सुखदा आणि समीर एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. एकमेकांच्या घरी येणं-जाणंही असल्याने सुखदा समीरच्या आई-बाबांना काका-काकू म्हणायची. लग्नानंतरही सुखदा समीरच्या आई-बाबांना काका-काकू म्हणूनच हाक मारते त्यामुळे अनेकांनी नाके मुरडली. पण सुखदा म्हणाली, 'मी आधीपासूनच त्यांना काका-काकू म्हणायचे. केवळ लग्न झालं, नातं बदललं म्हणून मी त्यांना आई-बाबा का म्हणावं? आणि काका-काकू म्हटल्यामुळे माझ्या मनातील त्यांच्याबद्दल आदर थोडीच कमी होणार का?' तिचं उत्तर बिनतोड होतं. शिवाय समीरच्या आई-बाबांची याला काहीच हरकत नसल्याने वादाचा मुद्दाच निकालात निघाला...
अलीकडच्या काही वर्षांत नाती आणि नात्यांच्या संकल्पना त्याच जरी असल्या तरी त्या नात्यांची संबोधनं कालानुरूप बदलू लागली आहे. आता हेच बघा ना, पूर्वी सून घरात आली की सासूला मामी आणि सासऱ्यांना मामा म्हणण्याची पद्धत असायची. नात्यात लग्नं होण्याच्या पद्धतीमुळं ही संबोधनं सुरू झाली असतील, तीच बहुतांश रूढ झाली. काही ठिकाणी सासूला आत्या म्हणूनही संबोधलं जातं. सासऱ्यांना मात्र घरातले सगळे लोक ज्या नावानं हाक मारतात, तेच नाव बहुधा सूनही घेते.. मग ते मामा, नाना, आबा, तात्या असं काहीही असायचं. ही झाली परंपरागत संबोधनं. यानंतरच्या काळात अनेक सूनबाई सासूला आई आणि सासऱ्यांना बाबा म्हणू लागल्या. या संबोधनामुळे नात्यातला दुरावा थोडासा कमी करण्याचा त्यात आपलेपणा आणण्याचा एक प्रयत्न केला जातो.
पण आता परिस्थिती बरीच बदलली आहे. कितीतरी सासू-सुना आज एकमताने, एकत्रितपणे वावरताना दिसतात. सासू-सुनेच्या नात्यात छान निखळ मैत्रीही दिसते. त्यामुळेच सासू-सासरे आता आई-बाबांऐवजी काकू-काका झालेत. त्याची कारणंही पुन्हा स्थित्यंतरातच आहेत. म्हणजे प्रेमविवाहांचं प्रमाण वाढू लागलं आहे. आधी मुलाची मैत्रीण म्हणून घरी येणारी मुलगी त्याच्या आई-वडिलांना काकू आणि काका म्हणत असते. मुलगा-मुलगीचं आधीच ठरलेलं असतं. त्यांनी लिहिलेल्या पटकथेनुसार मुलगी घरात आदर्श वागत असते. सासू-सासरे तिला न्याहाळत असतात. त्यातूनच सून म्हणून त्यांना ती पसंत पडते. अशी आधीपासून घरी येणारी मुलगी नातं बदललं तरी काकू आणि काका म्हणत असते. आपल्या आई-वडिलांची जागा कुणी घेऊ शकत नाही, अशीही अनेकींची भावना असते. पण जर या गोष्टी दोन्ही बाजूंच्या सहकार्याने होत असतील, तर यात कुणी शंका घेण्याचं कारणच नाही. मुळात नात्यांच्या संबोधनापेक्षा त्यातील ओलावा महत्त्वाचा. ही गोष्ट जाणली की संशयाला जागा उरणार नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट