लहानपणापासूनच कलेची आवड असणाऱ्या रसिका कांबळीने इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे शालेय जीवनात विविध चित्रकला, हस्तकला स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. स्वामी विवेकानंद विद्यालयातून दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर तिनं कांदिवलीला निर्मला मेमोरियल फाउंडेशन कॉलेजला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. इथपर्यंत तिची कथा अगदी सर्वसामान्य मुलीसारखीच आहे. पण कॉलेजवरून घरी आल्यावर फावल्या वेळेत काय करावं, हा विचार तिच्या मनात आला आणि तिथेच तिचं वेगळेपण दिसलं.
आपल्याला मिळणाऱ्या या वेळेत आपण घरच्या घरीच एक लहानसा व्यवसाय सुरु केला तर...हा विचार तिने केला. ही इच्छा तिनं तिच्या आईला सांगितली. तिच्या आईनं देखील या गोष्टीला होकार दिला. पण व्यवसाय म्हणजे नेमकं करायचं काय? असा प्रश्न होताच. रसिकाला हस्तकलेची आवड होतीच, तिने बनवलेल्या विविध वस्तूंचं कौतुक शेजार-पाजारच्यांकडून होत होतं. त्यामुळे मग या वस्तूच विकण्याचा व्यवसाय करावा, असं रसिकाने पक्कं केलं. मग आईच्या मदतीने ती कामाला लागली. लहानपणापासून आईकडूनच रसिकाने या सगळ्या गोष्टींचं शिक्षण घेतलं होतं. डिझायनर पेपर क्राफ्ट, ओरिगामी, डेकोरेटिव्ह पर्स, पेपर- कापडी बॅग, वॉल पिसेस, पोर्टेबल रांगोळ्या, तोरणं, मण्यांची शोभिवंत फुलं, इमिटेशन ज्वेलरी यांसारख्या अनेक वस्तू रसिका बनवते. या वस्तूंना खूप मागणीही आहे. सध्या दिवाळी तोंडावर आल्यानं तिच्याकडे खूप ऑर्डर्स आल्या आहेत. त्यामुळे कॉलेजमधून घरी आल्यावर ती खूपच बिझी होऊन जाते. रसिका जरी हा व्यवसाय म्हणून करत असली तरीही पैशाचा हव्यास म्हणून ती हे करत नाही. वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या मूल्यात थोडासा नफ्याचा वाटा जोडून ती या वस्तूंच्या किंमती ठरवते. सध्या ती 'बीएएफ'च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून पुढे तिला फायनान्स या विषयात एमबीए करायचं आहे. या छोटेखानी व्यवसायाच्या निमित्ताने तिला या क्षेत्रातलं प्रशिक्षणच मिळत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट