सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी- कुर्डूवाडी रस्त्यावरील निमगांव हे माझ जन्मगाव, ब्रिटीशपूर्व काळात याला निंबगाव म्हणत. कडुनिंबाची खूप झाडं तेव्हा होती; म्हणून कदाचित हे नाव असावं. हे गाव टेंभुर्णीपासून सहा मैल अंतरावर मुख्य रस्त्यापासून उत्तरेस तीन मैल अंतरावर आहे.
इथं १९२७ साली माझा जन्म झाला. बालपणीचा १३ वर्षांचा काळ मी या गावी काढला. त्या वयातील माझ्या अनेक हृद्य आठवणी या गावाशी निगडीत आहेत. त्या शब्दबद्ध केल्या, तर एखादं पुस्तक तयार होईल. स्वातंत्र्यपूर्व काळातील गावाचं तेव्हाचं स्वरूप आजही मला स्पष्ट आठवतंय. गावाच्या पश्चिमेस १२ महिने स्वच्छ पाणी वाहणारा ओढा होता. तो आजही आहे; पण हल्ली पावसाळ्यातसुध्दा तो कधी कधी कोरडा पडतो. या ओढ्याच्या काठाकाठानं तेव्हा बोरी, चिंचा, जांभळ कवट, भोकर इ. राममेव्यांच्या झाडाचं बन होतं. या ओढ्याला तेव्हा ‘बनाचा ओढा’ म्हणत.
गावाच्या पूर्व दिशेस एक विस्तीर्ण माळरान होतं. या दगडगोट्यांच्या माळराणावर हरणांचे कळप, लांडगे, कोल्हे, खोकड, इ. वन्य प्राणी वावरत, तर खुरट्या झाडावर लालचोचा व लांब माना असलेली गिधाडं मृत प्राण्याच्या कलेवराची वाट पाहात बसलेली दिसायची. मोर, लांडोर, घारी, घुबड, लाव्हर, ससे, उदमांजर असे अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळत. या माळरानावर सध्या नष्टप्राय होत चाललेला उंच पायांचा माळढोक पक्षी पाहिला होता. आज ते माळरानही गायब झालंय आणि तिथे वावरणारे प्राणी, पक्षीही कुठे दिसत नाहीत.
गावाच्या दक्षिणेला पिंपळनेर नावाचं गाव आहे. उत्तरेकडे तेव्हा गायरान होतं. पावसाळा नेमेचि येत असल्यामुळे या गायरानात हिरवंगार गवत असायचं. त्यामुळे गावातील गुरं या कुरणावर दिवसभर चरत असायची, तर पहाटे पहाटे इथं चरण्यासाठी बैलांना आणलं जाई. आता गावात गुरंही फार राहिली नाहीत आणि ते गायरानही अस्तित्वात नाही.
गावत दसरा, दिवाळी, गौरी गणपती, रंगपंचमी, होळी, ईद, बकरी ईद, मोहरम इ. सण धूमधडाक्यात साजरे होत. जातिभेदाचं विष तेव्हा समाजात नव्हतं. त्यामुळे हे सर्व एकोप्यानं साजरे होत. हिंदू तरूण ताबुतापुढे (त्याला डोला म्हणत) नाचत, तर मुस्लिम गणपतीपुढे. देश सोडून जाताना इंग्रजांनी हा एकोपा नष्ट करण्याचं पुण्यकर्म(?) धूर्तपणे केलं. गावातील गल्लीबोळातून लहान मुलं विटीदांडू, गोट्या, लगोरी इ. खेळ खेळत, तर बाहेरील पटांगणावर मोठ्या मुलांचे लोंपाट (आट्यापाट्या), हुतुतू (कबड्डी), पतंग (वावडी) उडवणं, जवळील झाडावर सूरपारंब्या असे खेळ रंगायचे.
गावाच्या मध्यभागी एक चावडी होती. गावातील तंटेबखेडे गाव प्रमुख इथं बसून सोडवत. समोरील पटांगणात केव्हा केव्हा डोंबारी बहुरूपी (रायरंद) गारूडी, पहिलवान, मदारी, माकडवाले आपल्या कला सादर करत. गावात पोतराज, वासुदेव, फकीर, बैरागी गावभर फिरून भिक्षा मागत. गावाच्या प्रवेशद्वाराशी हुनुमान मंदिर होतं. त्या जवळच एक मशीद होती. श्रावण महिन्यात दरवर्षी सप्ताहाचं आयोजन केलं जायचं. हनुमान मंदिरात सात दिवस भजन, कीर्तन भारूड इ. कार्यक्रम होत. यासाठी आसपासच्या १० गावातील भजनी मंडळांना आमंत्रण असे. मंदिरात रात्रभर आळीपाळीनं जागर करत.
सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी मारुतीच्या फोटोची गावभर पालखी मिरवायची. त्या दिवशी गावातील स्त्रिया आपल्या दारांपुढे रांगोळ्या काढत. पालखी येताच दर्शन घेत. यावेळी मिरवणुकीतील लोकाना गूळ-दाणे किंवा दूध दिलं जायचं. गावात मिरवून पालखी देवळापुढे आल्यावर तिथे अभंग व शेवटी प्रसादाचा अभंग होई. नंतर दिंडीतील सर्वांना व गावकऱ्यांना गव्हाच्या खिरीचा प्रसाद दिला जायचा. मोहरमचा मुस्लिमांचा सणही दणक्यात साजरा व्हायचा.
पुण्यातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होताच गावातील वडिलोपार्जित शेती सांभाळण्यासाठी मला गावी जावं लागलं होतं. तिथं मी ३५ वर्षं शेती केली. १९८७ साली पत्नीच्या आजारामुळे मला पुण्यास यावं लागलं. तेव्हापासून मी पुणेकर झालोय. ३० वर्षं झाली, तरी आजही मला स्पष्ट आठवतात ते बालपणीचे दिवस! सध्या माझं वास्तव्य मुलाकडे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट