स्वित्झर्लंडमध्ये अॅक्शन किंग जेम्स बाँड! ही कल्पनाच किती रोमांचक आहे ना? स्वित्झर्लंड म्हणजे रोमान्स, हे आपल्याला शिकवलंय द किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांनी. पण रोमान्स आणि रोमांचकता या दोन्ही गोष्टींची सांगड घातली ती जेम्स बाँडनंच. बाँडच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण या निसर्गरम्य देशातल्या निरनिराळ्या ठिकाणांवर झालं आहे. पर्यटकांच्या लाडक्या स्वित्झर्लंडची, बाँडच्या संदर्भातली ही एक नवी ओळख...
इंग्लंडच्या पाईनवूड्स स्टुडिओनं १९६९ साली एका अदभुत आणि अनोख्या स्थळाचा शोध लावला. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती, २०० बर्फाच्छादित आल्पस पर्वतांनी घेरलेलं, ७२ धबधब्यांच्या परिसरात न्हायलेलं एक मजबूत शिखर म्हणजे शिल्थोर्न (Schilthorn). यावर नजर पडताच निर्णय झाला की 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस' या चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सचं चित्रीकरण होईल तर इथेच. त्यावेळी शिल्थोर्न शिखरावर पिझ ग्लोरिआ नावाच्या एका रिवॉल्व्हिंग रेस्तराँचं बांधकाम चाललं होतं. इथे चित्रीकरणाची परवानगी तर मिळाली पण एका अटीवर... ती अट अशी की फिल्म कंपनीने त्या रेस्तराँ आणि बिल्डिंगच्या इतर खोल्यांचं इंटिरिअर आणि फर्निचर करून द्यायचं. एवढंच नाही तर जवळच असलेल्या फक्त ३०० लोकसंख्या असलेल्या म्युरेन नावाच्या 'कार फ्री' गावात एक हेलिपॅड पण बनवून द्यायचं.
जागा तर मनात भरली होती, व त्याच्यासमोर ही अट हसतहसत मंजूर झाली आणि ६० हजार पाउंडस खर्च करून ते रेस्तराँ आणि हेलिपॅड बघता-बघता उभं राहिलं. एका अर्थी ही इंग्लंडच्या जेम्स बाँडची स्वित्झर्लंडला भेटच म्हणावी. ते रिवॉल्व्हिंग रेस्तराँ आणि जेम्स बाँडची स्मृतीचिन्हं आज त्या जागी पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. एक निसर्गरम्य, संपन्न देश अशी स्वित्झर्लंडची ओळख असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक त्याला भेट देत असतात. पण जेम्स बाँडच्या संदर्भातून या देशाकडे पाहणं थोडं वेगळं ठरेल.
स्वित्झर्लंडमध्ये प्रवास करणं अगदी सोपं आहे. झ्युरिक विमानतळावर उतरल्यावर एक रस्ता पार केला की आपण पोहोचतो झ्युरीकच्या ट्रेन स्टेशनमध्ये. जेम्स बाँडला भेटायचं असेल तर ट्रेन घ्यायची इंटरलाकेनसाठी. ही ट्रेन जाते व्हाया बर्न, अडीच तासांत आपण पोचतो इंटरलाकेनमध्ये. इंटरलाकेन म्हणजे २ तळ्यांच्यामध्ये वसलेलं. ही दोन तळी आहेत थुन झी आणि ब्रियेन्झ झी. हे प्रेक्षणीय स्थळ सर्वात लोकप्रियही आहे.
इंटरलाकेनपासून ट्रेन घ्यायची ती लौटेरब्रुन्नपर्यंत, २० मिनिटांत इथे पोहोचल्यावर, पुढचा १२ मिनटांचा प्रवास येलो स्विस पोस्ट बसमधून, अतिशय सुंदर व प्रेक्षणीय रस्त्यावरून. स्टेखलबर्ग हे बेस स्टेशन शिल्थोर्नच्या केबल कारचं. खरा रोमांचक प्रवास इथून सुरू होतो. भल्या मोठ्या काचेच्या खिडक्या असलेल्या केबल कारमधून वर जाताना पाय खरोखरच जमिनीवर राहत नाहीत. चहु बाजूला निसर्गसौंदर्याचे अप्रतिम देखावे, भिन्न रंगांची फुलं, उंचावरून वाहणारे धबधबे, त्यांचे उडणारे तुषार दिसणारं इंद्रधनुष्य पाहताना मन मंत्रमुग्ध होऊन जातं.
पाच मिनिटांत गिम्मेल्वाल्ड ह्या गावात पोहोचून केबल कार बदलून पुढच्या मिनिटांत आपण पोहोचतो म्युरेन या 'कार फ्री' गावात. म्युरेनची लोकसंख्या अवघी ३००, कार फ्री असल्यामुळे इथे ना हवेचं प्रदूषण ना आवाजाचं. प्रत्येक घर एखाद्या 'डॉल हॉउस'सारखं, लाकडाची घरं, खिडक्यांना पांढऱ्या लेसचे पडदे, घरासमोर भाज्यांचे वाफे आणि फुलांचे ताटवे, डोळे भरून बघून घ्यावे अशी ही दृश्यं. या गावात एक रात्र तरी राहायला हवंच. म्हणजे वर्षभराची स्वच्छ हवा छातीत भरून घेता येते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला जावं 'पिझ ग्लोरिया' ह्या रिवॉल्व्हिंग रेस्तराँमध्ये. सकाळच्या कोवळ्या उन्हाचे कवडसे आल्पसच्या शिखरांवर पडताना बघून ढगांबरोबर तरंगल्याची जी जाणीव होते ती कल्पने पलीकडे आहे. जेम्स बाँड हा कधीही न थांबणारा विषय आहे. कार्स, हेलिकॉप्टर्स, अॅम्फी गाड्या ही सगळी वाहनं चालवणं हा तर त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आज अनेक स्विस टूर ऑपरेटर्सनी रोमांचक प्रोग्राम्स आखले आहेत. 'फॉलो द फूटस्टेप्स ऑफ जेम्स बाँड इन स्वित्झर्लंड' हे त्याचंच एक उदाहरण.
अॅस्टन मार्टिन चालवत ग्रिंउेलवाल्ड ते पिझ ग्लोरियाच्या दिशेनं सुसाट जावं. त्यानंतर 'गोल्डफिंगर'मध्ये जेम्स बाँडसारखं ऱ्होन ग्लेशियर आणि फुर्का पास पार करावा. तसंच सेंट मॉरिट्झ या जगप्रसिद्ध शहरात जिथे 'द स्पाय हू लव्ह्ड मी'मधले सुरूवातीचे सीन्स चित्रित केले होते त्या शहराला भेट द्यावी. रोमान्स करता-करता चित्तथरारक आणि रोमांचक अनुभव घेता आले तर प्रवासाची मजा काही निराळीच कमाल करून जाईल नाही?
स्वित्झर्लंड हा एकच देश असा आहे जिथे एक पास (स्विस पास) घेतला की त्या देशातल्या सगळ्या प्रकारच्या वाहनांनी प्रवास करता येतो. ट्रेन, ट्राम, बोट, केबल कार आणि फुयनीक्यूलर. म्हणूनच त्याला वन कंट्री वन पास असं म्हटलं जातं. हा एक असा देश आहे जिथे पुनःपुन्हा गेलं तरी मन भरत नाही. तर जेम्स बाँडनं ओळख करून दिलेल्या ह्या नवीन स्विस वाटा पाहायला एक नवीन स्विसस्वारीची वेळ आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट