पूर्वी स्त्रिया फारशा शिकत नव्हत्या. म्हणजे औपचारिक शिक्षण घेत नव्हत्या. मात्र, घरातून त्यांना त्यांच्या आजी, आत्या, मामी, काकू, आई अशांकडून गृहकृत्यदक्ष होण्यासाठी आणि टापटिपीनं संसार करता येण्यासाठी सर्व अनौपचारिक शिक्षण नकळतपणे दिलं जात असे. या शिक्षणाचा उपयोग त्या मुलींना भावी आयुष्यात होत असे.
पुढे मुली औपचारिक शिक्षण घेऊ लागल्या, शाळा- कॉलेजांतून शिकू लागल्या. शिकलेली स्त्री म्हणजे किमान पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली तरुणी. तिला आज तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, असं वाटणं स्वाभाविक आहे. त्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करावासा वाटणंही योग्यच आहे. म्हणजे अर्थार्जन!
मात्र, मुळात स्त्रियांनी घरकाम करायचं आणि पुरुषांनी कमावून आणायचं, ही आपल्या समाजाची मानसिकता अजून पूर्णपणे बदललेली नाही. आता काही नव्या पुढीची मुलं आपल्या बायकांना मदत करू लागली आहेत. सुधारणा होत आहे; पण आज एखादी उच्चशिक्षित तरुणी चांगल्या पगाराची नोकरी करत असेल, तर मला लग्नाआधी नोकरी न करता घरकाम करणारा मुलगा चालेल, असं म्हणेल का? आणि मुलगा तरी त्यासाठी तयार होईल का? मग इथंही कुणी आणि का शिकावं, हा प्रश्न येतोच.
घरकाम करणं, मुलं सांभाळणं या गोष्टीला आपण दुय्यम दर्जा देतो. खरंतर या गोष्टीला खूप महत्त्व आहे; कारण त्यामुळं कुटुंबाचं, पर्यायानं समाजाचं स्वास्थ्य टिकतं आणि आता तर स्त्री घरकाम आणि नोकरी दोन्ही गोष्टी करते; पण मग तिच्या स्वास्थ्याचं काय? घरकाम करणारी स्त्री आधीच स्वतःला कमी लेखते. मग तिनं शिक्षणच घेतलं नाही, तर तिचा समाजात वावरण्याचा आत्मविश्वास कमी नाही का होणार?
बऱ्याचशा स्त्रिया स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडून नोकरी करतात. अर्थात, हे चांगलंच आहे. कधी कधी यात त्यांचा पगार हा रोजच्या जाण्या-येण्याइतकाच असतो; पण बाहेर काम केल्यानं एक प्रकारचा मान मिळतो. आत्मविश्वास वाढतो. म्हणजेच स्त्री तिला मान मिळावा, तिची कदर केली जावी, यासाठी भुकेली आहे. जर तिच्या कामाला योग्य दाद मिळाली, तिचा आदर केला गेला, तर ती कमी शिकली किंवा जास्त शिकली, तरी काही वाटणार नाही आणि ‘मग शिकावं कशाला?’ असा प्रश्नही तिला पडणार नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट