रांगोळी सगळ्याच महिला काढतात. रोजची दारासमोरची रंगीबेरंगी रांगोळी, दिवाळीला अंगणभर मोठी रांगोळी, कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी... पण साधना टेंबेकर यांनी रांगोळी हे माध्यम समाज प्रबोधनासाठी वापरलं आहे.
आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आणि इतरांना समाजकार्यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने साधना टेंबेकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. पाणी, रक्तदान व स्त्रीभ्रूण वाचवा असे अनेक विषय त्यांनी त्यासाठी निवडले असून त्या सातत्याने रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पाण्याचा प्रत्येक थेंब दुष्काळग्रस्त परिस्थितीत किती महत्त्वाचा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्याबाबत कोणीच फारसे गंभीर नसतात. लोकांच्या मनावर पाणी वाचवा सारख्याच रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, अशा गोष्टी बिंबण्याची आज गरज आहे. त्यासाठी साधना यांनी रांगोळी हे माध्यम वापरले आहे.
ज्या स्त्रीला आपण शक्तीरूप मानतो तो स्त्रीगर्भच नाकारला जातो. दिवसेंदिवस गर्भपाताचे प्रमाण वाढते आहे, मुलगी झाली म्हणून तिला नाकारणारी कुटूंबे आज मोठ्या प्रमाणात आहेत. तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढते आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोदीजींनी केलेले आवाहन स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण झाडांची होणारी कत्तल व त्यायोगे उद्भवणारे जगासमोरील प्राणवायूचे संकट, मानव जातीच्या अस्तित्वालाच निर्माण झालेला धोका, अंधश्रद्धा, ध्वनी-वायू-जल प्रदूषण यासारखे अनेक प्रश्न साधना टेंबेकर यांनी आपल्या सुंदर सुबक रांगोळीतून रेखाटले आहे. रांगोळीची सुबकता अन् विचारांची सुस्पष्टता यामुळे त्यानी समाजमनात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट