देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. आपलं म्हणणं, आपला विचार शॉर्टफिल्ममधून प्रभावीपणे मांडून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यातही तरुणाई आघाडीवर आहे…
साधारण बारा-तेरा वर्षांचा एक मुलगा. एका कॉलनीच्या पटांगणात तो राहायचा. पोटाची खळगी भरण्यासाठी पेपर विकायचा, चहा विकायचा, कॉलनीतल्या गाड्या धुवून द्यायचा. करायचा. कामाच्या मोबदल्यात त्याला जेमतेम काही रुपये मिळायचे. आपल्या छोट्याशा पिगी बँकमध्ये तो ते पैसे साठवून ठेवायचा. खेळण्यातली नव्हे, तर खरीखुरी गाडी विकत घ्यायचं त्याचं स्वप्न होतं. एके दिवशी कॉलनीतल्या काही लोकांचा संवाद त्याच्या कानांवर पडतो. स्वातंत्र्यदिन जवळ आलेला असतो. पण तो साजरा करण्यासाठी कुणीही वर्गणी द्यायला तयार नसतात. प्रत्येक जण काही ना काही कारण पुढे करतो. हे सगळं पाहून तो मुलगा मात्र पिगी बँकमधले जमवलेले पैसे घेऊन येतो आणि कॉलनीतील वरिष्ठ व्यक्तीकडे देतो. हे कथानक असणारी एक शॉर्टफिल्म गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. व्हॉटसअॅप, फेसबुकवर ही शॉर्टफिल्म खूप शेअर आणि हिट्स मिळवतेय. अशाच आशयाच्या आणखी काही शॉर्टफिल्म्स सोशल मीडियावर सध्या खूप व्ह्यूज मिळवत आहेत.
अनेक तरुण शॉर्टफिल्म मेकर्स आपल्या डोक्यातल्या कल्पना कॅमेऱ्यात उतरवू लागले आहेत. खूप वेगवेगळे विषय ते आपल्या लघुपटांतून मांडत असतात. या फिल्म जरी ‘शॉर्ट’ असल्या तरी या तरुणांच्या विचारांचा कॅनव्हास मात्र खूप मोठ्या असल्याचं यातून दिसून येतं. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं काही ना काही सामाजिक संदेश त्यातून दिला जातोय. कमीत कमी वेळेत आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडलं जातं. समीर टेंबुलकर हा अशाच फिल्ममेकर्सपैकी एक. 'इंडिपेंडन्स डे! इट्स नॉट अ हॉलिडे' नावाची ही शॉर्टफिल्म त्यानं तयार केली आहे. व्हॉटसअॅपवर या शॉर्टफिल्मचा व्हिडिओ त्यानं एका ग्रुपमध्ये पाठवला. काही तासांतच ही फिल्म व्हायरल होऊ लागली. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या समीरनं त्याच्या काही मित्रांना एकत्र घेऊन ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. मनीष नावगे, साहिल सुतार, राहुल खळे, आदित्य मलकापूरकर, मेहुल राठोड, प्रतीक शिरवटकर हे मित्र समीरच्या मदतीला होते.
'आपल्या समाजात लोक गणेशोत्सव, दहीहंडी आणि इतर सणांना वारेमाप खर्च करतात. आरती आणि मिरवणुकांना गर्दी करतात. पण स्वातंत्र्यदिन साजरा करायला त्यांच्याकडे वेळ, पैसा नसतो. स्वातंत्र्यदिनाकडे फक्त सुट्टी म्हणून पाहिलं जातं. ही बाब आम्हाला खटकली. म्हणून आम्ही ही शॉर्टफिल्म तयार केली आहे', असं समीर सांगतो.
वर्षभरात बनलेल्या आणखी काही हिट शॉर्टफिल्म्स
शॉर्ट फिल्म - दिग्दर्शक - व्ह्यूज
हॅपी इंडिपेंडन्स डे - दिव्यांश पंडीत - ४,१६,९९८
जन गण मन - विजय दास - १३,९५,६११
ह्युमन - गौरव धर्मानी - ३,४९,९०५
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट