टीव्ही बघता बघता टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणं, चित्रकला, पेपरमधल्या कात्रणाचे कोलाज अशा विविध वस्तू बनवल्या जाऊ शकतात. भरपूर खेळण्यासाठी ही सुट्टी असली तरी सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत मुलांनी शक्यतो बाहेर पडू नये. यावेळात सगळ्या मित्रमैत्रिणींनी घरातच बसून बैठे खेळ खेळावे. तुम्ही बघितलेली एखादी गोष्ट, एखादी जागा याची वर्णनं लिहायला शिका, जेणेकरून तुम्हाला लिखाणाची आवड तर लागेलच, शिवाय तुमच्या आवडीच्या वस्तूबद्दल, ठिकाणाबद्दल तुमच्याकडे नोंद राहील. सातवी-आठवीतल्या मुलामुलींनी आईला स्वयंपाकात मदत करायला काहीच हरकत नाही.
भाजी, फळं चिरायला शिकणं, पीठ मळणं, कुकर लावायला शिकणं, अशा छोट्या छोट्या कामांनी आईवरचा भार आपण हलका करू शकतो. शिवाय चहा, पोहे, उपमा असे सोपे पदार्थसुद्धा मुलांनी बनवून बघावे. खेळण्यातून मुलांचा व्यायाम होत असतोच. पण, उन्हाळ्यात पोहोण्याची मज्जा काही वेगळीच असते. त्यामुळे ज्यांना स्विमिंग येत असेल त्यांनी रोज पोहायला जावं आणि ज्यांना येत नसेल त्यांनी ते शिकून घ्यावं. याने उत्तम व्यायाम तर होतोच, शिवाय पाण्यात खेळण्याचा आनंदही उपभोगता येतो. सो, भरपूर खा, प्या, आणि नव्या गोष्टी शिकत शिकत ही सुट्टी मजेत घालावा.
- वैभव मांगले, अभिनेता
(शब्दांकन: ऋतुजा जोशी)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट