फोटो स्टुडिओंना सगळ्यांच्याच आयुष्यात आणि आठवणींत खास स्थान आहे. स्टुडिओत जाऊन फोटो काढणं ही संकल्पना आज कालबाह्य झाली असली, तरी हे स्टुडिओ आजच्या 'फास्ट कस्टमर'शी नातं टिकवून आहेत, हे विशेष!
लहानपणी आई-बाबांचं बोट धरून वाढदिवसाचं केलेलं सेलिब्रेशन, तसंच हाती धनुष्यबाण अन् फुलांची परडी, सभोवती सशा-हरणांची चित्रं घेऊन आणि चंद्रावर बसून आई, मावशी, काकू वा आत्यानं का फोटो काढले, ते तेव्हा कळलंच नाही. तिथले रंगबेरंगी पडदे, 'हां, हसा आता' ही सूचना हे सगळं आज आठवताना गंमत वाटते... प्रत्येकाच्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण जिथं काही वेळासाठी थांबले, त्या शहरातल्या जुन्या फोटो स्टुडिओंत आज उरलाय तो फक्त आठवणींचा खजिना. आज तंत्रज्ञानानं गगनभरारी घेतली असली, तरी ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफी जमान्याचा फ्लॅशबॅक तिथं जाऊन एकदातरी अनुभवायला हवा.
स्टुडिओच जातो माणसांकडे
मनात दडलेल्या आठवणींची कुपी पुन्हा खुली करायला लावणाऱ्या या स्टुडिओंमध्ये जाणं हे आता कालबाह्य होत आहे. अपवाद फक्त ज्यांना डोहाळजेवणाचे पारंपरिक पद्धतीचे फोटो हवे आहेत त्यांचा. कागदपत्रावर लावण्यासाठी पासपोर्ट साइज फोटो काढण्यासाठीही स्टुडिओकडे पावलं वळतात. आता तर स्टुडिओतले फोटोग्राफरच लग्नमुंजीपासून वाढदिवसापर्यंत सगळ्या सोहळ्यांच्या ऑर्डर घेऊन फोटो काढायला जातात. कुणी हे फोटो घरपोच देतं, तर काही मंडळी हे फोटो नेण्यापुरती तिथं येतात; याशिवाय आउटडोअर फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, व्हिजन मिक्सिंग क्लोज सर्किट टीव्ही या सगळ्या सुविधा हे स्टुडिओ आजही देत आहेत.
फोटोसाठी लागणाऱ्या जुन्या गोष्टी तिथं अजूनही आहेत; पण काळानं त्यांना आता 'ओल्ड फॅशन' ही बिरूदावली बहाल केली आहे. आजीपासून नातीपर्यंतच्या पिढीच्या आठवणी मात्र तिथं आहे तशा आहेत, फोटोंच्या स्वरूपात! डिजिटल कॅमेरा, मोबाइल कॅमेरा यानं फोटो काढण्याची क्रेझ वाढली असली, तरी स्टुडिओंशी असणारं नातं आजही टिकून आहे, हे विशेष!
हे झालं कालबाह्य
काळ्या कापडात डोकं खुपसून फोटो काढणारा फोटोग्राफर, त्यावेळच्या कॅमेऱ्यांना असणाऱ्या पितळी लेन्स, काचेच्या निगेटिव्ह, काळ्या कागदातले अल्बम, कॅबिनेट साइजचे (चार बाय सात) फोटो, पाचशेचा फोकस हे सगळं आता कालबाह्य झालं आहे. त्याची जागा करिझ्मा अल्बम, इन्स्टंट कॉपी, डिजिटल कॅमेरा आणि लेन्स यांनी घेतली आहे. काळानुरूप या स्टुडिओंनी स्वतःची कार्यपद्धती बदलली आणि इंटेरिअरही. त्यातही बदलत्या काळात टिकून असणारे काही जुने स्टुडिओ तुम्हाला तुमच्याच काही क्षणांचा फ्लॅशबॅक अनुभवण्याची संधी देतील.
'पारगे फोटो स्टुडिओ' आणि 'न्यू कल्पना फोटो स्टुडिओ' आजही या आठवणींचा वारसा सांभाळत आहेत. 'पारगे फोटो स्टुडिओ' १९२३ मध्ये बी. जी. पारगे अँड कंपनी नावानं सुरू झाला, तर १९६४ मध्ये स्थापन झालेल्या 'न्यू कल्पना फोटो स्टुडिओ'नं नुकतीच पन्नाशी पूर्ण केली.
स्टुडिओवाले म्हणतात...
'पारगे फोटो स्टुडिओ'चे अरविंद बापूसाहेब पारगे याविषयी म्हणाले, 'माझ्या वडिलांनी १९२३मध्ये हा स्टुडिओ सुरू केला. आज मी आणि माझ्यानंतर माझा मुलगा हा स्टुडिओ चालवतो. तंत्रज्ञान पुढं गेलं, तरी स्टुडिओची क्रेझ आजही टिकून आहे. पूर्वी वीज नव्हती तेव्हा डे-लाइट फोटोग्राफी करावी लागे. पांढरे पडदे, एकाबाजूला काच, वरच्या बाजूला काच असा सेटअप असे. काचेच्या निगेटिव्ह असायच्या. आधी १२ मग ३६ फोटोंचा रोल आला, तेव्हा फोटोग्राफरवर सगळी मदार असायची. आज डिजिटल तंत्रज्ञानानं सगळं सोपं केलंय. फोटोचं बॅकग्राउंड कम्प्युटरवर बदलता येतं. स्टुडिओत येऊन फोटो काढायची पद्धत बंद झाली; पण स्टुडिओशी असणारं नातं आजही टिकून आहे.'
'कल्पना फोटो स्टुडिओ'चे राजू चव्हाण म्हणाले, 'आज फोटोंसाठी असणारं गिऱ्हाईक खूप 'फास्ट' झालं आहे. त्यांना 'इन्स्टंट फोटो' हवे असतात; पण प्रथा, परंपरा जपणारे आवर्जून इथं येतात. ज्यांनी लहानपणी किंवा तारुण्यात इथं फोटो काढले, आज त्यांची मुलं, नातवंडं जुने फोटो पाहण्यासाठी किंवा त्या आठवणी ताज्या करण्यासाठी स्टुडिओंना भेट देतात. डिजिटल आणि मोबाइल कॅमेऱ्याच्या जमान्यात स्टुडिओची आठवण आजही लोकांना येतं हे महत्त्वाचं. काळानुरूप आम्हीही सगळ्या सेवा देत आहोत.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट