दोन वर्षांपूर्वी आमच्या शाळेच्या साईटवर मला आमचा वर्गमित्र राजेश गावडे याचा नंबर मिळाला. त्याच्याकडून मी आसावरीचा नंबर शोधून काढला. तब्बल २३ वर्षांनी आम्ही एकमेकींशी फोनवर बोललो. खूप गप्पा मारल्या. आम्ही एकमेकींपासून लांब जाऊन एवढा काळ उलटून गेला आहे, याची कुठेही जाणीव झाली नाही. तिच्याशी बोलल्यानंतर मी जवळपास अर्धा तास रडत होते. सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला. तिने पाचवीत असताना गायलेलं 'केशवा माधवा' हे गाणं मला अजूनही आठवतंय. आणि मी पाचवीत असताना पहिल्याच दिवशी तिनं मारलं म्हणून बाईंकडे केलेली तक्रार आठवतेय. शाळा सुटल्यावर आम्ही अगदी हातात हात धरून आम्ही बाहेर पडायचो आणि 'किस्मत अपनी खुल गयी' या गाण्यावर मान डोलवत आणि दोन वेण्या हलवत बाहेर पडायचो. शाळेच्या दिवसातले हे सगळे क्षण अगदी स्पष्टपणे आठवत होते. त्यादिवशी आमचं बोलणं झालं आणि मग मात्र आम्ही आता पुन्हा लांब जायचं नाही असं ठरवूनच टाकलं. एकदा बोलणं झाल्यानंतर आम्ही आता दर ३-४ महिन्यातून एकदा तरी भेटतोच. योगायोग असा की आम्हला दोघींनाही एक एक मुलगी आहे आणि दोघींची नावं 'अ' पासून सुरु होतात. खंत एकच आहे की शाळेत असताना ती उत्तम गायिका होती. पण आता मात्र तिने गाणं सोडलं आहे. आता ती एक उत्तम निवेदिका आहे. खरंच बालपणीची मैत्री किती शुध्द आणि खरी असते याची आम्हाला कायम जाणीव होत असते.
-मीनल राणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट