लहानपणापासूनच रिद्धी सावलाला कला, कार्यानुभव आणि नक्षीकामाची आवड होती. आता तिने तिची ही आवड छोट्याशा व्यवसायात बदलायचं ठरवलं आहे. दोन वर्षांपूर्वी तिने दिवे बनवण्याचा एक कोर्स केला होता. हा कोर्स तसा प्राथमिक होता. पण त्यावर आपली कल्पनाशक्ती लढवून रिद्धीने सुरुवातीला घरातल्या घरात काही दिवे सजवायचे प्रयत्न केला. स्वतः काही नवीन डिझाइन्स बनवले. कोर्समध्ये दिलेल्या शिक्षणाचा उपयोग करत तिने नवनव्या प्रकारचे दिवे सजवायला सुरुवात केली. तिचं हे कौशल्य पाहून हळूहळू तिला शेजार-पाजारच्या लोकांकडूनही असे दिवे तयार करण्याची विचारणा होऊ लागली. त्यामुळे मग या वस्तू आपण विकल्या तर? अशी कल्पना तिच्या आईने रिद्धीला सुचवली. ही कल्पना रिद्धीलाही आवडली.
घाटकोपरला दरवर्षी हस्तकलेच्या वस्तूंचं एक प्रदर्शन लागतं. त्या प्रदर्शनात आपलाही स्टॉल लावायची कल्पना रिद्धीला सुचली. इथे सामील होणं, ही रिद्धीसाठी एक प्रकारची स्पर्धाच होती. तिथे तिच्या स्टॉलला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण तिला खूप काही शिकायला नक्कीच मिळालं. हा उद्योग वाढवायचा असेल तर आपल्याला वेगळं काही करायला हवं, हे मात्र तिने मनाशी पक्कं केलं. त्यानुसार तिने तिच्या डिझाइन्समध्ये नाविन्य आणि वेगळेपणा आणायचा प्रयत्न केला. आता तिने तयार केलेल्या दिव्यांनाही चांगलीच मागणी येते.
सध्या रिद्धी निर्मला कॉलेजमध्ये बी.एम.एमच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. अभ्यास सांभाळून ती तिचा छोटेखानी व्यवसाय करते. इतकंच नव्हे तर यासोबत ती कथ्थकही शिकते आहे. आता दिव्यांसोबतच ती हळदी-कुंकवाचे करंडे आणि दाराला लावण्यासाठी शुभ लाभची चिन्हही बनवते. या व्यवसायातून मिळालेले पैसेही रिद्धी योग्यप्रकारे जपते. सध्या नुसतेच दागिने आणि कपड्यांच्या छानछौकीत तिला हे पैसे घालवायचे नाहीत. तर भविष्यातल्या तिच्या व्यवसायासाठी भागभांडवल म्हणून ते जपून ठेवायचे आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट