इतिहासातील सत्य-असत्याची पडताळणी करताना त्याला विज्ञानाची जोड मिळते ती पुरातत्वीय अभ्यासात. वेगवेगळ्या विद्याशाखांना सोबत घेऊन इथे काम केलं जातं. तेजस्विनी आफळे ही अशाच वेगळ्या वाटेनं जाऊन काम करणारी तरुणी. गिरीभ्रमणाची आवड असलेल्या कुटुंबात तेजस्विनीचा जन्म झाला. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात लहानपण गेल्याने आपसूकच इतिहासाची आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच भ्रमंती करताना ऐतिहासिक वास्तू, स्थळे आणि त्याबरोबरच नैसर्गिक संपदेविषयी नीट समजून घेण्याची सवयच तिच्या आई-बाबांनी लावली. यामुळेच तिने वास्तुरचनाशास्त्राचा अभ्यास केला.
ऐतिहासिक स्थळी फक्त अवशेष नसतात तर तिथे नांदलेल्या मानवी संस्कृतीचा तो एक अवशेष असतो. त्यामुळे ही संस्कृती, तिचा इतिहास जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच वास्तूरचनाशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तेजस्विनीने थेट डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गाठलं. डेक्कन कॉलेजमध्ये शिकताना विषयाची व्याप्ती तिच्या लक्षात आली. वास्तुरचनेतील पदवी व आर्किओलॉजीतील पदव्युत्तर शिक्षण या दोन्हीचा नेमका उपयोग होईल या विचाराने तेजस्विनीनं वास्तुसंवर्धनशास्त्र हे क्षेत्र निवडलं. त्यासंदर्भातील प्रॅक्टिकल ज्ञान व्हावं या उद्देशानं तिनं पुणे-मुंबईतील वास्तुसंवर्धन/ रचनाकारांकडे कामही केलं. जुन्या वास्तुंच्या संवर्धनाची योजना कशी आखली जाते याचं प्रशिक्षण तिला कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली घेता आलं. विश्रामबागवाडा, राजाबाई टॉवर (मुंबई युनिव्हर्सिटी) अशा प्रकल्पांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवून गेला. यातील सखोल शिक्षण घेणं आवश्यक वाटू लागल्याने मग तिने थेट अमेरिका गाठली. तिथल्या पेनसिल्व्हानिया विद्यापीठात तिला वास्तुसंवर्धन कसे करावे, त्या मागच्या वेगवेगळ्या विचारपद्धती, जगभरातील तज्ज्ञांचे विचार, पद्धती, दस्तावेज कसे करावे, त्यातील अनेक संगणकीय प्रणालींचा उपयोग अशा अनेक बाबींचं शिक्षण या अभ्यासक्रमात मिळालं.
भारतात परतल्यावर तेजस्विनीने काही दिवस खासगी नोकरी केली. त्याचवेळी समविचारी मित्र-मैत्रिणींबरोबर औरंगाबादमधल्या जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूंची यादी अद्ययावत करण्याचं महत्त्वाचे काम केलं. यानंतर तिला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामध्ये कन्स्लटंट वास्तूसंवर्धन तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सध्या तिचं पोस्टिंग दिल्लीतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या मुख्य कार्यालयात आहे. १८६१ साली स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्व विभागाकडे आजमितीला साडेतीन हजारांहून अधिक स्थळांचे जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. या कामानिमित्तानं घडून गेलेल्या इतिहासाचं संवर्धन करता करता त्याची साक्षीदार होता येतं, याचा तेजस्विनीला खूप अभिमान वाटतो. इतकंच नाही तर, युनेस्कोकडून विश्वस्मारकाचा दर्जा देण्यासाठी स्थापन झालेल्या समितीतही तेजस्विनीचा समावेश आहे.
तेजस्विनी सांगते, पूर्वी इतिहास अभ्यासक हा लोकांपासून दूर, स्वतःच्याच विश्वात रममाण होणारा असे. पण, आता हे एक करिअर बनलं आहे. हे क्षेत्र आवडीने झोकून देऊन काम करणाऱ्यांचं आहे. आपल्या पूर्वजांच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या अपूर्व कर्तबगारीविषयी जाणून घ्यायचं असेल तर हे विशाल-असीमित क्षेत्र तुमची वाट बघत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट