मूल नकोय आम्हाला! 'भविष्यात मी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. मान्य असेल त्यांनीच संपर्क साधावा'...विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटवर हल्ली अशा प्रकारे आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणाऱ्या तरुण-तरुणींचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच 'चाइल्डलेस बाय चॉइस' असणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण वाढू लागलंय. शब्दुली कुलकर्णी पियुष आणि गार्गी (नावं बदलेली आहेत) यांचा प्रेमविवाह झाला. हे जोडपं त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आनंदी जोडपं म्हणून ओळखलं जायचं. लग्नाला चार-पाच वर्ष उलटली आणि घरात पाळणा कधी हलणार असा प्रश्न ज्येष्ठ मंडळी विचारु लागली. शेवटी एके दिवशी दोघांनी आपला, मूल न होऊ देण्याचा निर्णय आई-वडिलांना सांगून टाकला. अशा जोडप्यांची संख्या हळूहळू वाढू लागलीय. अनेक जोडपी असा धाडसी निर्णय घेऊ लागली आहेत. अशा जोडप्यांना 'चाइल्डलेस कपल' असं म्हटलं जातं, तर या निर्णयाला 'चाइल्डलेस बाय चॉइस' असं म्हटलं जातं. प्रोफाइलमधूनही देतात पूर्वकल्पना 'आपल्याला मूल नको आहे' हे ही तरुण मंडळी आधीच स्पष्ट करतात. विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटवर स्वत:ची माहिती देताना तसा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. रिचा (नाव बदललं आहे) तिच्यासाठी सुयोग्य जोडीदाराचा शोध घेत असताना एका मुलाच्या माहितीकडे तिचं लक्ष गेलं. त्या मुलानं त्याच्या माहितीमध्ये 'मी भविष्यात मूल न होऊन देण्याचा निर्णय घेतलाय. माझ्या या निर्णयाशी सहमत असलेल्या मुलीनं माझं प्रोफाइल बघावं', असं स्पष्टपणे लिहिलं होतं. अशी स्पष्ट पूर्वकल्पना देणाऱ्या तरुण-तरुणींचं प्रमाण वाढलं असल्याचं विवाह जुळवणाऱ्या संस्थांची मंडळी सांगतात. आकडेवारी काय सांगते? - भारतामध्ये मूल नको असलेल्या जोडप्यांचं जे एकूण प्रमाण आहे, त्यात दरवर्षी अंदाजे त्या टक्केवारीच्या २५ टक्के इतकी वाढ होतेय. - मूल नको असलेल्या जोडप्यांचं प्रमाण जगभरात साधारण २० टक्के आहे. - भारतात अशा जोडप्यांचं प्रमाण दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये अधिक आहे. - येत्या काळात अशा जोडप्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जातेय. कारणं काय? - करिअरला प्राधान्य. - जबाबदाऱ्या नको असणं. - आत्मविश्वासाची कमतरता. - करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांचं संतुलन साधता न येणं. - खासगीपणा मिळण्यासाठी. - मानसिकदृष्ट्या असक्षम. ०००० सध्या लग्नच ३०-३५व्या वर्षी होत असल्यानं साहजिकच जोडप्यांच्या पालकांचं वय साठीच्या पुढे पोहोचलेलं असतं. पालक वयोमानामुळे थकलेले असतात. त्यामुळे तेही कित्येकदा नातवांची जबाबदारी घ्यायला तयार नसतात. अशा वेळी बाळाचं संगोपन कोण करणार? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मूल न होऊन देण्याचा निर्णय घेतला जातो. लग्नाआधी तशी पूर्वकल्पना देण्याचंही प्रमाण आता वाढलंय. - गौरी कानिटकर, मॅरेज काऊन्सेलर ०००० महिलाही पुरुषांच्या बरोबरीनं आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करू लागल्या आहेत. करिअर प्राधान्यक्रमावर असल्यावर मुलांची जबाबदारी काही जोडप्यांना नको असतात. व्यावहारिक आयुष्यात यशाचं शिखर गाठताना इतर जबाबदाऱ्या नको असतात. करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यातलं संतुलन बिघडू नये म्हणून हा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण वाढतंय. -डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट