आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक माणसं भेटत असतात. पण कधीकधी कुणी आपलं असं भेटतं आणि आयुष्यच बदलून जातं. त्या व्यक्तीसोबत आपलं खूप छान नातं जुळतं. पण काहीवेळा गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत, हे नातं नकोसं वाटू लागलं. कधी वाटतं की ते नातं जमवणं हेच जरा घाईत झालं होतं. त्यामुळे मग पुढचा पर्याय उरतो, ब्रेकअपचा.
या कटू घटनेचा घोट तर पचवावा लागतोच. पण जास्त त्रास होतो तो जोडीदाराला माफ न करण्याने. प्रत्येक नात्यात काही ना काही तक्रारी असतातच. पण जेव्हा आपण आपले विचार, भावना मनातल्या मनात कोंडतो, तेव्हा आपली समीकरणं कुठेतरी चुकत जातात. अशावेळी एकमेकांच्या चुका पोटात घालणं सोपं नसतं पण ते करावं लागतं.
माफ करणं कितीही कठीण असलं तरी ते करा. कारण त्यामुळे खरंच मनःशांती मिळते.
उगाच खूप काळ राग आणि भावना मनात ठेवल्याने तिरस्कार अधिक वाढतो. त्यामुळे त्याच त्या विचारांत गुरफटून आपण आणखीनच वैतागून जातो.
या सगळ्यातून बाहेर पडायचं तर माफ करा आणि विषय संपवून टाका.
झालेल्या गोष्टी पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा त्यांना क्षमा करून विषय संपवता येतात.
जितक्या लवकर तुम्ही नात्याच्या कटुतेतून बाहेर पडाल तितकं ते तुमच्यासाठी फायद्याचं असतं.
क्षमा केल्याने तुम्हाला मनातून मोकळं वाटतं. पुढच्या नात्यांसाठी एक धडा मिळतो. शिवाय मनावर कुठल्या भावनांचं ओझं न राहिल्याने तुम्ही उत्साही होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट