Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

जोहार मायबाप!

$
0
0

माझ्या गानप्रवासात अनेकांचा हातभार लागला आहे. काणेबुवांचे माझ्यावर ऋणच आहेत. त्यांनी अतिशय मनापासून आणि ओतून देऊन मला शिकवले. 'जोहार मायबाप' हा अभंग त्यांनीच मला शिकवला आणि आता तो माझी ओळख बनून गेला आहे. आलेली संधी स्वीकारणे हे गुरूंनी मला शिकवले आहे.

मंजूषा पाटील

गायिका म्हणून प्रस्थापित होण्यात माझ्या आयुष्यात सांगलीच्या जोडीने पुण्याचा वाटाही मोठा आहे. माणिक वर्मा, राम मराठे, पं. सी. आर व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, विद्याधर गोखले, शोभा गुर्टू हे सगळे मोठे कलाकार काणेबुवांच्या परिचयाचे. त्यामुळे त्यांना पाहत, ऐकत माझ्यातली गायिका घडत होती. या सगळ्यांच्या मैफली इचलकरंजीमध्ये व्हायच्या, तेव्हा कधीकधी मी तानपुऱ्यावर असायचे. दैवी संधीच ही! मग मैफल करण्याइतपत गाणे शिकल्यानंतर मी पुण्यात येऊ लागले. पुण्यात गायले म्हणजे जगात गायल्यासारखे आहे. पुण्यात गाण्याची पहिली संधी मला गांधर्व महाविद्यालयाच्या प्रमोद मराठे यांनी दिली. त्यानंतर गानवर्धन, भारत गायन समाज अशा संस्थेत छोटे-मोठे कार्यक्रम केले; पण 'सवाई'ने मला गायिका म्हणून महाराष्ट्राबाहेर पोहोचवले.

१९९८साली मला 'सवाई'मध्ये पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली. आकाशवाणीचे रवींद्र आपटे यांनी माझ्या खासगी मैफलीचे आयोजन केले होते. त्याची कॅसेट त्यांनी भीमसेन अण्णांना ऐकवली. ती ऐकल्यानंतर अण्णांनी 'सवाईमध्ये बोलवा तिला,' असे थेटच त्यांना सांगितले. असा विश्वास खुद्द अण्णांकडून दिसल्यानंतर जग जिंकल्यासारखेच वाटले मला. करिअरच्या विविध टप्प्यावर मार्गदर्शक माणसे भेटणे आणि त्यांच्यामुळे एखादी सुवर्णसंधी चालून येणे, हा योगायोग असतो. आपटे काका मला असेच भेटले.

मला आकाशवाणीच्या देशपातळीवरील स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाल्यानंतर काणेबुवांच्या डोळ्यांतला आनंद खूप सुखावून गेला. 'सवाई'मध्ये मी गाते आहे, हे पाहायला काणेबुवा नव्हते, याची खंत वाटते. ते निवर्तल्यानंतर पंधराच दिवसांत मला 'सवाई'चे निमंत्रण आले. त्याचवेळी मला 'जसराज गौरव' पुरस्कारही जाहीर झाला. तो माझा पहिला मोठा पुरस्कार. हा गौरव पाहायलाही काणेबुवा नव्हते. त्यांच्या शेवटच्या काळात मी चोवीस तास त्यांच्यासोबत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते मला शिकवत होते. त्यांना हलकेसे बरे वाटू लागल्यानंतर 'चल, काढ तंबोरा,' असे फर्मान काढायचे. मग मीही गाण्यासाठी तयार. गुरूशी एकरूपता साधल्यानंतर, त्यांच्या पायाशी, शिकवणीशी लीन झाल्यावरच हे होऊ शकते.

लग्न होऊन पुण्यात आल्यावर 'बेडेकर गणपती मंदिर'चे गोविंदकाका बेडेकरांशी ओळख झाली. २००१साली गणपती मंदिरात दिवाळी पहाट करायला त्यांनी मला बोलावले. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे इतके घट्ट संबंध निर्माण झाले, की ते माझे दुसरे माहेरच झाले. संगीताच्या क्षेत्रात पुण्यात पाय रोवण्यासाठी बेडेकरकाकांनी पूर्णत: पाठिंबा दिला. 'सवाई'च्या पहिल्या सादरीकरणावेळी भीमसेन अण्णांशी तोंडओळख झाली होती. बेडेकर काकांमुळे त्यांच्याशी उत्तम ओळख झाली. तेव्हाच्या भेटीत त्यांनी मला 'सवाई'च्या ५०व्या कार्यक्रमात आमंत्रित केले. तेव्हा २० हजार प्रेक्षकांसमोर मला गायचे होते. माझे गायन संपत असताना 'जोहार मायबाप' गाण्याची फर्माईश प्रेक्षकांनी केली. मी तो अभंग गाणार नव्हते; पण रसिक श्रोते ऐकायलाच तयार नाहीत. वेळ संपली होती. मी अण्णांकडे पाहिले. रसिकांचा प्रतिसाद ओळखून त्यांनी मला सादरीकरणाची वेळ वाढवून दिली. रसिक खूपच खूष झाले. माझे हे गाणे दिल्लीपर्यंत गेले. त्यावेळी रसिकांच्या प्रतिसादाबरोबरच अण्णांनी दिलेल्या 'असेच गात राहा' या आशीर्वादाचे मोल माझ्यासाठी अतुलनीय आहे.

'जोहार'विषयी मला येथे सांगायला आवडेल. 'जोहार मायबाप' ('संगीत कान्होपात्रा'मधील अभंग) मला काणेबुवांनी शिकवला. मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्वची भजने काणेबुवा उत्तम गायचे. त्याचा त्यांनी अभ्यासही केला होता. त्यांनीच ती माझ्या गळ्यात उतरवली असे म्हणता येईल. 'अवघाचि संसार', 'परब्रह्म निष्काम', 'श्रीरंगा कमलाकांता', 'धाव घाली विठू आता' अशी बरीचशी. १९९८ मध्ये मी 'सवाई'मध्ये 'जोहार' गायल्यानंतर प्रेक्षकांनी ते अक्षरश: उचलून धरले. दोनदा वन्समोअर मिळाला. मी एकटी हा अभंग गात नव्हते. अनेक सरस गायकांनी तो गाऊन उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. 'सवाई'च्या पहिल्या संधीपासूनच माझ्या मैफलीत 'जोहार' झालेच पाहिजे, असे जणू समीकरण बनत गेले असावे. का कुणास ठाऊक; पण रसिकांच्या पसंतीची पोचपावती वाटते मला ती. दुसऱ्या 'सवाई'मध्येही त्याची पुनरावृत्ती झाली आणि 'मंजुषा म्हणजे जोहार' हे श्रोत्यांच्या मनात पक्के बसले.

२०००मध्ये संदीप पाटीलशी माझे लग्न झाले. पुण्यात नव्या संसारात स्थायिक व्हायचे होते. करिअर करत असलेल्या स्त्रीला लग्नानंतर बदलेल्या आयुष्याची झळ बसते. त्यात ती कलाकार असेल, तर ती जरा जास्तच; कारण आम्हा गायकांचा एक पाय कायम बाहेर असतो. 'गाता गळा फुलता मळा' असे म्हणतात. त्यामुळे कितीही अडचणी आल्या, तरीही नित्यनियमाने रियाज करावाच लागतो. त्यात स्त्री गायकाचा आवाज वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलतो. ते ओळखून रियाजाची पद्धत, वेळ बदलावी लागते. रियाज थांबवला, तर गळा जड होतो. यासाठी मला नवऱ्याची खूप मदत झाली. स्वत:चा व्यवसाय सांभाळून मुलीला ताकदीने वाढवण्यासोबतच मी नसताना संस्कार करण्याची सगळी जबाबदारी त्याने उचलली. मी बाहेर असताना त्याने चक्क आई म्हणून माझी जागा घेतली. आईची जागा वडिलांनी भरून काढणे अवघड असते. त्याचा भक्कम मानसिक पाठिंबा होता, म्हणून मी गरोदर असतानाही रियाज सोडला नाही, की मैफली थांबवल्या नाहीत. त्यावेळी मी सोफ्यावर बसायचे आणि टेबलावर तानपुरा आडवा ठेवून रियाज करायचे. बाळंतपणानंतर पाचव्याच दिवशीच रियाज सुरू केला. खंड कधीच नाही, एवढी गायनाशी मी बांधले गेले होते.

एक किस्सा मला आठवतो, सातवा महिना सुरू होता. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या निवेदनाची पंचविशी होती. या कार्यक्रमात त्यांना मास्टर दीनानाथ मंगेशकरांची गाणी म्हणणारी गायिका हवी होती. गाडगीळांनी मला फोन केला आणि येण्याचा आग्रह धरला. या महिन्यात प्रवास करायला डॉक्टरांनी मला मनाई केली होती; पण मला मुंबईच्या कार्यक्रमाची संधीही सोडायची नव्हती. अखेर योग्य ती काळजी घेऊन नवऱ्याच्या सोबतीने मी ट्रेनने मुंबईला पोहोचले. त्या मैफलीत मी चक्क एक तास गायले, तेही मांडी घालून. या कार्यक्रमाला आशा भोसले अध्यक्षस्थानी आणि त्या पहिल्या रांगेत कार्यक्रम ऐकायला बसल्या होत्या. गाणे झाल्यानंतर त्या झटकन उठून स्टेशपाशी आल्या आणि मला हात दिला. तेथे त्या माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहेत हे कळले. 'छान गायलीस,' असे म्हणून पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि काळजीपोटी या अवस्थेत का आलीस, असे म्हणून रागावल्याही. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

आलेली संधी स्वीकारणे हे गुरूंनी मला शिकवले आहे. संधी दार ठोठावते, तुम्ही ती स्वीकारली नाही, तर तिला काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो तुम्हालाच. तुमच्या नकारानंतर ती पुन्हा दुसऱ्या कुणाच्या शोधात निघते. कोणतेही 'बॅनर' नसताना मला चांगले लोक, मार्गदर्शक मिळत गेले आणि मी घडत गेले. सुरुवात चांगली झाली, तर पुढचा सगळा प्रवास चांगला ठरतो. माझ्या गानप्रवासाबाबत असेच झाले. उत्कृष्ट गुरू मिळण्यापासून माझा प्रवास सुरू झाला. तेथून पुढच्या प्रवासातही उत्तम सोबती, मार्गदर्शक मिळत गेले आणि प्रवास अधिक सुरात झाला. भविष्यातही होईल यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>