स्वतंत्र परंपराही लक्षात घ्यायला हवी. ज्ञानेश्वरांनी मांडलेले जीवनमुक्ती संदर्भातील विचार आणि स्त्री स्वातंत्र्य यांचा एकत्र विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर हे स्त्री आणि पुरुष यांच्या आंतरिक क्षमतेचा, आत्मस्वातंत्र्यात्मक विचार करतात. स्त्री आणि पुरुष असा देहनिष्ठ भेदभाव ज्ञानेश्वरांनी केलेला नाही, म्हणूनच स्त्री जन्म हा भक्तिज्ञानातील अडथळा होऊ शकत नाही. स्त्री असणे आणि मुक्तीचा अनुभव घेणे यांचा परस्परसंबंध नाही, हे ज्ञानेश्वर वेगळ्या पद्धतीने सांगतात. ज्ञानेश्वरांचे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी स्पष्ट केले आहेत. 'ज्ञानदेव विदेहमुक्तीच्या कल्पना नाकारतात. जिवंतपणीच आपण कोण आहोत, याचे चिंतन करून ते समजून घ्यावे. त्यामुळे याच जन्मात मोक्षप्राप्ती होईल. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे 'याची देही याची डोळा। भोगीन मुक्तीचा सोहळा।' देह असल्यानसल्यने काही फरक पडत नाही. 'म्हणोनि देह असो अथवा जावो। आम्ही केवळ वस्तूचि आहो।' ही ज्ञानेश्वरांची ग्वाही आहे.'

ज्ञानेश्वर आणि तुकोबांनी मांडलेला जीवनमुक्तीचा, आत्मस्वातंत्र्याबाबतचा विचार हा स्त्री-पुरुष या दोघांसाठी एकच, एकसारखा आहे. स्त्रीदेह असणे ही ईश्वराचे स्वरूप जाणून घेण्यामध्ये न सुटणारी अडचण आहे, या विचाराचे बरोबर दुसरे टोक म्हणजे विदेहमुक्ती. येथे देहापेक्षा आत्मा श्रेष्ठ. म्हणजे धारण केलेल्या देहाला नाकारणे. ज्ञानेश्वर या दोन्ही बाजूंनी केलेला अतिरेकी विचार टाळतात.

जववरी देह आहे तववरी साधन।

करुनिया ज्ञान सिद्ध करा।

असे ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञान घेण्याचे साधन, माध्यम म्हणून देहाचे महत्त्व ज्ञानेश्वर मान्य करतात. तेथे ते स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाहीत. स्त्रियांना याच जन्मी मुक्ती शक्य आहे, हा उदार विचार मांडणारे पुरुष महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेत आहेत, हा आजच्या संदर्भात दिलासा देणारा भाग आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायात रचना करणाऱ्या कवयित्रींची खूप मोठी परंपरा निर्माण झाली. आपल्या परंपरेत स्त्री तमोगुणांचा समुच्चय आहे, अशी एक विचारधारा आहे. स्त्रीच्या कारणे होणारे अनर्थ सांगणारीही एक परंपरा आहे. तसेच

स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास।

साधुसंती ऐसे मज केले।

असे आत्मविश्वासाने सांगणारी जनाबाईंची परंपराही आहे. आपण कोणत्या परंपरेला आपले मानतो, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैफल रंगते तेव्हा...

$
0
0

मैफल रंगते म्हणजे काय, तर गायक आणि रसिक या दोघांनाही त्याचा आनंद मिळतो. रसिकांना उत्तम ते द्यायचे, प्रेक्षकांची नस ओळखून सादरीकरण करायचे आणि श्रवणाचा उच्च अनुभव देणे ही गायकाची जबाबदारी असते. तर भौतिक गोष्टींमुळे इतर रसिकांचा आणि गायकाचा रसभंग होऊ न देण्याची जबाबदारी श्रोत्यांची असते. या दोन्ही बाजू एकमेकांसाठी मनापासून झटतात, तेव्हा ती मैफल रंगतेच रंगते

मंजूषा पाटील

कोणताही कलाकार हा रसिकांच्या प्रेमामुळे, प्रतिसादामुळे मोठा होत असतो. अर्थात, यामध्ये त्याची प्रतिभाही वरच्या स्थानावर येते. गायनाच्या बाबतीत सांगायचे झाले, तर ही प्रतिभा मैफलींच्या अनुभवावर, रियाजामधील समर्पणावर दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते. आम्हा कलाकारांसाठी मैफल हीसुद्धा एकप्रकारची शाळाच असते. सहकलाकारांचे गायन, त्यांची सादरीकरणाची कला, रसिकांचा दृष्टिकोन, त्यांच्याकडून येत असलेला प्रतिसाद या गोष्टी आम्हाला खूप काही शिकवून जातात. या मैफली आम्हाला मोठे करतात, तशाच कधीकधी अचंबित करतात, कधी हसवतात, कधी अंतर्मुख करतात, तर कधी दाद द्यायलाही भाग पाडतात. यामागे असतो तो एकच, मायबाप रसिक! एवढ्या वर्षात अनेक मैफलींमध्ये रसिकांच्या विविध छटा पाहायला मिळाल्या. त्यांच्यामुळे स्वत:मधील प्रतिभेला आणखी आव्हान देण्याची संधीही समोर येत गेली. अशाच काही मैफलींमधील अनुभव मला येथे सांगावेसे वाटतात. त्यांच्याशिवाय हे संगीतवर्तुळ पूर्ण होणारच नाही.

या अनुभवकथनाची सुरुवात मी काणेबुवांनी दिलेल्या सादरीकरणाच्या शिकवणीपासून करेन. माझी पहिली मैफल अक्कलकोटला स्वामींच्या दरबारात झाली. तेव्हा काणेबुवांचे शिष्यत्त्व मी पत्करले नव्हते. कालांतराने ते भेटले आणि त्यांच्याकडे रियाज सुरू झाला, हा प्रवास मी आधीच सांगितला आहे. मग काणेबुवांनी बाळकृष्णबुवा इचलकरंजी महोत्सवात मला गायनाची प्रथम संधी दिली. एका स्त्री गायिकेची मैफल कशी असावी, हे मला बुवांनी सांगितले आणि त्यांनी दिलेल्या या शिकवणीच्या पथावर आजही माझा संगीतप्रवास सुरू आहे. स्त्रीने कसे गावे, तिची अदब कशी असावी, मैफलीत पोषाख कसा ठेवावा, साथीदार यांना दाद द्यायलाच हवी, कोणाला कमी लेखायचे नाही, प्रत्येकाचा मान ठेवायचा, रागांची रचना कशी असावी, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी काणेबुवांच्या शिकवणीत असायच्या. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, रियाज करताना आपल्याला किती त्रास झाला हे दाखवण्याची जागा मैफल नक्कीच नाही. स्वत: गायनाचा आनंद घेतला, तरच रसिकांनाही तो आनंद गायक देऊ शकतो. 'सुधबाणी सुधमुद्रा' असे काणेबुवा नेहमी सांगायचे. कारण नसताना वेडावाकडा चेहरा, विचित्र मुद्रा, हातवारे करून गाण्याची अजिबात गरज नाही. तुमची मैफल श्रवणीय होण्यासोबतच देखणीही असायली हवी, त्यातून प्रसन्न भाव रसिकांपर्यंत पोहोचायला हवेत; कारण रंगमंचावरून तुम्हाला हजारो प्रेक्षक पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर भाव हा नीटनेटकाच असायला हवा, असेही त्यांचे सांगणे असायचे. म्हणूनच आज कितीतरी प्रेक्षक तुमची मैफल हसरी झाली असे मला आवर्जून सांगायला येतात, ही त्याच शिकवणीची पोचपावती वाटते.

मैफलीला मी राग ठरवून गात नाही. ते ठरवू नयेच, हा बुवांचा अट्टहास असायचा. प्रेक्षकांची नस ओळखून मैफलीत ऐनवेळी राग सादर करता यावा, एवढी चोख तयारी असावी. त्यासाठी प्रेक्षकांचा अभ्यास हवा. बुवा माझ्यासोबत प्रत्येक मैफलीला यायचे आणि समोर बसायचे. ते ऐनवेळी बागेश्री गा, मारूबिहाग सुरू कर असे सांगायचे. वय तसे लहान. रिटेकला वाव नाही; त्यामुळे खूप दडपण यायचे. जे करायचे ते उत्तमच. यामुळे माझ्यामध्ये सभाधीटपणा आला. सादरीकरणातील अनेक तंत्र अवगत करता आली. ही केवळ काणेबुवांचीच कृपा आणि विश्वास.

अशीच एक मैफल आठवते. खानापूरला झालेली. तंबोरे जुळेपर्यंत मला काय गायचे आहे, याची कल्पना नव्हती. बुवा कोणतातरी राग सादर करायला सांगतील असा मानस बाळगून असताना, त्यांनी 'जय जय राम कृष्ण हरी' गा, असे सांगितले. रागदारीची मानसिक तयारी असताना अभंग सांगितला. सारा प्रवाहच बदलला. अर्थात, माझा मूडही बदलावा लागला. ती मैफल उत्तम झाली. यामुळे गायकीची जय्यत तयारी आणि हजरजबाबीपणा एखाद्या कलाकाराला किती आवश्यक असतो, हे मनावर कायमचेच बिंबवले गेले. मी साधारण १९ वर्षांची असताना औंधला काणेबुवांचा सत्कार होता. तो महोत्सव रात्रभर रंगणारा होता आणि माझ्या गायनाचा नियोजनात बेत नव्हता. सत्काराचा मूळ कार्यक्रम झाल्यानंतर मी झोपायला गेले. पहाटे पाच वाजता काणेबुवा मला उठवायला आले आणि पहाटेच्या मैफलीत तुला गायचे आहे, असे सांगून निघून गेले. रसिक जाणकार, कलाकारही अव्वल दर्जाचे. ऐनवेळच्या फर्मानामुळे आपली ततपप होणार, ही भीती मनात दाटली. सगळे बळ एकवटून मी अहिरभैरव आणि 'जोहार मायबाप' गायले. गायनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. बुवांनाही आनंद झाला. त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची ती पोचपावतीच होती. अशी बुवांनी माझ्याकडून तयारी करून घेतली आणि मी प्रत्येक कसोटीत मी उत्तीर्ण होत गेले.

इटलीतला नामवंत रावेना फेस्टिव्हल. तिथल्या नागरिकांनी हिंदुस्तानी शास्त्रीय कंठसंगीत ऐकलेले नव्हते. वाद्यसंगीताची त्यांना जाण होती. त्यामुळे मला त्यांना समजेल असे सोपे गायन सादर करायचे होते. तिथल्या आयोजक, संदीप वरदीने नागरिकांना तसे सांगितले आणि आमच्याकडे गायन आवडल्यावर व्वा! क्या बात है! म्हणतात आणि मला तुमच्याकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा आहे, असे सांगितले. त्या मैफलीत मी दीड तास गायले आणि हवा तसा प्रतिसाद मिळाला. शिवाय साधारण तीन मिनिटे टाळ्या थांबेनाच. तेथे मी अक्षरश: भरून पावले. संगीताला भाषा नसते हेच खरे. मनाला भावणे, साद घालणे महत्त्वाचे, ही अनुभूती मला या महोत्सवातून मिळाली. असाच गोव्यात भर पावसातला अनुभव. गाणे सुरू असताना बेफाम पाऊस सुरू झाला. एका मंदिराच्या शेडमध्ये रसिकांनी खच्चून गर्दी केली होती; पण पावसाचे कारण पुढे न करता, स्वत:चा रसभंग न करता आणि माझेही लक्ष विचलित न करता त्यांनी चक्क बसल्या जागी छत्र्या उघडून मैफलीचा आनंद घेतला. हेच सच्चे रसिक आणि त्यांचे सच्चे कलाप्रेम. अशा प्रेक्षकांसाठी गायिका म्हणून उच्च गानकलेच्या अनुभूतीचे देणे लागतेच लागते. आणखी एक किस्सा. मैफल भर रंगात आली असता अचानक लाइट गेले. बराच वेळ जाणार असे दिसत होते आणि मधे वेळ गेल्यानंतर त्या मैफलीचा रंग पुन्हा चढणे शक्य नव्हते. म्हणून मी वाट न पाहता माइकशिवाय गाणे सुरू केले. रसिकांनी भरभरून दाद दिली. 'मंजूषाताई, तुमचा मूळ दमदार आवाज ऐकायला मिळाला आणि कान तृप्त झाले,' अशा प्रतिक्रिया मिळाल्या. रसिकांना नाराज करायचे नाही, हा उद्देश येथे सफल झाला होता.

रसिक गाणे ऐकायला येतात आणि त्यांचे समाधान करणे, त्यांना श्रवणीयतेचा उच्च अनुभव देणे, हे गायकाचे कर्तव्य असते. त्याने ते चोख बजावले, तरच त्याने कलेप्रती असलेली आपली निष्ठा सिद्ध केली, असे मला वाटते. शेवटी, गायक कशामुळे मोठा होतो? रसिकांमुळेच. रसिक सच्चा असावा, तसाच तो जबाबदारही असावा. ही जबाबदारी कशासाठी? तर, इतर भौतिक गोष्टींमुळे इतर रसिकांचा आणि गायकाचा रसभंग होऊ न देण्याची. तेव्हाच मैफल दोन्ही बाजूने फुलते, रंगते, बहरते आणि मनाच्या कोपऱ्यात आठवणींचा एक कप्पा कायमसाठी तयार होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्र कोण, ग्रुप कोणता?

$
0
0

मुले मोठी होऊ लागतात, तसे पालकांना त्यांच्याविषयी काळजी वाटू लागते. त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहे, ते कशा प्रकारच्या लोकांमध्ये मिसळतात, हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटू लागतो. हे बरोबरच आहे; परंतु अचानकपणे असे प्रश्न आल्यानंतर पाल्यांनाही तो अधिक्षेप वाटण्याची शक्यता असते. त्यासाठी या दोघांमध्ये संवाद हवा. तो असल्यास पुढील गोष्टी सुकर होतात.

डॉ. आनंद गोडसे

स्वयंपाकघरातील चर्चा फारच जोरात सुरू होती. सुशांत आज कधी नव्हे तो त्याच्या वडिलांशी म्हणजे अण्णांशी वाद घालत होता.

सुशांत : हे पाहा, तुमची नातवंडे, म्हणून तुम्ही त्यांना लाडावून ठेवता.

अण्णा : तुला नातवंडे झाल्यावर समजेल.

सुशांत : निधी आता तेरा आणि आरोह सोळा वर्षांचे झाले आहेत. त्यांना जबाबदारीची जाणीव नको?

अण्णा : तुझ्या सोळाव्या वर्षी तुला होती?

सुशांत : पण तो काळ वेगळा होता. आम्ही मित्रमंडळी सर्व गोष्टी घरी सांगत होतो. या दोघांचे नेमके मित्र कोण, मैत्रिणी कोण, ते काय करतात, याचा मला काहीच अंदाज नाही.

अण्णा : तुला त्यांच्यासाठी वेळ नाही, हे त्याचे कारण आहे. तू तुझ्या ऑफिसच्या कामात सतत अडकलेला असतोस. तुला आज अचानक सगळी माहिती कशी मिळेल?

सुशांत : पण आरोहचे असे अचानक शांत होणे, न बोलणे काळजी करण्यासारखे नाही का? गेले सहा महिने मी वाट पाहतो आहे, की तो स्वत:हून मला सांगेल; पण तो काहीच बोलत नाही.

असे म्हटल्यावर सुशांतची पत्नी स्नेहल आणि अण्णा यांनी एकदम एकमेकांकडे पाहिले. दोघेही सुशांतबरोबर बसले. जशा गप्पा, चर्चा पुढे सरकली, तशी अण्णा आणि स्नेहलच्या लक्षात सुशांतच्या मनात असलेल्या शंका, भीती आणि थोडीशी खंत लक्षात आली. सुशांतचा दोन्ही मुलांवर राग होता. त्या दोघांचे मित्र-मैत्रिणी, ग्रुप नेमके काय आहेत, हे त्याला कळत नव्हते. आरोह सध्या अशा कोणाबरोबर तरी असतो, ज्यामुळे त्याच्या वागण्यात प्रचंड उद्धटपणा, बेदरकारी आली आहे. त्यामुळेच तो मोठ्यांचा मान राखत नाही, अशी त्याला खात्री होती. त्याच्या मित्र-मैत्रिणींविषयी सहा महिन्यांपूर्वी विचारल्यावर आरोहने सुशांतशी बोलणेच सोडले होते. तो अभ्यास करणार नाही, व्यसने, पार्ट्या अशा मार्गाला लागून स्वत:च्या क्षमतांचा अपव्यय करून घेईल, अशी सुशांतची भीती होती. त्याला आपल्याच मुलांपासून दुरावल्याची खंत वाटत होती.

हे सगळे समजल्यावर अण्णा आणि स्नेहलने हा विषय पूर्ण उलगडण्याचा निर्णय घेतला.

एका विशिष्ट वयात, अकरा-बारा वर्षांनंतर मुला-मुलींच्या मानसिकतेत वेगाने बदल होतात. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त मोकळ्या जगात वावरताना तेथील घटना, व्यक्ती, परिस्थिती यांचा स्वत:, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. आपले मित्र-मैत्रिणी निवडण्याची संधी मिळाल्यामुळे योग्य-अयोग्यतेच्या चाचणीमधून मुले-मुली स्वत:ला पडताळून पाहत असतात. त्यांचे हे जग निर्माण होत असताना ते कुटुंबापासून थोडी दुरावल्याची भावना कुटुंबातील विशेषत: आई-वडिलांना अधिक प्रकर्षाने जाणवते. या भावनिक दुराव्यामुळे आपले मूल आता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तयार होत आहे, आपण त्यांच्या जन्मापासून त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन ते आपली स्वतंत्र निर्णयक्षमता तयार करत आहेत, अशा सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता असते.

गप्पा थोड्या पुढे गेल्यावर सुशांतच्या लक्षात आले, की अण्णांना आरोहच्या सगळ्या आवडींविषयी माहीत आहे. अण्णा त्याच्या सर्व मित्र-मैत्रिणींना भेटले आहेत. अधूनमधून भेटतातही. अण्णांना ज्याप्रमाणे आपली टोळी माहीत आहे, तसेच त्यांना आरोह आणि निधीच्या सर्व बातम्या असतात.

- काळानुरूप बदलत्या परिस्थितीचे आकलन नव्या आणि तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून करता यायला हवे.

- तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडियाच्या त्यांच्या जगाची ओळख, अभ्यास आणि समज यांपासून संपूर्ण अनभिज्ञता ठेवण्यापेक्षा मैत्रीपूर्ण संवाद ठेवायला हवा.

- तरुण वयाच्या मुलामुलींच्या आकांक्षा, स्वप्ने, त्यांच्या आनंदाच्या कल्पना नेमक्या कशा आहेत, त्यातील संभाव्य धोके काय आहे, याविषयी मोकळेपणाने गप्पा मारता याव्यात, एवढे मोकळे नाते पालक व मुलामुलींमध्ये असणे श्रेयस्कर आहे.

- या तरुण वयात त्यांचा दिनक्रम, कार्यक्रम यांविषयी मनापासून रस घेऊन, त्यांचा अभ्यास, मानसिक स्वास्थ्य, त्यांची नाती, मैत्री हे समजून घेण्याएवढा विश्वास निर्माण करणे ही या नात्याची गरज आहे.

- आपल्या पालकत्वाव्यतिरिक्त आपल्या मुला-मुलींच्या बौद्धिक, मानसिक प्रगल्भतेसाठी आवश्यक अशा मार्गदर्शक व्यक्तींबरोबर त्यांचा संवाद आवश्यक आहे.

सुशांतचा राग अचानक शांततेत रूपांतरीत झाला. आरोह आणि निधीच्या मित्र-मैत्रिणींविषयीच्या शंका सोडून तो अचानक आत्मपरीक्षण करू लागला. आरोह आणि निधीबाबतच्या तक्रारींची दुसरी बाजू त्याच्यासमोर आली होती. तो स्वत:वरच हसला. त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला स्वत:कडेच सापडू लागली. दुसऱ्या दिवशी सुशांतने स्व:हून आरोहला हाक मारली. सर्वांनी मिळून एका चित्रपटाला जाण्याचे ठरविले. सुशांतला मनातून एकदम हलके वाटू लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुष्काचे काय चुकले?

$
0
0

विराट कोहलीने ट्विटरवर एक व्हिडिओ टाकला. शेजारी असलेल्या गाडीतून प्लास्टिक बाहेर टाकणाऱ्या व्यक्तीला अनुष्काने सुनावल्याचा तो व्हिडिओ आहे. त्यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटल्या. अनुष्कावर टीका झाली. हे सारे वाचून मनात प्रश्न आला, 'अनुष्काचे काय चुकले?'

संयोगिता भावे

सकाळी सकाळी दराची बेल वाजली म्हणून मी उठले. केर दिला आणि घरात जात होते, तर शेजारच्या फ्लॅटमधील काकू म्हणाल्या, 'तू रात्रीच जिन्यावर केर का नाही ठेवत?' हं, असे म्हणत घरात आले. खरेतर त्यांना सांगावेसे वाटत होते, रात्री जिन्यात एवढा केर ठेवलेला असतो, की जिन्यावरून चालणे कठीण होते; पण या लोकांना कितीही सांगितले, तरी पटणे अवघडच आहे. त्यांचे उत्तर एकच, 'आमच्या घरात केर ठेवला, तर घाण वास येतो; म्हणून बाहेर ठेवतो.' थोडक्यात काय आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि दारात घाण करायची. बाहेर पडले, की सगळीकडे केराचा वास. आपण नाकाला रुमाल लावतो आणि निघून जातो. हा वास का येतो, असा विचार खरेच किती जण करतात? पाऊस सुरू झाला, की याच केरामुळे पाणी तुंबते; पण आम्ही बदलणार नाही.

परवा सहज टि्वटर पाहत होते. विराट कोहलीने केलेली पोस्ट वाचली आणि व्हिडिओही बघितला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कारने जात असताना शेजारून जाणाऱ्या कारमधून एका माणसाने प्लास्टिकचा केर बाहेर टाकला. अनुष्काने गाडी थांबवली आणि त्या माणसाला 'रस्त्यावर असा कचरा टाकणे चुकीचे आहे,' असे सांगितले. त्यावर प्रत्युत्तर-उत्तरे झाली. हे सारे विराटने त्याच्या मोबाइलवर शूट केले. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया वाचून खूप वाईट वाले. या दोघांना प्रसिद्धी हवी आहे, म्हणून ही पोस्ट केली आहे, अशी टीका काही लोकांनी केली होती. खरेच? या दोघांना प्रसिद्धीची खरेच गरज आहे? सामाजिक बांधिलकी म्हणून तिने हे केले. आपण मात्र असा विचार करत नाही; कारण सामाजिक बांधिलकी, ही आपली जबाबदारी असते, असे आपल्याला वाटत नाही. जे काही करायचे आहे, ते सरकारने. ते काम सरकारचे आहे, असेच आपण समजतो.

बरेचदा उचभ्रू, सुशिक्षित लोक असे वागत नसतील, असा एक गैरसमज असतो. तसे खरेच आहे का? मध्यंतरी एक अनुभव आला. मी रिक्षाने जात होते. रिक्षाचालक माझ्याशी मोदींच्या स्वच्छता अभियानाविषयी बोलत होता. मला म्हणाला, 'मॅडम मेरा भी बहोत योगदान हैं इसमे. मोदीजी बहोत ही अच्छा काम कर रहे हैं.' तुम्ही काय करता, असा प्रश्न मी विचारला. त्यावर त्याने उत्तर दिले, 'मी माझे घर आणि गल्ली एकदम स्वच्छ ठेवतो. कोणी कचरा फेकला, तर रागावतो. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवायला सांगतो. आमच्या गल्लीत रोज कचऱ्याची गाडी येते. त्यामध्ये असा वेगळा केलेला कचरा टाकायला सांगतो.' मी मनात म्हटले, या माणसासारखा विचार साऱ्यांनी केला, तर देश नक्की बदलेल. सगळीकडे स्वच्छता असेल. हे बोलत असताना त्याच्या तोंडात माव्याचा तोबरा होता, हे लक्षात आले. सिग्नलला रिक्षा थांबली आणि त्याने रस्त्यावर माव्याची पिचकारी मारली. त्याचे स्वच्छता आंदोलन तेथेच संपले. मी त्याला म्हटले, 'तुम्ही तुमचे घर, गल्ली स्वच्छ ठेवता, मग हा रस्ता, हे शहर हेही तुमचेच आहे ना?' त्यावर त्याने विचारले, 'मॅडम, रस्ते आणि शहर स्वच्छ ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे ना?' त्याला तेथेच साष्टांग दंडवत घालावासा वाटले. त्याला मी काही गोष्टी समजावल्या आणि त्यावर 'असे पुन्हा घडणार नाही,' असे त्याने आश्वासन दिले. त्याला माझा मुद्दा पटला होता.

मधे एकदा सिंगापूरला गेले होते. एअरपोर्टवर लगेज बेल्टपाशी एका लहान मुलाने बिस्टिकच्या पुड्याचे वेष्टण टाकले. त्याच्या आईने ते उचलायला लावले आणि म्हणाली, 'अरे, येथे असा कचरा टाकायचा नसतो. हा आपला देश नाही. येथे असा कचरा टाकला, की शिक्षा होते.' आपल्या देशातही रस्त्यावर केर टकणाऱ्याना शिक्षा केली पाहिजे. अजून एक किस्सा ऐकला. तो किती खरा हे माहीत नाही; पण सांगते. एकदा अमिताभ बच्चन कारने जात होते. सिग्नलला गाडी थांबली. शेजारच्या मोठ्या कारमधून एका बाईंनी प्लास्टिकची पाण्याची बाटली खाली टाकली. अमिताभ गाडीतून उतरले. त्यांनी ती बाटली उचलून तिला दिली आणि म्हणाले, 'ही बाटली तुमच्या गाडीतून खाली पडली. रस्त्यावर कचरा टाकू नका.' त्यावर दिलगिरी व्यक्त करावी, चूक सुधारावी हे करण्याऐवजी त्या बाई म्हणाल्या, 'मला तुमची सही द्या ना.' हा किस्सा ऐकल्यावर कमाल वाटली.

आपल्या खरेच काही कळत नाही, की दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय वाटतो आपल्याला, असा प्रश्न पडतो. आमच्या सेटवर आम्ही जेवत होतो. एका कलाकाराच्या ताटात केस निघाला. ती तो तेथेच टाकायला लागली. मी म्हटले, 'बाहेर कचऱ्याची पेटी आहे. तिकडे टाक तो.' त्यावर ती म्हणाली, 'काय होते त्याला? आपणच आहोत ना येथे?' यावर आपण बोलणार तरी काय?

आपण काही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या, आवर्जून केल्या, तर स्वच्छता राखणे अजिबात अवघड आहे. आपली पर्स किंवा सॅकमध्ये छोटीशी पिशवी ठेवणे आपल्याला शक्य आहे. बाहेर कचराकुंडी नसल्यास पाण्याची रिकामी बाटली, वेफर्स किंवा बिस्किटाची वेष्टणे, बिले असा रस्त्यावर टाकला जाणारा कचरा त्या पिशवीत ठेवता येईल. कचराकुंडी दिसल्यास किंवा घरी आल्यानंतर तो तेथे टाकता येईल. वसईच्या समुद्रकिनारी एक अमेरिकी जोडपे दर रविवारी स्वच्छता करते. आपल्याला ते जमणे अशक्य आहे का?

अनुष्काने व्हिडिओ टाकल्यानंतर त्या व्यक्तीने आणि त्याच्या आईनेही नंतर तिच्यावर टीका केली. अनुष्का आणि विराट यांनी प्रसिद्धीसाठी हे केल्याचे बोलले गेले. त्यांना काही जणांनी पाठिंबा दिला. हे आपल्याला खरेच बरोबर वाटते का? व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने त्यांना कचरा टाकण्यावरून सुनावलेले दिसते. हे चूक नक्कीच नव्हते. आपले शहर, आपले गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, हे लक्षात कधी येणार, हा चर्चेचा खरा मुद्दा असायला हवा. जी गोष्ट लहान मुलांच्या लक्षात येते किंवा परदेशी असल्यावर आपण आवर्जून पाळतो, ती गोष्ट आपल्या देशात, आपल्या शहरात पाळण्यास हरकत नसावी. सार्वजनिक स्वच्छता ही खूप महत्त्वाची, आपल्या वैयक्तिक आरोग्याशीही जोडलेली बाब आहे. घर, गल्ली, शहर स्वच्छ असल्यास आरोग्याचे बरेच प्रश्न सुटू शकतात. साथीचे रोग आटोक्यात राहतात, हे सर्वांनाच माहीत आहे. गरज आहे ती माहीत असलेली गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची. एकदा ती गोष्ट आपण मनापासून स्वीकारली, की अनुष्का चुकली, असे वाटणार नाही. तिच्या बोलण्याचा त्रास होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कासवाच्या चालीने जानकीला सापडलेला किनारा

$
0
0

कासव हे एक प्रतीक आहे न कंटाळता हळूहळू चालण्याचे. 'कासव'मधील जानकीला त्याच्या आधारानेच किनारा सापडतो. ती मानवेंद्रची आई होते आणि त्यालाही त्याच्या कोषातून बाहेर काढते. आपल्याला आपले गाणे समजणे आणि ते खुलेपणाने गाता येणे, हे महत्त्वाचे. दोघांना ते सापडते आणि त्यांचे जग बदलते.

सुमित्रा भावे

जानकी (इरावती हर्षे) ही 'कासव' या चित्रपटाची नायिका. जानकी म्हणजे जनकाची मुलगी. आपल्या पुराणकथेत जनक राजा अत्यंत अभ्यासू म्हणून ज्ञानी. अत्यंत वैभवसंपन्न आणि सखोल ज्ञानी म्हणून विरागी, असे त्याचे वर्णन आहे. त्याची मुलगी जानकी. ही भूमी नांगरताना सापडलेली मुलगी त्याने आपलीशी केली, तिचा सांभाळ केला, तिला वाढविली, ती जानकी. 'कासव'मधील जानकीने स्वत:च्या मनाची भूमी नांगरताना रस्त्यात सापडलेल्या मुलाला निरपेक्षतेने आपलेसे केले. त्याच्या निराशेच्या आजारात त्याला सांभाळत, अलगद बाहेर काढले.

जानकी ही उच्च मध्यमवर्गातील, सुशिक्षित, आधुनिक जीवनशैली असलेली स्त्री. जग बघितलेली. अमेरिकेत नवऱ्याचा मोठा व्यवसाय. तो सधन, यशस्वी व्यावसायिक. संपन्न होऊन जीवनाचा भरभरून उपभोग घेण्यात वाईट काय आहे, हा त्याचा प्रश्न रास्तच आहे. या विचारात दोष काहीच नाही; पण यातून स्वकेंद्रित जीवनशैली तयार होते की काय? उपभोगाची नशा वेगळीच. वेग वेगळाच. त्या चक्राच्या झोलात भयाचाही उन्माद चढतो की काय? उपभोग संपला, की एक हँगओव्हर येतो. त्याची दमणूक, पोकळी. स्वत: व्यवसाय करत नसलेल्या गृहिणीला यशस्वी पुरुषाच्या या जीवनचक्राबरोबर इच्छा असो वा नसो, धावावे लागणार आहे. तिच्या दमणुकीचे स्वरूपच वेगळे. चक्रातल्या पुरुषाला आपल्याभोवती विश्व फिरते आहे, असा विजयी भास होत असताना एखाद्या स्त्रीला या चक्राच्या वेगाबरोबर तिची होणारी फरफट व चक्राची दमवणारी गती दिसत असणार. असा हा जानकीचा अनुभव आहे. मुलगा अमेरिकी पद्धतीप्रमाणे सोळा वर्षांचा झाल्यावर घर सोडून मित्रांबरोबर राहायला गेला आहे. कदाचित 'घर सोडून' हे वर्णन चुकीचेच आहे. आत्ता कोठे त्याला (मित्रमंडळी स्वत: निवडलेली असतात. आई-वडील, नातेवाईक जन्माबरोबर सक्तीने चिकटतात) 'स्वत:चे घर' मिळते आहे. जानकीच्या एकटेपणाचे भान ना मुलाला आहे, ना नवऱ्याला. एक दिवस जानकी भारतात येऊन राहण्याचा निर्णय घेते. तेथेही तिच्या लक्षात येते, की नातेवाइक, जुने मित्र-मैत्रिणी आपापल्या जगण्यात गर्क आहेत. पुन्हा ती एकटीच. जानकी म्हणते, 'लोकल, ट्रेन बघितली, की तिच्यासमोर उडी घ्यावीशी वाटायची. सुरी हातात घेतली, की मनगट कापून घ्यावेसे वाटायचे.' निराशेतून संताप. तो स्वत:शिवाय कोणावर काढायचा? पण ती जानकी होती. तिने स्वत:कडे, स्वत:च्या अस्वस्थतेकडे बघितले आणि स्वत:ला बजावले, की या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्यासाठी संतापून जगणे संपविणे हा मार्ग नाही. स्वत:चे प्रयत्न पुरेसे ठरत नसतील, तर यातून बाहेर येण्यासाठी इतरांची मदत घ्यायला हवी. हे इतर कोण, तर प्रशिक्षित तज्ज्ञ किंवा आपल्याविषयी सहानुभूती असलेली आपल्या प्रेमाची माणसे. आपले दु:ख, ताण स्वत:पाशीच ठेवले, तर त्याच्यावर बुरशी चढेल, त्याला मोकळी हवा द्यायला हवी. म्हणजे ही भावना, हा कोंडमारा स्वत:वर सक्ती करून दुसऱ्यापाशी व्यक्त केला पाहिजे. जानकी स्वत:ला ढकलून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाते. पहिल्यांदा कासवाप्रमाणे अस्वस्थतेची जाणीव झाल्यावर प्रथम स्वत:चेच निरीक्षण करण्यासाठी निष्क्रिय होते. अशी कशी मी? स्वत:चे आयुष्य नीट जगू शकत नाही, या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर येते. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, हळूहळू बाहेरचे जग बघायला लाग. ते जग फार भयंकर नाही. त्यात मैत्र आहे. आनंद आहे. तुझ्यातील आनंद शोध, तो दुसऱ्याला दे. ते त्यांचा आनंद तुला देतील. तू दुसऱ्याचे एकटेपण कमी कर. तुला दुकटेपण मिळेल.

या जानकीचा विचार करता करता, मलाच आपल्या भल्या पूर्वजांनी वापरलेल्या भाषेचा अर्थ लागतो. 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही,' हे काय आहे? हे कोणी कोणाला म्हणायचे? तर हे आपण आपल्यालाच म्हणायचे. 'मी स्वत:चा छळ करणार नाही. दुसऱ्याचा छळ करणार नाही. कोणालाच परीक्षेत उनुत्तीर्ण ठरवणार नाही. कासवासारखी न कंटाळता हळूहळू चालत राहीन.' जन्मलेल्या प्रत्येकाने गर्भातच जगण्याचा वसा घेतला आहे. तो मधेच टाकून कसा चालेल? यातून हळूहळू कासवाच्या गतीने, कासवाचे प्रतीक उमटत गेले आणि अधिकाधिक स्पष्ट आणि समर्पक होत गेते.

निसर्गाने कासवाची उत्पत्ती डायनॉसॉरच्या आधी केली. कासव हा जगातील सर्वांत अहिंसक प्राणी. धोका वाटला, तर तो स्वत:ला मिटून घेतो; पण दुसऱ्यावर हल्ला किंवा प्रतिहल्ला करत नाही. कासवे लहान असताना छोटे मासे वगैरे जे मिळेल ते खातात. काय खावे हे शिकविण्यासाठी त्यांची आई जवळ नसते. कासव मोठे होऊ लागते, तसे ते शाकाहारी बनते. समुद्रातील शेवाळे, इतर घाण खाऊन ते समुद्र स्वच्छ ठेवण्याचे काम करते. कासव स्वत:च्या संरक्षणासाठी पाठीवर स्वत:चेच कवच घेऊन फिरते. जगात सर्वांत जास्त वर्षे जगणारा प्राणी म्हणजे कासव. या कासवाचे अंतरंग मऊ असते. म्हणे चवदार असते. ते खाण्याची माणसांना चटक लागू लागली आहे. कासवीण ही किनाऱ्याच्या वाळूत अंडी घालते. तिला पाण्याबाहेर जास्त काळ राहता येत नाही; त्यामुळे अंडी तेथेच सोडून तिला समुद्रात परतावे लागते. दिवस भरले, की अंडी फुटून पिल्ले बाहेर येतात. आपली आपण समुद्रात धाव घेतात. पोहायला-जगायला शिकतात. माणूस ही समुद्राकडे निघालेली पिल्ले पकडून खातो; पण माणूस सहृदय आणि निरपेक्षही आहे. या सहृदय माणसांना या पिल्लांना 'तशा' माणसांपासून वाचवावे लागते. ही पिल्ले वाचली, तर त्यांची मोठी कासवे होतील, तर समुद्र स्वच्छ राहील, तर निसर्गाचे चक्र नीट चालेल. दत्ताभाऊ हे एक गांधीविचारी कोकणामध्ये असे कासवांच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे काम करत आहेत. जानकीची त्यांच्याशी सहज गाठ पडते. तिला त्यांचे काम आवडते. ती त्यामध्ये सहभागी होते.

तिला रस्त्यात आजारी झालेला, आत्महत्येचा प्रयत्न केलेला, निराशेच्या गर्तेत गेलेला मानवेंद्र (आलोक राजवाडे) नावाचा, साधारण तिच्याच मुलाच्या वयाचा मुलगा सापडतो, तेव्हा ती या कामालाच निघाली आहे. मी मानवला सांगते, की कासविणीने तिची पिल्ले बघितलेलीच नसतात. तिला समुद्रात एखादे पिल्लू दिसले, की हे आपलेच आहे की काय, असे वाटते आणि तिच्या डोळ्यांत पाणी येते. त्यामुळे तिच्या डोळ्यांत सतत पाणी असते. असे आईपण मानवेंद्र जानकीत जागवितो. जानकी दत्ताभाऊंना म्हणते, 'यापुढे कुटुंबाची व्याख्या बदलायला हवी. नुसत्या रक्ताच्या नात्याने जी माणसे एकत्र येतात, त्यांना कुटुंब म्हणणे पुरेसे नाही. मनाच्या नात्याने एकत्र येणाऱ्या माणसांनाही कुटुंब म्हणायला हवे. आज ही नाती रक्ताच्या, जातीच्या पार गेली आहेत, हे खरेच आहे. पूर्वी प्रत्येकाच्या कुवतीनुसार काम घेतले जाई आणि गरजेनुसार लाभ दिला जाई, हे कुटुंबाचे वैशिष्ट्य होते. कुटुंबात प्रेम, काळजी, त्याग यांना महत्त्व असते, असे काल काय आणि आज काय, हेच मानले जात होते. त्यातील नाती 'टच अँड गो' नसतात. कुटुंबाची नाती तत्कालिक स्वरूपाची नसतात. कायमस्वरूपाची असतात. खोल असतात. आपलेपणा देतात. रक्ताशिवायच्या कुटुंबातही हे सारे आले, तर त्याला कुटुंबाची संज्ञा शोभेल, नाहीतर आज समाज (सर्व देशातील, सर्व थरातील) तात्पुरत्या सुखाच्या ओढीने ग्रस्त होऊन आजारी पडतो आहे. अशा समाजात निराशेच्या आणि आत्महत्येच्या आजाराची साथ झपाट्याने पसरते आहे.'

मानवला (मानवेंद्र) प्रश्न पडला आहे, 'माणसे अशी का असतात?' जानकी विचारते, 'अशी म्हणजे कशी?' मानव म्हणतो, 'दुष्ट आणि दु:खी. त्यांना स्वार्थापलीकडे काही दिसतच नसते.' जानकी म्हणते, 'तू कुठे दुष्ट आहेस? तू दु:खी आहेस.' स्वत:च्या दु:खापुढे (ते दु:ख अनेक कारणांनी स्वत:च ओढावलेले असते) माणूस आंधळा होतो. मग दुष्ट होऊन दुसऱ्याला दु:ख देण्यास मागेपुढे पाहत नाही. प्रेम आणि बांधिलकी यांचा तोल निसटलेला असतो, हे त्याचे मूळ कारण. मग ते प्रेम, वस्तू, काम, व्यक्ती, कल्पना कशाचेही असो. माणूस सतत हा तोल साधण्याची कसरत करत असतो. त्यात सुखदु:खाचे झोले असतात. संगीताच्या तालात 'काल' असतो. एक पोकळ अवकाश. तसा तो जगण्यातही असायला हवा. कासवाला तो उमजला आहे. त्यानेच तोलाबरोबर तालही साधला जातो.

काही वेळा तज्ज्ञांपेक्षाही अनुभवी, जे त्याच अनुभवातून गेले आहेत, अशांशी आपल्या मनाचे ताण, शंका, कुशंका बोलणे सोपे होते. ते समंजस, विवेकी असतील, तर अस्वस्थ माणसाला त्यांच्याशी मोकळेपणाने अगदी मनातील कुरूपही संकोच न बाळगता बोलता येईल. मग त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा विचारही करावासा वाटेल. ते विवेकी माणूस अनेकदा न विचारलेल्या प्रश्नांची कल्पना करूनही संवाद साधू शकेल. तसा संवाद मानव आणि जानकी यांच्यात होतो. मानव हळूहळू निवत जातो. एसटी स्टँडवरच्या अनाथ चहावाला पोऱ्या परशाशी दोस्ती करू शकतो. जानकीला अचानक अमेरिकेला परत जावे लागते. तिचे जाणे एवढे अचानक होते, की त्यांना एकमेकांचा निरोपही घेता येत नाही. जानकी गेली हे समजल्यावर पहिल्यांदा मानवचे डोळे वाहायला लागतात. नंतर लगेच किनाऱ्यावरून समुद्राकडे तुरू तुरू धावणारी कासवाची पिले पाहून त्याचा आणि परशाचा चेहरा मावळत्या सूर्यप्रकाशात उजळून निघतो. सावकाश चालणारी कासवे जानकी आणि मानव या दोघांनाही निवांत जगण्याची समज देतात.

मानवला सुखदु:खात शब्दाशिवाय खुल्या आवाजात लकेरी घेण्याची सवय आहे. त्याच्या लकेरी म्हणजे त्यांचे गदगदून आलेले रडणे आहे. जानकी त्याच्या या रडण्याला शब्द देते (गीतकार : सुनील सुकथनकर)

अपनेही रंग में नहाऊं मैं तो

अपनेही संग में गाऊं...

दोघांनाही आपापले गाणे सापडले आहे. वेगळे, तरी सारखे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काल नको होती, आजही नकोच आहे

$
0
0

मुलगी नको, हा नारा आजही अनेक ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतो, तर काही ठिकाणी छुपा. लगतच्या काळात अशा काही घटना समोर आल्या आणि आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद मनात आहेच, हे सिद्ध झाले.

वंदना घोडेकर

चौथीही मुलगी झाली म्हणून उंबऱ्याच्या आतही न घेता आई - वडिलांनीच तिला हॉस्पिटलमधून तिला थेट अनाथालयाचा रस्ता दाखविला. पुण्यात नुकताच हा धक्कादायक प्रकार घडला. सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडलेला हा प्रकार आजही मुली नकोशाच आहेत, याची दाहकता स्पष्ट करतो. अशा हजारो घटना राज्यात, देशभरात होताना दिसत आहेत.

....

मुलगी झाली म्हणून थेट पत्नीला मारझोड करून तिला घर सोडण्यास प्रवृत्त करण्याची मजल मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाने मारली. पैसा आणि कायदा आपल्या हातात असल्याची दर्पोक्तीही या पोलिस कर्मचाऱ्याने केल्याने, साहाय्यक विक्रीकर निरीक्षक असलेल्या पत्नीला नाइलाजाने माहेरी येऊन पोलिसांत फिर्याद देण्याची दुर्दैवी वेळ आली होती.

.....

बेंगळुरूमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा गर्भपात घडविण्यासाठी तिच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. या तरुणाला एका भोंदूबाबाने त्याच्या प्रेयसीच्या पोटात वाढणारे बाळ ही मुलगी असून, तिचा जन्म झाल्यास त्याचे दुर्दैव सुरू होईल, असे सांगितले होते. त्यामुळे त्याने प्रेयसीला गर्भपात करायला सांगितला. तिने त्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली.

.....

नकोच ती मुलगी, या मानसिकतेमुळे आजही अशा अंगावर काटा आणणाऱ्या घटना आजूबाजूला घडताना पाहून समाजमन सुन्न होते. काही काळ हळहळ व्यक्त करते. एकविसाव्या शतकात येऊन स्थिरावल्यानंतरही ही मानसिकता बदलायला मात्र ते तयार नाही. मुलगी नको याला मानसिकतेला कोणीही अपवाद नाही. शहर, गाव, शिकलेला, न शिकलेला, श्रीमंत, गरीब, जात - पात, धर्म सगळीकडे मुलींना नाकारले जात असल्याचे दिसते. आई, पत्नी, प्रेयसी, बहीण, सून हवी; पण मुलगी नको, या अट्टहासामुळे नकोशा असलेल्या मुलींचा त्या जन्माला येण्याआधीच गळा घोटला जातो. मुलगा होईपर्यंत मुलींना जन्माला घालून, त्यांना जन्मभर नकोशा असल्याची जाणीव करून देत त्यांचे जगणे, उमलणेच कोमेजून टाकले जाते. मुलगा जन्माला आल्याखेरीज पालकांना जन्म सार्थकी लागल्याचे वाटत नाही.

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन, हे वर्षानुवर्षे रुढी, परंपरांच्या माध्यमातून प्रत्येक पिढीत झिरपत राहिले आहे. किंबहुना तशी सोयच करून ठेवण्यात आली आहे. मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढ‌‌विणारा. 'मुलगा व्हावा ऐसा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा,' असे म्हणत मुलाचे स्वागत थाटात केले जाते. 'काय मग पेढे कधी देणार,' अशी विचारपूस करताना कुटुंब वाढ‌‌विण्याच्या तयारीत असणाऱ्यांना 'मुलगा हवा' अशाच अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या जातात. मुलगी झाली म्हणून पेढे वाटणाऱ्यांना वेड्यात काढले जाते. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करणे आणि त्यांचे आनंदून स्वागत करणे, हे कमी मुलींच्या वाट्याला येते. मुलगी नको, हा अट्टाहास आजही गर्भात उमलणाऱ्या कळ्यांना खुडून टाकण्यास भाग पाडतो. प्रसंगी संबंधित महिलेवर शारीरिक, मानसिक अत्याचार केले जातात. कधी मुलीच होतात म्हणून दुसरे लग्न करुन पुत्रप्राप्तीची धडपड सुरूच ठेवली जातो. आज आपण वेगाने प्रगती करत आहोत. नवनवे संशोधन, अंतराळातील वेध घेणारे उपग्रह, थक्क करणाऱ्या गोष्टींची उभारणी, असे स्वप्नवत जगणे एकविसाव्या शतकात जगत असताना मुलींच्या स्वागताबाबत पिछाडीवरच आहोत.

सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याऐवजी गर्भलिंगनिदान करून गर्भपात घडवून करण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर केला जातो. राज्यात गर्भलिंगनिदान चाचणी कायदा कडक करूनही चोरीछुपे, तर कधी राज्याच्या बाहेर जाऊन नकोशा मुलींपासून सुटका करून घेण्यात येते आहे. यामुळे बोगस डॉक्टरांचे, डॉक्टरकीला काळीमा फासणाऱ्यांचे चांगलेच फावते. नकोशा मुलींमु‌ळे लाखो रुपये कमविले गेले. काहींचे गैरव्यहार उजेडात आले. काहींना चाप बसला, तरीही आजही रोजरोसपणे मुलींना नाकारलेच जाते आहे.

म्हैसाळ येथील गर्भलिंग हत्या प्रकरणातील डॉ. खिद्रापुरे खटल्याचे काम पाहणारे विशेष सरकारी वकिल अॅड. हर्षद निंबाळकर सांगतात, 'आजही मुलगी नको, ही समाजाची मानसिकता आहे. याच मानसिकतेचा बोगस डॉक्टर फायदा घेतात. समाजात असा विचार करणारे असल्यामुळेच अशा डॉक्टरांचे फावते. मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करायचा, असा धंदा करणारे लोक आहेत, त्यांचे एजंट्स आहेत. हे एजंट असे लोक शोधून त्यांना ही मदत करतात. दुर्दैव म्हणजे कायदा कडक असूनही त्याची भीती वाटत नाही. आता ही परिस्थिती काही प्रमाणात बदलते आहे.'

आजही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. आज कोणत्याही क्षेत्रात मुली मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात नाव कमविले आहे. आपल्याकडील विवाहसंस्थेच्या प्रश्नांमुळे पालकांना अनेक अडचणी येतात. मुलीचे लग्न, हुंडा, समाजाला दाख‌विण्यासाठी थाटामाटातील लग्न अशी अनेक कारणे मुलगी नको या गोष्टींशी निगडीत आहेत, असे अॅड. निंबाळकर नमूद करतात.

अॅड. माधवी परदेशी सांगतात, 'पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे आजही मुलगी नको ही मानसिकता आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे लोकाचे धन, असे समजले जाते. मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्यांच्या लग्नासाठी पैसे साठविले पाहिजेत, याकडेच लक्ष दिले जाते. मुलीला शिकविले, तरी ती लोकाच्या घरी जाणार, तिला मिळणारा पैसा आपल्या घरात येणार नाही, या विचारातून त्यांना पुरेसे शिक्षणही दिले जात नाही. सध्याच्या काळात मुलींच्या प्रगतीचा आलेख पाहिल्यास त्या कशातही मागे नाहीत हे लक्षात येईल. दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा, विविध क्षेत्रांमध्ये मुली आघाडीवर आहेत. हे चित्र कितीही आशादायक वाटत असले, तरीही मुली आजही नकोशा आहेत. मुलींचे स्वागत व्हायला हवे. त्यांना चांगले शिक्षण, संरक्षण, नोकरीच्या संधी मिळाव्यात, यासाठी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजे.'

निसर्गाने स्त्री-पुरुष म्हणून जन्माला घातले असले, तरी त्यात भेद, उच्च-नीचता समाजाने आणली आहे. स्त्री, पुरुष म्हणून अंगभूत असलेले गुण नक्कीच वेगळे असतील. स्त्रिया पुरुषांपेक्षा नक्कीच कमी नाहीत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात किंबहुना त्या करत आहेत. स्त्रियांचे कर्तृत्व पुरुषांशी बरोबरी करून मोजले जाते. तिच्यावर होणारा खर्च, तिचे शिक्षण, ती परक्याच्या घरी जाणार, तिच्या लग्नाचा खर्च, हुंड्याच्या मोठ्या रकमा, मुलगी म्हणून सांभाळताना गैरप्रकार झाले तर घराण्याची इज्जत कमी होणार, त्यापेक्षा मुलगा कसा बरा, हीच मानसिकता मुलींना नकोशी बनवत आहे. हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. अजून खूप पल्ला बाकी आहे. काही वर्षापूर्वी दूरदर्शन येणारी जाहिरात आठवते, उघडा तिचे डोळे, तिचे हात, पाय, बघू तिला जगाकडे.' आजही ती लागू होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन उन खिचडी

$
0
0

'उन उन खिचडी, साजूक तूप' हे आपण ऐकलेले आहे. आपल्याकडे खिचडी न खाल्लेला माणूस सापडणे अवघडच. लहानपणापासून म्हातापणापर्यंत ही खिचडी आपल्याला साथ देते. भारताबरोबर चीन सोडल्यास आशियायी देशातही ही प्रिय आहे. येथे आलेल्या मुघलांना ही आवडली, ब्रिटिशांनाही आवडली. डाळ आणि तांदूळाचा शोध लागला आणि त्याचबरोबर खिचडीही तयार झाली असावी, असे मला वाटते.

विष्णू मनोहर

खिचडीचा इतिहास हा दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे, असे म्हणतात. भारतात महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, बंगाल, मध्यभारत अशा जवळपास सर्वच ठिकाणी खिचडी हा अतिशय लोकप्रिय असा पदार्थ आहे. म्हणूनच २०१७ साली ग्लोबल फुड एक्स्पो या कार्यक्रमात भारत सरकारने खिचडीला 'इंडिया सुपर फुड' असा राष्ट्रीय खाद्यान्नाचा दर्जा दिला. खिचडी हा साधा आणि स्वस्त असा जेवणाचा प्रकार आहे. मुख्य अन्न म्हणूनही खिचडीचा उल्लेख करावा लागेल. भारताशिवाय आशियायी देशांत चीन सोडून बांगलादेश, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, फिजी, म्यानमार या देशांत खिचडी चवीने खाल्ली जाते.

खिचडी या शब्दाचे मूळ खिच्चा या संस्कृत शब्दात आहे. ग्रीक राज्याचा राजदूत असलेल्या सेल्युलस याने भारतीय पदार्थांविषयी लिहिले आहे. त्यामध्येही खिचडीचा उल्लेख आढळतो. मोरक्कन प्रवासी इब्न बतूता याने आपल्या लिखाणात किशरी म्हणजेच खिचडी ही भारतीय लोकांना किती जिवाभावाची आहे, याचे वर्णन केले आहे. मूळ खिचडीचा ढाचा जरी डाळ-तांदूळ असला, तरी वेगवेगळ्या साम्राज्यातील लोकांनी तिला वेगवेगळी रूपे दिली. खिचडी ही गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही. मुघलांनी ड्रायफ्रुट, केशर इत्यादींचा वापर करून खिचडीला श्रीमंत केले. 'ऐन ए अकबरी' या ग्रंथात खिचडीचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये सात प्रकारच्या खिचडीची पाककृती दिलेली आहे. असे ऐकिवात आहे, की राणी पद्मावती ही राजा रत्नसिंहसाठी पिस्त्याची डाळ व बदामाचे तांदळाच्या आकाराचे काप करून शाही खिचडी बनवित असे. त्यानंतर पंधराव्या शतकात काही रशियन प्रवासी भारतात आले होते. त्यांनीही खिचडीचा आस्वाद घेतल्याचे नमूद केलेले आहे. महानुभाव पंथाच्या लिळाचरित्रातही खिचडीचा उल्लेख आहे. याशिवाय इसवीसन १००० ते आत्तापर्यंतचे जे संत वाङ्मय आहे, त्यातही अधेमधे खिचडीचा उल्लेख आढळतो. खिचडीचे भारतातील अस्तित्व अतिप्राचीन आहे, हे यावरून समजते. औरंगजेबालाही खिचडी अतिशय प्रिय होती, असे म्हणतात. अकबर-बिरबल यांच्या गोष्टींमधील खिचडीचा उल्लेख हा सर्वश्रुत आहे.

खिचडीला भारतामध्ये वेगवेगळी नावे आहेत. खिचडी, खिचरी, खिचूरी, किशरी, खिमट किंवा खिमटी याशिवाय दक्षिण भारतामध्ये पोंगल नावाचा जो पदार्थ आहे, तोही खिचडीचाच एक प्रकार. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला किंवा धुंदूर मासामध्ये तुरीच्या हिरव्या दाण्यांपासून केलेल्या खिचडीला महत्त्व आहे. तशी खिचडी ही अतिशय साध्या पद्धतीने केली जाते. एक भाग तांदळाबरोबर एक भाग मुगाची डाळ हे मुख्य साहित्य. ते स्वच्छ धुवून, नंतर हळद व हिंग घालून पाण्यामध्ये पातळसर शिजवितात. दही, ताक, कढी, साजूक तूप, पापड इत्यादींबरोबर आपापल्या चवीनुसार ती खातात. खानदेशात गेल्यास तेथील घराघरांत संध्याकाळचे जेवण म्हणजे खिचडी आणि कढी असल्याचे आढळते. गुजराती आदिवासींमध्ये खिचडीला कोदरी असे म्हणतात. मुस्लिमांमध्ये खिचडा हा प्रकार बनवितात. तो मुख्यत: मुहर्रमच्या दिवशी केला जातो. यात तांदूळ वापरत नाही. डाळ व दलिया वापरतात. वेगवेगळ्या मसाल्यांचाही वापर करतात. डाळ आणि दलिया शिजवून बारीक करतात आणि भरपूर वेळ शिजवितात. त्यामुळे हे दोन्ही घटक एकजीव होतात. यामध्ये मटण खिचडा नावाचा मांसाहारी पदार्थही बनवितात. सीकेपी लोकांनी खिचडीमध्ये सोड्याचा (प्रॉन्सचा प्रकार) वापर करण्यास सुरुवात केली. शाकाहारी लोकांनी त्यामध्ये डाळिंबीचा वापर केला.

मला असे वाटते, की ब्रिटिशांना आपल्या येथील तिखट जेवण सोसवत नसे; त्यामुळे या खिचडीने त्यांनाही आपलेले केले असेल. मुघल, ब्रिटिशांनी आपल्या आवडीनुसार खिचडीमध्ये अंडे व मासे वापरले आणि आपल्या खाण्यायोग्य बनविली. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या शब्दकोशात खिचडी या शब्दाला स्थान दिले. त्यांनी तिचे नाव केजरी असे केले. खिचडीवरून अनेक वाक्प्रचारही तयार झाले आहेत. 'बिरबलाची खिचडी', 'खिचडी पकविणे' हे आपल्यालाही माहीत आहेत. राजस्थानमध्ये खिचडीच्या नावाने उखाणाही घेतात, 'गरम गरम खिचडी पे रवेदार घी, .... के उपर आ गया मेरा जी.' मराठीमध्ये सुंदर कविताही आहे, 'उन उन खिचडी, साजूक तूप, लोणच्याची फोड, भाजलेला पापड...' अशी ही खिचडी आपल्याला लहानपणापासून म्हातारपणापर्यंत साथ देते. बाळाचे पहिले जेवण खिचडीच असते आणि म्हातारपणी पचायला सोपे अन्न खिचडीच असते. कालांतराने या खिचडीमध्ये डाळींचे प्रयोग होऊ लागले. काही लोकांनी त्यात भाज्या घातल्या, तर काहींनी मसाले घालून मसाल्याची खिचडी तयार केली. विदर्भात आदल्या दिवशी उरलेल्या खिचडीला दुसऱ्या दिवशी कांद्याची फोडणी देऊन 'फोडणीची खिचडी' तयार करतात. उपवास करणाऱ्या मंडळींनाही साबुदाणा आणि शेंगदाण्याचे मिश्रण असलेली खिचडी जीव की प्राण असते. तांदूळ आणि डाळीचा शोध लागला, तेव्हापासूनच या खिचडीचा जन्म झाला असावा, असे मला वाटते. या दोन्ही धान्यांपासून मानवी शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते. पूर्वी भांड्यांची कमतरता असल्यामुळे डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून खिचडीचा जन्म झाला असावा का? आता तर वेगवेगळ्या स्वादाची खिचडी उपलब्ध आहे. त्यामध्ये मेयॉनिज आणि शेजवान सॉसचा वापर केलेला दिसतो. इटलीमध्ये तांदळाबरोबर मक्याचे दाणे आणि चीज वापरून खिचडीचा भन्नाट प्रकार तयार झाला. आता ढाब्यावरही दाल-खिचडी बनवून देतात. ही दाल-खिचडी एकत्र शिजविलेली नसते, तर मागणी केल्यावर तुरीच्या डाळीचे वरण व भात एकत्र करून, त्याला फोडणी देऊन फ्रायपॅनवर तयार करतात. तिचा स्वाद अतिशय वेगळा लागतो. मला मात्र आपल्या मुगाच्या डाळीची साधी खिचडी आणि मेथीचे आळण याचाच स्वाद आनंद देतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनेच्या विरोधात तक्रार

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न : घरगुती हिंसाचारविरोधी कायदा २००५ अंतर्गत सुनेच्या विरोधात सासू तक्रार नोंदवू शकते का? त्यासाठी कुटुंबात एखादा पुरुष सदस्य असण्याची गरज असते का? कुटुंबात पुरुष सदस्य नसला, तरी सासूला सुनेविरुद्ध तक्रार करता येईल का?

उत्तर : कुटुंबसंस्था, विशेषत: भारतीय संकल्पनेतून पाहता, खूपच सर्वसमावेशक असते. भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये अनेकविध नात्यातून मोठा गोतावळा कुटुंबाच्या एका छत्राखाली नांदत असतो. अगदी न्यूक्लिअर विभक्त कुटुंब म्हटले, तरी त्यातून जवळचे, सख्खे नातेवाइक बाहेर काढता येत नाहीत. रक्ताच्या नात्यांबरोबरच 'मानलेल्या' नात्यांना आणि कुठलेही नाव न देता भावनांनी जोडलेल्या नात्यांना सामावून घेणारे कुटुंब भारतीय व्यवस्थेत बरेच व्यापक होऊ शकते. वेगवेगळे नातेसंबंध आणि त्यानुसार प्रत्येक कुटुंबाचे वेगळे स्वरूप, यामुळे प्रत्येकालाच समाधान वाटेल असे वैयक्तिक समस्यांवरील एकच उत्तर शोधून काढणे फार क्लिष्ट असते.

कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याच्या खटल्यातून वेळोवेळी याचा प्रत्यय येत राहतो. कुटुंब म्हटले, की त्यात आजी-आजोबा, सासू-सासरे, मुलगा-सून, मुलगी-जावई, नातवंडे, बहीण-भाऊ, भावजया, दीर, जावा, नणंदा एवढ्या नात्यांचा किमान समावेश होतो. कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा हा मुख्यत्वेकरून कुटुंबातील महिलांच्या संरक्षणासाठी केला असल्याने त्यानुसार फक्त नवरा-बायकोसदृश्य नात्यातील महिलांना, म्हणजेच पत्नी वा सुनेलाच तक्रार करता येईल, असा अर्थ लावला जात असे; पण कुटुंबातील या विविध नातेसंबंधात पती-पत्नी वगळता मोठ्या प्रमाणावर घरगुती हिंसाचाराच्या घटना दिसून येतात. त्यामुळे आजी, सासू, बहीण या नात्यांना घरगुती हिंसाचारविरोधी कायद्यातील संरक्षक तरतुदींचा लाभ नाकारला जात होता.

या विषयाला सुरुवात हरसोरा वि. हरसोरा या खटल्यातून झाली. २००७ साली कुसुम हरसोरा आणि तिची आई पुष्पा हरसोरा यांनी त्यांचा भाऊ/मुलगा, त्याची पत्नी म्हणजेच पर्यायाने वहिनी/सून आणि दोन बहिणी/मुली यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार प्रथम दाखल केली. काही काळानंतर आवश्यकतेनुसार नवीन तक्रार दाखल करण्याच्या परवानगीसह ती तक्रार मागे घेण्यात आली. ऑक्टोबर, २०१० पर्यंत मुलगी व आई या दोघींनी याच प्रतिवादींविरुद्ध दोन स्वतंत्र तक्रारी नव्याने दाखल केल्या. यामध्ये भाऊ वगळता इतर सर्व महिला असल्यामुळे या कायद्याखाली महिलांच्या विरुद्ध तक्रार दाखल करता येत नाही; त्यामुळे त्यांना या तक्रारीतून मुक्त करावे, असा अर्ज गैरअर्जदार महिलांच्या वतीने केला गेला. अर्जदारांचे हे म्हणणे अमान्य करताना मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटले, की प्रतिवादी जर पुरुष नातेवाईक असेल त्याच्या नात्यातील इतर महिलांविरुद्धही खटला दाखल करता येतो, असे या कायद्याखालील सर्व व्याख्या एकत्रित वाचल्या असता लक्षात येते. त्यामुळे प्रतिवादी क्र. १ हा भाऊ/मुलगा म्हणजेच पुरुष असल्याने त्याच्या नात्यातील महिला म्हणजेच त्याची पत्नी व बहिणी यांच्याविरुद्धही खटला दाखल करता येऊ शकतो. असे म्हणताना मुख्य प्रतिवादी पुरुष व्यक्तीच असावी आणि मुख्य प्रतिवादी जर पुरुष व्यक्ती नसेल, तर केवळ नातेवाइक महिलांना प्रतिवादी करता येणार नाही, असा साधारणत: मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ होता. त्यामुळे मुख्य आरोपी एखादी पुरुष व्यक्ती असल्याशिवाय आई-मुलगी, सासू-सून, बहीण-बहीण, नणंद-भावजय किंवा जावा-जावा एकमेकांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा दावा दाखल करू शकत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मत झाले.

सर्वोच्च न्यायालयासमोर या मुद्द्यांची सांगोपांग चर्चा झाली. कायद्यातच प्रतिवादीच्या व्याख्येत स्पष्टपणे 'सज्ञान पुरुष' व्यक्ती असे म्हटलेले असल्याने त्याचा कुठलाही वेगळा अर्थ लावणे किंवा त्याचा अर्थ बदलणे योग्य होणार नाही, असे एका बाजूने मांडण्यात आले, तर दुसऱ्या बाजूने, कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा हा सामाजिक हिताचा व स्त्रियांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा असल्याने 'प्रतिवादी'चा अर्थ फक्त 'सज्ञान पुरुष व्यक्ती व त्याच्या नातेसंबंधातील महिला' इतका मर्यादित ठेवल्यास या तरतुदीच कायद्याच्या उद्दिष्टांच्या विरोधात जातील, असे मांडण्यात आले. कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याचा विचार हा सामाजिक कायदा असाच करायचा असेल आणि महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर या कायद्यातील तरतुदींची व्याप्ती वाढवावी लागेल. तसेच वादी किंवा प्रतिवादी या दोघांच्याही बाजूने न झुकता, तटस्थपणे 'छळ करणारी कुणीही सज्ञान व्यक्ती' अशी प्रतिवादीची व्याख्या वाचली गेली पाहिजे, असे मांडले गेले.

यावर अर्थातच कायद्याच्या अभ्यासकांना खूपच रंजक वाटेल अशी भरपूर साधकबाधक चर्चा घडली. भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ मधील 'समतेच्या' तरतुदींपासून ते कायद्याचा अन्वयार्थ लावण्याचे नियम यांविषयीचा 'इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूटसचा' कायदा यांची सांगोपांग चर्चा आणि या विषयांवरील आधीचे महत्त्वाच्या निर्णयांचा ऊहापोह झाला. तो थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जिज्ञासूंना वाचता येईलच.

आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने दोन निरीक्षणे नमूद केली. त्यानुसार २००२ साली कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याच्या मसुद्यात प्रतिवादीची व्याख्या 'तक्रारदाराच्या नातेसंबंधांतील कुणीही सज्ञान व्यक्ती' अशी केली गेली होती; परंतु त्यानंतरच्या नव्या बिलात व कायद्यात ही व्याख्या बदलून त्यामध्ये 'सज्ञान पुरुष व्यक्ती' हे शब्द वापरण्यात आले. तसेच महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या 'कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण विरोधी कायद्यातही' प्रतिवादीची व्याख्या 'ज्याच्याविरुद्ध अर्जदार महिलेने तक्रार दाखल केली आहे, अशी व्यक्ती' अशी केली असून त्यातूनही 'सज्ञान पुरुष' असा विशेष उल्लेख केलेला नाही. या निरीक्षणांबरोबरच या कायद्यातील व्याख्यातूनही 'सज्ञान पुरुष व्यक्ती' असा उल्लेख वगळूनही या कायद्याचा आशय आणि उद्देश्य बदलणार नाही, असे न्यायालयाचे मत झाले. भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ अंतर्गतही समतेच्या कसोटीवर फक्त 'सज्ञान पुरुष व्यक्तींना' प्रतिवादी केल्यास या सामाजिक कायद्याच्या उद्दिष्टपूर्तीत अडथळे येतील, असे नमूद केले. या निर्णयानुसार कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यातील प्रतिवादीच्या व्याख्येतून 'सज्ञान पुरुष व्यक्ती' हे शब्द वगळून 'अर्जदाराच्या नात्यातील वा जिच्याविरुद्ध अर्जदाराने तक्रार दाखल केली असेल अशी कोणतीही व्यक्ती' असा बदल करण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

यानुसार कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याखाली अर्जदार महिला त्यांच्या नात्यातील महिलेविरुद्धही तक्रार दाखल करू शकतात. त्यासाठी प्रमुख आरोपी सज्ञान पुरुष व्यक्ती असण्याची व त्याच्या नात्यातील महिलेबद्दलच तक्रार करता येईल, अशी आवश्यकता नाही; मात्र कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याअंतर्गत तक्रार करताना अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील कौटुंबिक नातेसंबंध असणे व त्यातून ज्याविषयी तक्रार केली आहे तो कौटुंबिक विवाद निर्माण झालेला असणे आवश्यक असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ राज्यं, ४० वाद्यं

$
0
0

वाद्यांवर 'मधुर' हुकूमत

एक, दोन नव्हे तर तब्बल चाळीस वाद्यांवर त्याची हुकूमत आहे. भारतातल्या सुमारे २१ राज्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकसंगीताचा अभ्यास त्यानं केला आहे. मधुर पडवळ या तरुण वादकाची ही सुमधूर गोष्ट...

मुंबई टाइम्स टीम

भारतातल्या विविध राज्यांमधल्या लोकसंगीताचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यासाठी त्यानं २१ राज्यांमध्ये प्रवास केला आहे. तब्बल ४० हून अधिक वाद्यांवर त्याची हुकूमत आहे. मधुर पडवळ या तरुण वादकाचा हा संगीतमय प्रवास पाहून अक्षरश: थक्क व्हायला होतं. या वाद्यवादनाचे लाइव्ह शो तो करतो. तसंच त्यानं काही सिनेमांना संगीतही दिलं आहे.

खरं तर मधुरचा लहानपणी संगीताशी काहीही संबंध नव्हता. कॉलेजमध्ये त्यानं गिटार शिकायला सुरुवात केली. दहा-दहा तास तो रियाज करायचा. रूईया कॉलेजमधून त्यानं बीएची पदवी घेतली आहे. तसंच रहेजा कॉलेजमधून त्यानं अप्लाइड आर्ट्सचं शिक्षणही घेतलंय. एका प्रसिद्ध चॅनेलमध्ये भारतातल्या दहा आघाडीच्या गिटारिस्टमध्ये त्याची निवड झाली. एकदा राजस्थानमध्ये फिरायला गेलेला असताना त्याला 'रावणहत्ता' हे वाद्य पाहायला मिळालं. तिथून परत आल्यावरही त्याच्या डोक्यातून ते जात नव्हतं. त्यानं या वाद्याविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण, अखेर त्यानं पुन्हा राजस्थान गाठलं. त्या वाद्याची माहिती घेतली, तसंच ते वाजवायला तो शिकला. तिथल्या लोकांना त्यानं आपलं संगीत शिकवलं. अशा प्रकारे त्याचा लोकसंगीतातला प्रवास सुरू झाला. यंदा त्याला शाहीर साबळे पुरस्कार मिळाला आहे.

पुढे त्यानं पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, नागालँड अशी अनेक राज्यं पालथी घातली. तिथे त्यानं प्रयत्नपूर्वक स्थानिक वाद्यांची माहिती मिळवली. भविष्यातल्या वाटचालीबद्दल तो म्हणाला, की 'वाद्यांची जमा केलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांना व्हिज्यूअल ट्रिट मिळावी यासाठी 'फोक्स वॅगन' हे युट्यूब चॅनेल सुरू केलंय. त्याचबरोबर अनेक लाईव्ह शो करतोय. या कामात मला व्यावसायिकता आणायची नाहीय. पण, खर्चाची बाजू सांभाळण्यासाठी मी सिनेमांना संगीत देतो. तसंच लाईव्ह शोमधून मिळणारं मानधन यातून खर्च भागवत असतो.' लोकसंगीताचा सादरकर्ता, संगीतकार, प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट म्हणून तो काम करतोय.

'सरिंदा' बनवलं

अनेक स्थानिक वाद्यं कुठल्याही दुकानात किंवा ऑनलाईन मिळत नाहीत. बंगालमधलं 'सरिंदा' हे वाद्य मधुरला हवं होतं. त्रिपुरा, आसामसारख्या राज्यात सारंगी, सर्जा या नावानं हे वाद्य सापडतं. 'हे वाद्य फणसाच्या खोडापासून बनवलं जातं याची मला कल्पना होती. मग, कोकणातून मी फणसाचं खोड मागवलं. या वाद्याचं डिझाईन बनवून घेतलं. अगदी तसंच्या तसं 'सरिंदा' मी इथे बनवलं', असं तो म्हणतो.

लोकसंगीत ही भारताला मिळालेली एक देणगी आहे. आपली कला, संस्कृती ही आपल्यालाच टिकवायची आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे.

- मधुर पडवळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणीला ‘सोनिया’ची चमक

$
0
0

पैठणीला 'सोनिया'ची चमक

बँकेच्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून सोनिया चांदोरकर या मराठी मुलीनं फॅशनच्या दुनियेत पाऊल टाकलं. पैठणीला इंडो-वेस्टर्न साज चढवून तिनं ती परदेशातही पोहोचवली आहे. तिच्या या यशाविषयी...

०००००

रामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज

शिक्षण संपलं की नोकरी सुरू करण्याकडे प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीचा कल असतो. स्वत:चा व्यवसाय सुरू करणं ही तर मुलींसाठी तशी दुर्मीळच बाब. पण सोनिया चांदोरकर या मराठी तरुणीनं हे धाडस करून दाखवलं. बँकेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून सोनिया फॅशन डिझायनर बनली आहे. त्यातही पैठणीवर तिनं विशेष काम केलं आहे.

पैठणी ही शक्यतो सणावाराच्या दिवशीच नेसली जाते. मात्र ड्रेस, पायजमा, कुर्ता यासारख्या कपड्यांतून पैठणीचा आनंद कसा मिळेल ते तिनं दाखवून दिलं. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या 'इंडिया रन वे वीक २०१८' या स्पर्धेत सोनियाला इंडो वेस्टर्न स्टाईलचं मुकाइश पद्धतीनं केलेलं 'समर वाइब्झ' हे कलेक्शन सादर करण्याची संधी मिळाली. बँकर ते फॅशन डिझायनर या प्रवासाविषयी ती म्हणाली, की 'लहानपणापासून मला स्वत:च्या ड्रेसवर काम करण्याची आवड होती. बँकेमध्ये काम करतानासुद्धा इतर सहकाऱ्यांकडून मी घातलेल्या ड्रेसवर, कपड्यांवर चांगल्या प्रतिक्रिया मिळायच्या. फॅशनची आवड स्वस्थ बसून देत नव्हती. म्हणून मग बँकेतल्या नोकरीचा राजीनामा दिला. कपड्यावर डिझायनिंग करायची आवड होती. मात्र त्याचं शिक्षण घेतलं नव्हतं. तरीही स्वत:चं काही तरी करायचं या जिद्दीतून 'सांची डिझायनर स्टुडिओची' स्थापना केली. मग फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं.'

आपल्या कलेच्या जोरावर सोनियानं पैठणी यूके, अमेरिका, दुबई, सिंगापूर या देशांतही पोहोचवली आहे. महेश काळे, सायली संजीव, शैलजा सुब्रमण्यम, अंकुश चौधरी, शुभांगी गोखले यांसारख्या सेलिब्रिटींसाठी सोनियानं अनेक गोष्टी डिझाईन केल्या आहेत. भविष्यात माधुरी दीक्षित, करीना कपूर यांसारख्या बड्या बॉलिवूड स्टार्ससाठी काम करण्याची तिची इच्छा आहे. 'फॅशनचं जग हे दिवसागणिक बदलत असतं. अशा वेळी तुम्ही जागरुक राहणं फार महत्त्वाचं असतं. मात्र ट्रेंड बरोबर जाताना तुम्हाला आवडेल तीच तुमच्यासाठी फॅशन असते. सध्या भारतातल्या पारंपरिक वस्त्रकला लोप पावत चालल्या आहेत. पूर्वी हातमागावर पैठणी केली जायची आता मात्र ती मशीनवर केली जाते. त्यामुळे हातमाग कारागिरांना मिळणारा रोजगार कमी झालेला आहे. त्यामुळे माझं प्रत्येक कलेक्शन उतरवण्यामागे हाच प्रयत्न असतो, की त्यावर जुन्या पद्धतीने इंडो-वेस्टर्न स्टाईलचं काम करून घ्यावं. जेणे करून त्यांनाही रोजगार मिळेल. कोणत्याही क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन प्रामाणिकपणे काम केल तर काहीच अशक्य नाही', असं सोनिया सांगते.

००००

मला खूप वर्षांपासून पैठणीवर काम करण्याची इच्छा होती. पैठणी हा प्रकार फक्त मुली, महिलाच नेसू शकतात तेही सणावाराला, घरच्या समारंभाला. मात्र मला हा ट्रेंड बदलायचा होता. आत्ताच्या पिढीला रुचेल व परवडेल अशा स्वरुपात मला पैठणी उपलब्ध करून द्यायची होती म्हणून मी हा प्रयत्न केला.

सोनिया चांदोरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लगीन ‘करार’ पाहिजे

$
0
0

शब्दुली कुलकर्णी

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतलं राधा आणि घना यांचं काँट्रॅक्ट मॅरेज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर 'वीरे दी वेडिंग'मुळे हाच विषय पुन्हा चर्चेत आला. काँट्रॅक्ट मॅरेजचं प्रमाण हल्ली चांगलंच दिसू लागलंय. नेमकं काय असतं त्यात?

करार?...तोही लग्नाचा? होय, हल्ली अनेक जोडपी हल्ली काँट्रॅक्ट मॅरेज करू लागली आहेत. अशी काही उदाहरणं समाजामध्ये दिसून येत असून, काही विशिष्ट अटींना मान्यता देऊन लग्नाचा करार करण्याकडे जोडप्यांचा कल दिसतोय. साधारणपणे तीन, पाच किंवा अमर्यादित वर्षांसाठी केला जाणारा हा करार असतो. एकमेकांचं स्वातंत्र्य जपून आणि एकमेकांना पुरेशी स्पेस देऊन नातं टिकवायचं अशी आजच्या पिढीची विचारसरणी असल्यामुळे हे पाऊल उचललं जात असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

काय असतात अटी?

> शारीरिक संबंध न ठेवणं.

> मूल न होऊ देणं.

> कधीही वेगळं होण्याचं स्वातंत्र्य.

> लग्नानंतर मूल दत्तक घेणं.

> कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळाल्यास ती मुभा असावी.

> एकमेकांशी एकनिष्ठ राहणं.

> लग्न झालं असलं तरी आई-वडिलांना आर्थिक मदत करणार. (मुलीकडून)

> कितीही भांडणं झाली तरी आई-बाबांबरोबरच राहणार. (मुलाकडून)

> दिव्यांग भावंडं असल्यास त्यांची जबाबदारी स्वीकारणं.

> मालमत्तेवर हक्क नाही

'कोर्टशिप'ची महत्त्वाची भूमिका

लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंतच्या काळाला कोर्टशिप पिरीएड असं म्हटलं जातं. एकमेकांमधील बंध अधिक घट्ट होण्यासाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो. या दरम्यान भावी जोडीदाराच्या घरच्यांसोबत, मित्र मंडळींसोबत वेळ घालवल्यास त्यांची मतं, विचारसरणी जाणून घेण्यास मदत होते. काँट्रॅक्ट मॅरेजचा विचार करणाऱ्या जोडप्यांना हा काळ महत्त्वाचा वाटतो. या काळात एकमेकांसोबत वेळ घालवल्यानं अनेक जोडप्यांनी काँट्रॅक्ट मॅरेज न करण्याचा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगतात.

'लिव्ह इन'चा पर्याय

काँट्रॅक्ट मॅरेज करुन नात्यात व्यावहारिकता आणण्यापेक्षा अनेक जोडपी लिव्ह इनचा पर्याय स्वीकारतात. कराराच्या बंधनामध्ये अडकण्यापेक्षा एकमेकांचं स्वातंत्र्य जपून एकत्र आयुष्य जगण्याचा पर्यायही निवडला जात आल्याचं समुपदेशक सांगतात.

कारणं

- असुरक्षितता

- लग्नाविषयी कानांवर पडणाऱ्या नकारात्मक गोष्टी

- लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची नसलेली तयारी

- भीती

- लग्नाआधीच्या स्वातंत्र्य कायम ठेवायचं असतं

- कमिटमेंट फोबिया

- आत्मविश्वासाची कमतरता

काँट्रॅक्ट मॅरेजवर हल्ली चर्चा होत असते. वाटणारी असुरक्षितता हे काँट्रॅक्ट मॅरेज करण्यामागचं प्रमुख कारण असतं. लग्न म्हणजे दोन जीवांतील विश्वासाचे बंध असतात. ते करारबद्ध करुन त्यात तांत्रिकपणा येतो. एखाद्या नात्यात तांत्रिकपणा आल्यास त्या नात्याला काही अर्थ राहत नाही. आजच्या पिढीनं हे टाळलं पाहिजे.

अनुजा कुलकर्णी, विवाह समुपदेशक


आपल्याकडे काँट्रॅक्ट मॅरेजला कायदेशीर मान्यता नाही. तरीही काही जोडपी हा निर्णय घेतात. विवाह संस्थेकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकत नाही. तसंच या निर्णयात फायदे कमी आणि नुकसानच जास्त होतं. याचा भावी पिढीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अॅड. दिलीप तेली, माजी अध्यक्ष, फॅमिली कोर्ट बार असोसिएशन, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुट‘ब्लॉग’ हिरोचं मिशन इंडिया

$
0
0

भारतात फुटबॉल प्रसारासाठी लंडनहून मुंबई गाठली

भारतातल्या फुटबॉलचा चेहरामोहरा बदलून त्याला वर्ल्डकपच्या नकाशावर आणण्याच्या स्वप्नानं त्याला झपाटलं आहे. त्यासाठी थेट लंडनहून त्यानं मुंबई गाठली. जगभर प्रसिद्ध असलेला 'फुटबॉल पॅराडाइज' हा ब्लॉग लिहिणाऱ्या फुटबॉलप्रेमी गौरांग मांजरेकर या तरुणाची ही गोष्ट...

प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज

फुटबॉलच्या दुनियेत मानाचा समजला जाणारा पुरस्कार, जगभर प्रसिद्ध असलेला 'फुटबॉल पॅराडाईज'सारखा ब्लॉग, अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आणि बरंच काही. फुटबॉलचा निस्सिम चाहता असलेल्या मुंबईकर गौरांग मांजरेकरची ही यशोगाथा आहे. लंडनमध्ये राहून फुटबॉलचा प्रचार-प्रसार करणारा गौरांग आता मायदेशी परतला असून, भारतीय फुटबॉलचा चेहरामोहरा बदलण्याचा चंगच त्यानं बांधला आहे.

फुटबॉल ब्लॉगिंग अॅवॉर्ड सोहळ्यात 'वर्ल्ड्स बेस्ट इंटरनॅशनल फुटबॉल ब्लॉगर' हा मान गौरांगनं यापूर्वीच पटकावला होता. हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये त्यानं शिक्षण पूर्ण केलंय. मुंबईच्या रूईया कॉलेजमध्ये शिकत असताना तो फुटबॉलवर ब्लॉग लिहायचा. हा प्रवास आता इंटरनॅशनल ब्लॉगर वेबसाईटपर्यंत आलाय. एक मीडिया कंपनी सुरू करण्याचं स्वप्न गौरांगनं पाहिलंय. एवढं शिक्षण घेऊन लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांची संधी असताना, 'फुटबॉल पॅराडाईज'साठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय त्यानं घेतलाय. गौरांगच्या 'फुटबॉल पॅराडाइज' ब्लॉगसाठी लिहिणाऱ्या १४ लेखकांची नामांकित क्रेऑन'डी'ऑर या जागतिक स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल 'मुंटा'शी बोलताना तो म्हणाला, की 'जगभरात फुटबॉल क्रिएटिव्ह लेखनाची ही मानांकित स्पर्धा आहे. यामध्ये ३२ जणांची निवड झालीय, त्यात १४ लेखक हे 'फुटबॉल पॅराडाईज'साठी लिहितात.'

फुटबॉल रुजवायचा तर...

भारतात सध्या तरी फुटबॉलची क्रेझ आहे. एखाद्या गोष्टीची क्रेझ असणं हा पहिला टप्पा. इथे खऱ्या अर्थाने फुटबॉल हा खेळ म्हणून रूजवायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापून सरकारनं त्याच्यामागे आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे उभं राहायला हवं. या समितीत फुटबॉलवेडी माणसंच हवी, असं तो म्हणतो.

अॅपवरही

आपल्या भन्नाट लेखनशैलीच्या जोरावर 'फुटबॉल पॅराडाईज'नं जगभरात नाव कमावलं आहे. आजच तो आपलं नवं अॅप (football paradise) लाँच करणार असून, ते गुगल प्ले-स्टोअरवर सर्वांसाठी उपलब्ध होईल.

फुटबॉलशी संबंधित अनेक गोष्टी 'फुटबॉल पॅराडाइज'च्या माध्यमातून गौरांग आणि त्याची टीम लोकांसमोर आणत असते. यासाठी गौरांगकडे २६ जणांची रिसर्च टीम तर २०-२५ लेखकांची टीम आहे. त्यातलेच निवडक किस्से 'मुंटा'च्या वाचकांशी त्यानं शेअर केले.

० महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत असताना वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला होता. त्यासाठी यावेळी त्यांनी फुटबॉलची मदत घेतली होता. लोकांनी एकत्र यावं यासाठी त्यांनी तीन फुटबॉल क्लब्सची स्थापना करण्यास सहकार्य केलं होतं.

० कोलंबीयन फुटबॉलपटू अँड्रूस एस्कोबारनं अमेरिका कॅली या संघाविरोधात स्वयंगोल केला होता. आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. याचाच राग धरून एस्कोबारची हत्या करण्यात आली. त्यावेळी त्याच्या छातीत ६ गोळ्या झाडल्या गेल्या आणि यावेळी मोठ्यानं 'गोssssल' असं ओरडले होते.

माझं मीडिया कंपनीचं स्वप्न पूर्ण करताना भारतातल्या फुटबॉलमध्ये आश्वासक चित्र उभं करण्याचं आव्हानही माझ्यासमोर असेल. त्यासाठीच मी भारतात परतलोय.

- गौरांग मांजरेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायव्हिंग फोर्स

$
0
0

कारची चाके महिलांना गती प्रदान करतात. कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, ही जाणीव सर्वांत प्रबळ असते. कारचे स्टिअरिंग जबाबदारीची जाणीव करून देते. अशावेळी कार ही केवळ कार राहात तर ती महिलांचे 'ड्रायव्हिंग फोर्स' ठरते.

मंजुषा जोशी

सौदी अरबमधील बुरखाधारी महिलांनी परवा जल्लोष केला. 'आम्हाला आता पंख मिळाले', 'आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो' अशा शब्दांत भावनावेग व्यक्त करीत कार चालविण्याचा आनंद लुटला. स्टिअरिंगवरील पकड मजबूत केली. या पकडीत कमालीचा आत्मविश्वास होता. या देशात महिलांना कार चालविण्यावर बंदी होती. तिथल्या राजाने ही बंदी उठविली. त्यानंतर रविवारी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. कित्येक महिला आनंद व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. महिलांना कार चालविण्यावर बंदी असलेला हा जगातील एकमेव देश उरला होता. ही बंदी उठविणारे सौदी अरब जगातील शेवटचा देश ठरला. जगभरात एकीकडे महिला सक्षमीकरण, समान हक्क, समान न्याय, ५० टक्के राजकीय आरक्षण यासारख्या घडामोडी सुरू असतानाच्या पार्श्वभूमीवरील सौदी अरबमधील ही घटना ऐतिहासिकच म्हणावी लागेल.

या घटनेचे जसे सकारात्मक पडसाद जगभर उमटले, तशा काही लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या. महिला कार घेऊन रस्त्यावर उतरल्या तर गर्दी वाढेल, अपघातांचे प्रमाण वाढेल, बाहेर जायचे तर ऑटो, कॅबची सुविधा आहेच ना, शिवाय घरचा हक्काचा ड्रायव्हरही असतोच की... महिलांनी कार चालवली नाही तर काहीही बिघडणार नाही, असा काहीसा सूर या सर्व नकारात्मक प्रतिक्रियांमधून उमटताना दिसला. कार चालविणाऱ्या महिलांना अप्रत्यक्षपणे धमकाविण्याचेही प्रकार घडले. ही परवानगी मिळण्यासाठी तिथल्या महिलांना मोठा संघर्ष करावा लागला. सातत्याने पाठपुरावा करावा लागला. २४ जून रोजी निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा 'आम्हाला पंख मिळाले' अशी आत्मविश्वासपूर्वक प्रतिक्रिया उमटली होती.

महिलांना कार चालवायला मिळणे, ही प्रतीकात्मक घटना आहे. त्यामागे महिलांच्या भावना, विचार, कल्पना, जाणिवा, गरजा जुळलेल्या आहेत. आताशा बहुतेक महिलांजवळ टू-व्हीलर असतात. त्यामुळे कुठेही जायचे स्वतंत्र त्यांना असते. गाडीला किक मारली की भुर्रकन निघाले. कॉलेज, ऑफिस करून घरी परत येताना भाजी-किराणाही त्या आणतात. मुलांना शाळेला, ट्युशनला सोडणे-आणणेही त्या करतात. पण कडक उन्हात, कुडकुडत्या थंडीत, मुसळधार पावसात ही सारी कामे करताना त्यांना खूप त्रास होतो. शिवाय, घरात कुणी आजारी पडले तर ऑटो, कॅबवाल्याची वाट बघणे म्हणजे संकटच वाटू लागते. मग अशावेळी आपल्याकडे कार असायला हवी, आपल्याला कार चालवता यायला हवी हा विचार त्यांच्या डोक्यात येतो. मग काही जणी ठरवून ड्रायव्हिंग क्लास लावतात. शक्य झाल्यास कार घरात येतेही. महिलांच्या हाती पहिल्यांदा जेव्हा स्टिअरिंग येते तेव्हाचा आनंद काय वर्णावा. सौदीतील महिलांच्या हाती स्टिअरिंग यायला एकविसावे शतक उजाडावे लागले. कोणतीही घटना 'व्हायरल' होण्याच्या या दिवसांत तिथल्या महिलांच्या हाती स्टिअरिंग आले आणि हा आनंद 'व्हायरल' झालाच. पहिल्यांदा कार चालविण्याची अनुभूती काय असते, याचे शेअरिंग झाले.

आता आपल्याला कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही, याचा हा आनंद असतो. मुलांना शाळेत सोडण्यापासून ते आजारी व्यक्तीला तत्काळ डॉक्टरांकडे पोहोचवता येऊ शकेल, रात्री-बेरात्री ऑफिसमधून घरी सुरक्षितपणे पोहोचता येते याचाही असतो, हा आत्मविश्वास असतो.

कार ही केवळ चार चाकांवर चालणारे एक वाहन नाही तर ते महिलांसाठी सुरक्षा कवच आहे. ऑफबीट नोकरी करणाऱ्या महिलांना जेव्हा रात्री-अपरात्री टू-व्हीलरवर घरी जायला निघतात किंवा कॅब, ऑटोने घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असुरक्षिततेची भावना त्यांचा पाठलाग करत असते. घरी पोहोचेपर्यंत कुटुंबीयांचाही जीव टांगणीला लागलेला असतो. मात्र कार असेल तर दारे-खिडक्या लावून घेतल्या की ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचापासून तर बचाव होतोच, शिवाय, रात्रीच्या अंधारातल्या असामाजिक शक्तींपासून आपण सुखरूप असल्याची जाणीव सतत त्यांना या प्रवासात सोबत करते.

कारची चाके महिलांना गती प्रदान करतात. कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, ही जाणीव सर्वांत प्रबळ असते. कारचे स्टिअरिंग जबाबदारीची जाणीव करून देते. आयुष्याचे स्टिअरिंग आता आपल्या हाती आहे, याची ती जाणीव असते. केवळ पाळण्याची दोरी आणि संसाराचे एक चाकच हाती नाही तर कुटुंबाची चार चाके आता हाती आली आहेत, ही भावना मनाला बळ देते. बाजूच्या सीटवर बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवायचे आहे, या जबाबदारीचे भान देते. अशावेळी कार ही केवळ कार राहात तर ती महिलांचे 'ड्रायव्हिंग फोर्स' ठरते.

महिलांच्या हाती कार येणे, ही घटना केवळ तिचा स्वत:चा उत्कर्ष साधत नाही, तर कुटुंब आणि पर्यायाने देशाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका निभावत असते. सौदीने महिलांना कार चालविण्याची परवानगी देण्यामागे सर्वांत मोठे कारण हे देशाचा आर्थिक विकास दर वाढविणे हे आहे. कोट्यवधींचा खर्च केवळ महिलांच्या गाड्यांसाठी चालक ठेवण्यावर होतो. हा खर्च नाहक होत असल्याची जाणीव या निर्णयामागे होती. या एका निर्णयाने देशाचा जीडीपी ठळकपणे वाढेल, असा तिथल्या सरकारला विश्वास आहे. आणि तसे होईलही. २०१४च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण ऑटोमोबाइल लायसन्स धारकांमध्ये महिलांचे प्रमाण केवळ चार टक्के होते. या चार वर्षांत कार चालवणाऱ्या महिलांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे कार इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा आहे. महिलांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या, ऑटोमॅटिक कारच्या निर्मितीसाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. अनेक महिलांना कारमुळे रोजगार तर मिळाला तर आहेच शिवाय, कारमुळे नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आणि टिकलीही आहे.

सौदी अरबमधील महिलांना कार ड्रायव्हिंगची परवानगी देण्यामागे आणखी एक कारण हेही आहे की, तेथे रस्ते अपघातांचे प्रमाण मागील काही वर्षीत खूप वाढले होते. अरब देशांमध्ये २०१४ साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातांमध्ये ३८ टक्के पुरुषचालक दोषी आढळले. २७ टक्के महिलांना जबाबदार धरण्यात आले आहे. अमेरिकेतील कार इन्शुरन्स कंपनीने २०१२मध्ये केलेल्या आणखी एका सर्वेक्षणात, पुरुष चालक हे मर्यादेपेक्षा जास्त गतीने कार चालवित असल्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आहे. ओव्हरटेक करण्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. महिला सिटबेल्ट लावतात आणि काळजीपूर्वक आणि कमी गतीने कार चालवतात, असेही हे सर्वेक्षण सांगते.

'मला कार चालवता येत असल्यामुळे अनेक गोष्टी खूप सोप्या झाल्या. मी माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकते, शिवाय मुलांना शाळेत पोहोचवू शकतो आणि तब्येतीची काही इमर्जन्सी आलीच तर सासू-सासऱ्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊ शकते. त्यासाठी मला आता कुणाचीही वाट बघावी लागत नाही. कारच्या भरवशावर कोणत्याही वातावरणात अगदी वेळेवर कामे पूर्ण करू शकते. त्यामुळे कार ही माझी एक चांगली मैत्रीण झालेली आहे', असे गृहिणी अंजली देशपांडे म्हणतात. 'लेजमध्ये होते तेव्हा 'गाडी उडवायची' ही फॅन्टसी होती. लग्न झाले. मुलगी झाली. ती शाळेत जायला लागली. स्कूलबस आली नाही की जीव कासाविस व्हायचा. म्हणून कार घेतली आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणं संपलं. डॉक्टर असल्यामुळे रात्री-बेरात्री कधीही कॉल यायचे. कुठल्याही दवाखान्यात जावं लागायचं. 'गोल्डन अवर'मध्ये अनेक पेशंटंना वाचवण्याचा आनंद आणि सुरक्षा मला कारनं दिली' असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा रिधोरकर सांगतात. या प्रातिनिधिक प्रतिक्रिया महिलांच्या हाती कारचे स्टिअरिंग येण्याचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत. कार चालविण्याची क्षमता सिद्ध करणाऱ्या सौदीतल्या महिलांच्या मनातल्याही या भावना आहेत. कार हा अजूनही गरजेचपेक्षा 'स्टेट्स सिम्बॉल' मानला जात असला तरी महिला गरज म्हणूनच कार चालवताना अधिक दिसतात. कार चालवताना मिळणाऱ्या आनंदापेक्षा, स्वातंत्र्याची भावना, कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळवून देण्याचा विचार, जबाबदारीची जाणीव या सगळ्या भावना सौदी अरबमधील त्या तमाम महिलांच्या जल्लोषामागे होत्या, हे समजून घेतले पाहिजे.

manjusha.joshi@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेअरिंग ते केअरिंग

$
0
0

सोशल मीडियाच्या जमान्यात अभ्यासही सोशल होत चाललाय. कॉलजांचे शिक्षक व्हॉटसअॅप ग्रुपचा वापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अगदी योग्य करुन घेतायत. व्हॉइस नोट्सपासून एखाद्यं वाचनीय पुस्तकंही या ग्रुपमध्ये टाकलं जातं. अगदी शेअरिंगपासून केअरिंगपर्यंत सगळंच या व्हॉट्सअॅपग्रुपमध्ये चालतं, त्याविषयी...

००००

'अगं, व्हॉटसअॅप ग्रुप बघ पटकन. सरांनी नोट्स पाठवल्या आहेत', 'अरे भाई, पास आहे मी परीक्षेत. कारण कुलकर्णी मॅमनी परीक्षेसंबंधीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ग्रुपवर पाठवल्या आहेत', 'सर कसले भारी आहेत यार! माझ्या आवडत्या पुस्तकाची फाइल त्यांनी पाठवलीय', असे संवाद कॅम्पसमध्ये ऐकायला मिळाली तर नवल वाटायला नको. व्हॉटसअॅपमुळे गुरू-शिष्याचं नातंही आता कूल झालंय. लेक्चर्सची वेळ, परीक्षेत येऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न ते इतर वाचनाची पुस्तकं अशा गोष्टी अगदी चटकन विद्यार्थ्यांना मिळतात ते व्हॉटसअॅप ग्रुपमुळे. सोशल मीडियाच्या जमान्यात शिक्षकांच्या सोशल वागण्याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत असून शिक्षकांचाही ताण काही प्रमाणात हलका होताना दिसतोय.

व्हॉटसअॅप ग्रुपचेही निरनिराळे प्रकार बघायला मिळतात. कुठे हा फक्त 'स्टडी ग्रुप' म्हणूनच मर्यादित असतो तर कुठे बाकी गोष्टींवर देखील चर्चा केली जाते. काही ग्रुप्सवर शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांना उपयोगी असे व्हिडीओज, लिंक्स, फाइल्स, फोटोज, स्क्रीनशॉट्स पाठवतात. एकूणच गुरु-शिष्यांचे हे व्हॉटसअॅप ग्रुप्स विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणण्याची मोलाची कामगिरी करतात, असं म्हणायला हरकत नाही. ग्रुपवर होणाऱ्या या चर्चांमुळे, मिळणाऱ्या अभ्यासविषयक साहित्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी होणारी पुस्तकांची शोध मोहिम कुठेतरी कमी झाली आहे. व्हॉटसअॅप ग्रुपचा आणखी एक फायदा म्हणजे काही शिक्षक प्रत्येक विषयाचा स्वतंत्र असा ग्रुप तयार करतात. जेणेकरून त्या-त्या विषयाचे वेगळे नोट्स मुलांना मिळतात आणि मुलांचा गोंधळ होत नाही.

एखाद्या विद्यार्थ्याला काही समजलं नाही तर काही शिक्षक व्हॉटसअॅप व्हॉइस नोट पाठवून त्या शंकेचं निरसन करतात तर अगदीच गरज भासल्यास व्हॉटसअॅप कॉल देखील केला जातो. 'उद्या लेक्चर अमुक या वेळेला आहे' ते 'ऑल इज वेल माय डीअर स्टुडंट्स' असे लाडक्या शिक्षकांचे मेसेजेस विद्यार्थ्यांचा त्रास कमी करतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी स्वतःला अपडेट केलंय आणि त्यांचा हा सोशल स्वभाव विद्यार्थ्यांचा अभ्यास सोप्पा करत असून गुरू-शिष्याचं हे नातं अधिकाधिक घट्ट आणि फ्रेंडली करतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तामिळनाडूत गाजतोय मराठी आवाज

$
0
0

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ती चक्क पंधरा भाषांमध्ये गाते. मराठमोळी गायिका आस्था लोहारचा आवाज दक्षिणेतही गाजतोय. आधी कन्नड सारेगमप लिटील चॅम्पमध्ये पहिल्या चार जणांमध्ये, तर अलीकडेच तामिळ सारेगम लिटील चॅम्प स्पर्धेत पहिल्या पंधरा स्पर्धकांमध्ये तिनं धडक मारलीय...

प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज

मराठी असूनही तिचे तामिळ व कन्नड शब्दोच्चार ऐकून सर्वांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली होती. विरारची आस्था लोहार ही तरुणी सध्या दक्षिणेत संगीतावरील रिअॅलिटी शोज गाजवतेय. सध्या तामिळ सारेगम लिटील चॅम्प स्पर्धेच्या निमित्तानं आस्था आणि तिची आई तामिळनाडूमध्येच आहेत. मराठी स्पर्धक असूनही तिच्या सुरेल आवाजामुळे दाक्षिणात्य कार्यक्रमामध्ये परीक्षक आणि प्रेक्षकांकडून तिचं कौतुक होतंय.

आस्थानं वयाच्या दुसऱ्या वर्षी संगीत शिकायला सुरुवात केली होती. तिसऱ्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स, नवव्या वर्षी दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबत सादरीकरण, मुंबईज गॉट टॅलेंटची विजेती, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा आशीर्वाद, साक्षात गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा असं यश तिनं मिळवलं आहे. भाषा नीट समजत नसतानाही योग्य उच्चार अन् सुरेल गायकीच्या जोरावर तिनं स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलंय.

विरारच्या उत्कर्ष विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या आस्थानं यंदा दहावीला ९१ टक्के गुण मिळवले. यशाचा हा आनंद तिनं तामिळनाडूमध्येच साजरा केला. या प्रवासात गुरूंची लाखमोलाची साथ मिळाल्याचं आस्था सांगते. आस्थाची पहिली गुरू म्हणजे तिची आई सुनिता लोहार. संगीताचं सुरुवातीचं शिक्षण तिनं आईकडूनच घेतलं. आस्थाच्या आईच्या गुरू सुखदा काणे यांच्याकडूनही तिला मार्गदर्शन मिळालं. पुढे एक वर्ष प्रिया आठल्ये, संगीतकार रविंद्र जैन यांच्याकडे तर तीन वर्ष किराणा घराण्याचे संगीत मार्तंड उस्ताद दिलशान खान यांच्याकडे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. अलिकडेच आस्थानं गायिका गौरी पाठारे यांच्याकडे व्हॉईस ट्रेनिंगचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलीय.

या प्रवासाबद्दल 'मुंटा'शी बोलताना आस्था म्हणाली, की 'मला या भाषा येत नाहीत. पण त्या भाषांमध्ये मी उत्तम गाऊ शकते. वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकून त्यांचा रियाज करण्याचा मी प्रयत्न करते. माझे आई-बाबा दोघेही उत्तम गातात. त्यामुळे लहानपणापासून मी संगीताकडे आकर्षित झाले. भविष्यात एक उत्तम पार्श्वगायिका बनण्याची माझी इच्छा आहे. आता तामिळ सारेगम लिटील चॅम्प स्पर्धेकडे लक्ष आहे. पण पुढे जाऊन श्रीलंका, अमेरिका इथल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय.' सारेगम लिटील चॅम्प स्पर्धेच्या तामिळ व कन्नड अशा दोन्ही व्हर्जनमध्ये आस्थाला परीक्षकांच्या प्रतिक्रिया इंग्रजीमधून मिळायच्या. प्रेक्षकांकडूनही कौतुक होत असल्यानं प्रोत्साहन मिळत असल्याचं आस्था सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबांनाही रजा हवीच

$
0
0

मुलांच्या संगोपनासाठी आता बाबांनाही रजा मिळणार आहे. बदलत्या काळानुसार, बाबांना आपली जबाबदारी पेलता यावी, त्यांचा मुलांच्या संगोपनात सक्रीय सहभाग असावा, यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. नऊ महिने पोटात मुलाला वाढवणाऱ्या आईचे बाळाशी जन्मजात बाँडिंग असते. बाबाला बाळाशी त्याचे असे खास नाते निर्माण करावे लागते. या रजेच्या निमित्ताने पालकत्वात वडिलांचा सहभाग वाढेल.

अस्मिता चितळे

मुलांच्या संगोपनासाठी पुरुष कर्मचाऱ्यांनाही भरपगारी १८० दिवसांची रजा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या संगोपनासाठी रजा मिळणार आहे. संगोपनाच्या गरजेनुसार मुलाचे वय १८ वर्षे होईपर्यंत ही रजा घेता येणार आहे. या निर्णयावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. बहुतांश जणांनी ही रजा हवीच कशाला? या रजेचा दुरुपयोगच होणार, आता रजेला आणखी एक निमित्त मिळाले, अशा शब्दांत या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. थोडासा वेगळा विचार केल्यास लक्षात येईल, की हा निर्णय म्हणजे आपल्याकडे पालकत्व गंभीरपणे घेतले जात आहे आणि मुलाच्या संगोपनासाठी आई इतकीच बाबांची गरज असते, त्याला वेळ द्यावा लागतो हे समजून घेण्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

ही रजा महत्त्वाचे पाऊल आहे का नाही, हे पाहण्यासाठी थोडेसे मागच्या पिढीच्या विचारांमध्ये डोकावून पाहू. आपल्या आजीच्या तोंडून आपल्या आई किंवा वडिलांच्या जन्माच्या वेळची हकिगत ऐकली असेल. 'तुझ्या बाबाच्या जन्माच्या वेळी फोन नव्हते. तुझ्या आजोबांना पत्रानेच कळवले होते. त्यांना रजा नव्हती. मग तू चांगला महिन्याचा झालास तेव्हा आले हे तुला बघायला,' ही वाक्ये व्यक्तिपरत्वे किंचित फरकाने ऐकू येतील. मुलांचा सांभाळ, त्यांची काळजी घेणे ही सगळी आईची जबाबदारी. वडिलांची भूमिका गरजेनुसार ओरडणे आणि मुलांच्या प्रगतिपुस्तकावर सही करण्यापुरतीच मर्यादित होती. सध्या जी पिढी ६० ते ७० दरम्यान आहे, त्यांच्या काळात महिला नोकरी करायला लागल्या होत्या. या पिढीतल्या स्त्रियांना अर्थाजन, संसार आणि पालकत्व अशी तिहेरी जबाबदारी सांभाळावी लागली होती. या पिढीतील अनेक जण मुलांचे सारे बायकोच बघत होती, हे उतारवयात खुलेपणाने कबूल करतात. या तुलनेत सध्या २५ ते ४५ वयोगटाचा विचार केला, तर मुलांच्या संगोपनात सहभागी व्हायचे असते, असे दिसून येते. एक किंवा दोन अपत्ये, मदतीला उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचा अभाव, दोघांनी नोकरी करण्याची नितांत गरज, यांतून वडिलांनाही मुलांच्या संगोपनात सहभाग घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. या तिसऱ्या गटाच्या सद्यस्थितीकडे थोडेसे अधिक खोलात जाऊन पाहू.

अगदी बाळंतपणात सासर आणि माहेर दोन्हीकडचे आजी-आजोबा बाळ आणि बाळंतिणीला तळहाताच्या फोडासारखे जपतात. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून ते डिस्चार्ज मिळून घरी जाण्यापर्यंतच्या काळात घरातला प्रत्येक जण जमेल तसे बाळाला पाहायला हॉस्पिटलमध्ये जाऊन येतात. तेथे थांबतात. त्यात बाळाच्या बाबाचाही समावेश असतो. (पॅटर्निटी लीव्हची सुविधा असेल, तर ती घेतलीही जाते; पण अद्याप अनेक जणांना ही सुविधा नाही) मग बायको बाळाला माहेरी घेऊन गेली, की त्यांना भेटायला बाबा साधारण सुट्टीच्या दिवशीच जातो. परगावी असेल तर महिन्यातून एकदा. बायकोच्या माहेरी कसे जाणार सारखे, बरे दिसणार नाही आणि शोभणार नाही, असे काहीसे त्यात असते. याचे अगदी छोटे उदाहरण सांगते, नुकतेच बाबा झालेल्या एका डॉक्टर मित्राला कौतुकाने म्हटले, 'अरे जात असशील ना रोज बाळाला भेटायला?' तर तो पटकन म्हणाला, ' छे, छे, रोज कसला जातोय? एखादा दिवशी जातो तिच्या माहेरी. रोज कशाला? तसेही येईलच ना नंतर कायम घरी.'

हे वाक्य पालकत्वाबाबत आजही काही बाबा कशापद्धतीने विचार करतात ते दर्शविते. दुसरीकडे नव्याने आईपण अनुभवणाऱ्या बाईची ओढाताण सुरू झालेली असते. नोकरीच्या ठिकाणी सलग बारा तास काम करणारी ती, सलग तीन महिने घरी थांबून फक्त बाळ सांभाळण्यात व्यग्र झालेली असते. एकीकडे आईपणाचा आनंद, तर दुसरीकडे करिअरपासून आलेला दुरावा तिच्या डोक्याला भुंगा लावत असतो. शिवाय पुन्हा नोकरीवर जायला लागल्यावर बाळाचे काय करायचे, हा प्रश्न सतावत असतोच. घरकाम, नोकरी, पाळणाघर, मुलांची आजारपण यात तिला स्वत:साठी वेळ उरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी आजी-आजोबा मुलांना सांभाळतात; पण तो पर्याय सगळ्यांनाच उपलब्ध असतो असे नाही. शिवाय आम्ही आमची मुले सांभाळली, तुम्ही तुमची सांभाळा, असे थेट सांगणारे आजी-आजोबाही आहेतच. काही बाबा मुलांना पाळणाघरात सोडणे, त्यांना संध्याकाळी खेळायला घेऊन जाणे अशी कामे करतातही; पण मुलांच्या आजारपणात रजा घेणे वगैरे पर्याय ते फारसे स्वीकारत नाहीत. ती जबाबदारी आईकडेच असते. मग काही जणी ऐन भरात असलेले करिअर सोडून देतात. सगळ्यांनाच हा पर्याय स्वीकारता येत नाही. सामाजिक धारणाही यात महत्त्वाची ठरते. अनेकदा बायकांची म्हटली जाणारी कामे पुरुषांना अजूनही येत नाहीत; पण पुरुषांची म्हणून समजली जाणारी अनेक कामे बायका सहजी करतात. आई बाळाची काळजी घेते म्हणून एखाद्या पुरुषाने बिनतक्रार रोज तीन महिने स्वयंपाक केला, किंवा घरी आधी येत असल्यास पूर्ण स्वयंपाक तयार ठेवला, असे फारसे घडत नाही. मुलासाठी काही वेगळे करणाऱ्या बाबाला टीकाच ऐकावी लागते. हे सारे चित्र बाबाला दिसत असते. परिणामी मुलाच्या संगोपनात बाबाची भूमिका गरजेनुसार हातभार अशीच दिसते.

ही सारी वस्तुस्थिती बदलण्यासाठी, मुलाच्या संगोपनात बाबाला पूर्णत: सहभागी होता यावे, यासाठी ही रजा उपयुक्त ठरू शकते. आई आणि वडिलांनी रजेचे नेटके नियोजन केले, तर पालक खंबीरपणे मुलांच्या पाठीशी उभे राहू शकतात. अर्थात, याचा गैरवापर होऊ नये, ही इच्छा. 'पालकनीती'च्या कार्यकर्त्या प्रियंवदा बारभाई म्हणाल्या, 'मुलांच्या संगोपनात वडिलांची सपोर्ट सिस्टीम फार महत्त्वाची असते. आई असतेच; पण वडिलांनाही आवश्यक तेव्हा रजा घेता आल्यास मुलांना दोघांचाही खंबीर आधार मिळू शकतो.'

प्रियंवदा यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. नऊ महिने पोटात मुलाला वाढवणाऱ्या आईचे बाळाशी जन्मजात बाँडिंग असते. बाबाला बाळाशी त्याचे असे खास नाते निर्माण करावे लागते. या रजेच्या निमित्ताने पालकत्वात वडिलांचा सहभाग वाढेल. बाळासाठी आपले असणे महत्त्वाचे आहे, याची जाणीव पुरुष पालकांमध्ये या निमित्ताने अधिक रुजेल. मुख्य म्हणजे संगोपन हे फक्त बाईचे काम नसून ते दोघांचे आहे, हे कुठे तरी आपल्या समाजात झिरपायला लागेल आणि मग त्यातून बाई-पुरुष या भेदाऐवजी माणूसपणाकडे प्रवास सुरू होईल, अशी अपेक्षा करू.

asmita.chitale@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 3450 articles
Browse latest View live