वयाची तिशी गाठली, तरी 'सिंगल' म्हणून मिरवणारे खूप दिसतात. त्यामुळेच सध्या 'थर्टीज् आर द न्यू ट्वेंटीज्' असा ट्रेंड दिसून येतोय. त्याविषयी...
'समवन समवेअर इज मेड फॉर यू,' 'दिल तो पागल है' सिनेमातला हा संवाद खरा असला; तरी अनेकांना ती व्यक्ती भेटण्यासाठी पंचविशी आणि हल्ली अगदी तिशीपर्यंत वाट पाहावी लागते. करिअर आणि तत्सम इतर कारणांमुळे अशी व्यक्ती भेटेपर्यंत तुम्ही वयाची तिशी गाठली, तरी चिंता करण्याचं कारण नाही. 'थर्टीज् आर द न्यू ट्वेंटीज्' असा सध्याचा नवा ट्रेंड आहे.
वयाची तिशी गाठली, तरी तुमच्या सिंगल असण्याबाबत कुणी तुम्हाला टोमणे मारत असेल, तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. परस्परांना समजून घेऊन, सोबत थोडासा वेळ घालवून मगच तुम्ही तुमच्या नात्याला पुढं जाऊ देणं योग्य आहे आणि लगेचच नातं जमलं नाही, तरीही तिशीतही 'सिंगल' असणं तुम्ही छान एंजॉय करू शकता.
थर्टीज् आर द न्यू ट्वेटिंज्
योग्य वयात लग्न होणं, गरजेच आहे; पण सध्या वयाच्या विशीत करिअर, भटकंती, स्वतःला समजून घेणं आणि लाइफ एंजॉय करणं यात लोकांचा बहुतांश वेळ जातो. त्यानंतर लग्न करण्याला अनेकांची पसंती आहे. त्यामुळेच 'थर्टीज् आर द न्यू ट्वेटींज्' या ट्रेंडला सगळ्यांची पसंती आहे.
स्वतःला वेळ द्या
तिशीतही सिंगल असण्याचा फायदा म्हणजे स्वतःला वेळ देता येणं; कारण विवाहीत मंडळींची नेहमीच लग्न, घर, पालक, मित्रमैत्रिणी आणि करिअर या सगळ्यांत दमछाक होते. त्यामुळे तिशीतही 'सिंगल' असलात तरी तुम्हाला स्वतःला वेळ देणं फायद्याचं ठरतं. तुम्ही छान स्वतःला वेळ देऊ शकता. मित्रमैत्रिणींसोबत भटकण्याबरोबरच निवांत गप्पा, वाचन असं सगळं काही करू शकता.
बंधन नसणं
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं ही आयुष्यातली सर्वांत छान गोष्ट असते. त्यातही चांगली गोष्ट म्हणजे कुणाचं कसलंही बंधन तुमच्यावर नसणं. नातं म्हटलं, की शेअरिंग, अॅडजस्टमेंट या सगळ्या गोष्टी येतात. जोपर्यंत तुम्ही 'सिंगल' आहात तोपर्यंत या सगळ्याची चिंता करण्याचं तुम्हाला कारण नाही. त्यामुळे जोपर्यंत सिंगल आहात तोपर्यंत ते असणं एंजॉय करा.
धोका पत्करू शकता
'सिंगल' असताना तुम्ही आयुष्यातल्या क्रेझी गोष्टी करू शकता. मग ते नोकरी बदलणं असो, मध्यरात्री उठून अचानक मित्रमैत्रिणींना भेटायला जाणं असो किंवा रस्ता माहीत नसलेल्या ठिकाणी लाँग ड्राइव्हला जाणं असो... असं सगळं या टप्प्यामध्ये बिनधास्त करता येतं. अगदी खरेदी करतानाही पुढचा मागचा विचार न करता आवडेल ते तुम्ही बिनदिक्कत घेऊ शकता. म्हणूनच ही रिस्कही एंजॉय करता येते.
विचारपूर्वक निवड
आयुष्यभरासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करणं, हा निर्णय प्रत्येकाच्याच आयुष्यात फारच महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच ही निवड विचारपूर्वक होणं गरजेचं आहे. त्यासाठी काही वेळ लागला तरी चालेल. म्हणून तिशीत असताना हा विचार पक्का ठेवा. खूप उशीर झालाय असं म्हणून गडबड करू नका.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट