'अँड द अवॉर्ड गोज टू...' हे शब्द लवकरच वॉशिंग्टन वरून थेट भारताच्या कानावर पडण्याकडे मुंबईतल्या काही हौशी तरुणांच्या समूहाचं लक्ष लागलेलं आहे. आदित्य खुडे नावाच्या तरूण दिग्दर्शकाच्या 'सफर' या शॉर्टफिल्मला सध्या 'मार्क्यू ऑन मेन' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत नामांकन मिळालंय.
'अँड द अवॉर्ड गोज टू...' हे शब्द लवकरच वॉशिंग्टन वरून थेट भारताच्या कानावर पडण्याकडे मुंबईतल्या काही हौशी तरुणांच्या समूहाचं लक्ष लागलेलं आहे. आदित्य खुडे नावाच्या तरूण दिग्दर्शकाच्या 'सफर' या शॉर्टफिल्मला सध्या 'मार्क्यू ऑन मेन' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत नामांकन मिळालंय. परदेशात आपली छाप पाडणाऱ्या या तरुणाने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरही नाव कमावलेलं आहे. त्याने 'रोजा' या शॉर्टफिल्मसाठी राष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट डिरेक्टर व एडीटर' हा पुरस्कार पटकावला आहे. शॉर्टफिल्म हे सध्या कमी वेळात उत्तम कलाकृतीने ठसा उमटवण्याचं एक परिणामकारक व्यासपीठ ठरत आहे. आदित्य खुडे ही या व्यासपीठाचा उपयोग करत जागतिक स्तरावर आपलं नशीब आजमावत आहे.
सध्या आदित्य एका नामांकित फिल्म स्कूलमध्ये सिनेमाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतोय. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतानाच त्याने इंटरकॉलेजिएट स्पर्धांमध्ये आपली छाप पाडायला सुरुवात केली. यंदा दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या 'सफर' या शॉर्टफिल्मच्या प्रवासाचे रंजक अनुभव सांगताना आदित्य म्हणतो की, 'खूप दिवसांपासून काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. प्रेमकथा वगैरे हा माझा जॉनर नव्हे. पण एका लेक्चरला मी पूर्ण स्क्रिप्ट लिहून काढली. सुरुवातीला कथा ऐकून कलाकार थोडे घाबरले होते. त्यांची ही भीती घालवण्यासाठी आठवडाभर वर्कशॉप्स घेतल्यानंतर शेवटच्या दिवशी मी त्यांना एका सिग्नलला नेलं व भिक मागण्यास सांगितली. सुरुवातीला मस्करी वाटली पण मी खरंच सांगतोय म्हटंल्यावर त्यांना भिक मागणं भाग होतं. अवघ्या ९ मिनिटांत १९० रू. त्यांनी जमवले आणि मग त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलंच नाही. सफरच वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण फिल्म खऱ्याखुऱ्या जागी चित्रीत करण्यात आली आहे. ५-६ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही शॉर्टफिल्म पूर्ण झाली. ही फिल्म सध्या विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली असून नॉर्थ कॅरोलिना नॉमिनेशन सोबत इतर स्पर्धांच्या निकालाचा प्रतिक्षेत संपूर्ण टीम आहे'.
'सफर'मधील ही अनोखी संकल्पना तर 'रोजा'मधील वास्तविक विषय हाताळताना नक्की काय विचार होते याबद्दल आदित्यला विचारलं असता, 'विषया पलीकडे जाऊन विचार करणं हे मला आधीपासूनच आवडतं. त्यामुळे या ही विषयांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून मी बघण्याचा प्रयत्न केला. आता या विषयांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळताना पाहून आनंद होतोय', असं त्याने 'मुंटा'शी बोलताना सांगितलं. आपल्या शॉर्टफिल्मच्या टीमबद्दल बोलताना आदित्य म्हणतो, 'सफर असो वा रोजा दोन्ही फिल्म्ससाठी माझ्या टीमने मला खूप मदत केली आहे. यात त्यांचंच श्रेय आहे'.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट