'रविवारी तुम्ही मुलींच्या मागे आणि सोमवारी मुली तुमच्या मागे...टू मच फन', असा मेसेज सध्या सोशल मीडियावर तरुणांनी उचलून धरला होता. याला कारणही तसंच दमदार आहे ना राव! रविवारी आहे फ्रेंडशिप डे आणि सोमवारी रक्षाबंधन. यावर्षी हे अगदी लागोपाठ आले आहेत आणि तरुणाईने या संधीचा फायदा घेतला नाही असं होणं शक्य आहे का?
'कर्मा स्ट्राईक्स बॅक', असं म्हटलं जातं आणि यंदा नियतीनेदेखील हे सत्य करायचा घाटच घातलेला दिसतोय. मुलांनी रविवारी केलेल्या कर्मांचं अगदी करारा जवाब द्यायला मुली सज्ज झाल्या होत्या. त्यामुळे आधीच 'हिने मला राखी बांधली तर' या विचाराने घाबरलेल्या शूरवीरांचे कॉलेजने रक्षाबंधनची सुट्टी कॅन्सल केल्यामुळे चांगलंच धाबं दणाणलं होतं.
एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या रोड रोमिओंना सरळ करण्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेलं राखी नावाचं ब्रम्हास्त्र घेऊन यावर्षीसुद्धा मुली सज्ज झालेल्या आहेत. तर या ब्रम्हास्त्राला चुकवण्यासाठी उपाय शोधायला मुलंही महाचर्चा घडवताना दिसले. काही ठिकाणी 'मास बंक' करायचे प्लॅन आहेत तर काही शौर्याचे पुतळे आलेल्या वीकेंडचा फायदा घेऊन गावी गेले होते. एकीकडे 'तू बघच या फ्रेंडशिप डेला हा राहुल तिच्याशी मैत्री करतो की नाही ते!' अशा पैजा लावताना काही राहुल दिसत आहेत तर दुसरीकडे 'इस रक्षाबंधन को बेहेनका, सहेलीका सबका बदला लेगी रे तेरी सेजल' असं आश्वासन काही सेजल मैत्रिणींना देताना दिसत आहेत. काही मुलं नियतीच्या या वाईट खेळाला दोष देत कावरीबावरी झाली होती तर काही स्टडस् ती मला राखी बांधण शक्यच नाही या आत्मविश्वासावर ठाम होती. आता हा आत्मविश्वास त्याचा घात करेल की हा विश्वास खरा ठरेल याच्या वेगळ्याच पैजा इतरांमध्ये लागल्या होत्या.
सोशल मीडिया हे कलियुगातील कळीचा नारद आहे हे यावरुन सिद्ध झालेलंच आहे. त्यामुळेच अनेक मुलींची 'संडे को आप करोगे फन, मंडे को हम दिखाएंगे दम' अशी स्टेटस अपडेट पाहून मुलांचे ब्लड प्रेशर वाढलं. एकीकडे ती मला राखी बांधणार या विचाराने खट्टू झालेली भाबडी मुलं दिसत आहेत तर दुसरीकडे आता हा मला फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधनचं मिळून एकच गिफ्ट देणार म्हणून कॉलेजमधील मानलेल्या भाऊरायांवर काही भगिनी रुसल्या होत्या. एकंदर काय तर या अशा विलक्षण योगायोगामुळे सगळीकडे एक गमतीदार गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट