नोकरी किंवा इंटर्नशिप मिळवून देण्याऱ्या एखाद्या वेबसाइटवरून किंवा मोबाइल अॅप्लिकेशन्समध्ये येणाऱ्या जाहिरातींमधून मोठ्या पदाच्या/पगाराच्या कामाचं आमिष दाखवून फ्रेशर्सना नावनोंदणी करण्यास भाग पाडलं जातं. या नोंदणीच्या प्रक्रियेमधून विद्यार्थी आपली वैयक्तिक माहिती या वेबसाईट्सना देत असतात. या माहितीचा वापर करून विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधत, त्यांना विशिष्ट ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जातं. त्या ठिकाणी गेल्यावर रजिस्ट्रेशन फी किंवा एनरोलमेंट फीच्या नावाखाली काही रक्कम मागितली जाते. बऱ्याचदा ही रक्कम भरल्यावर नंतर येण्यास सांगितलं जातं. दरम्यानच्या काळात ह्या वेबसाइट्स बंद होणं, त्यांच्याशी संपर्क साधल्यास उडवाउडवीची उत्तरं मिळणं, सुरुवातीला सांगितलेल्या नोकरीपेक्षा वेगळ्याच प्रकारच्या नोकरीसाठी पाठवलं जाणं किंवा काही वेळा तर कामाच्या आमिषानं बोलावून अत्याचार केल्याची अनेक उदाहरणंही घडली आहेत. त्यामुळे एकूणच याबाबतीत खूप खबरदारी घेणं आवश्यक असून, आवश्यकता भासल्यास पोलिसांकडे तक्रारही करायला हवी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कशी घ्याल खबरदारी?
- विद्यार्थ्यांनी/फ्रेशर्सनी इंटर्नशिप किंवा नोकरी शोधताना पालक अथवा संबंधित क्षेत्रातल्या ओळखीच्या व्यक्तींकडून त्या क्षेत्राविषयी, त्यातल्या नोकरीच्या संधींविषयी माहिती करून घ्यावी.
- नोकरी किंवा इंटर्नशिप मिळवून देण्याऱ्या साइट्सची नीट माहिती मिळवावी. अन्य काही वेबसाइट्स, त्यांच्या याबद्दलच्या प्रक्रिया याबद्दल जाणून घ्यावं.
- ज्या कंपनीच्या नोकरी किंवा इंटर्नशिपसाठी रजिस्टर केलं आहे, त्या कंपनीविषयी, कामासाठी उपलब्ध रिक्त जागांविषयी थेट त्या कंपनीशी संपर्क साधून विचारणा करावी. संबंधित माहितीसाठी योग्य संपर्क देण्यात आला आहे का हे पाहावं.
- मुलाखतीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी केल्याचं लक्षात येताच लगेचच पैसे देऊ नयेत. गरज भासल्यास त्याविरुद्ध तक्रार करावी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट