ऑफिसमधील जबाबदारी आणि घर, कुटुंबीयांसोबत घालवायचा वेळ यामध्ये योग्य अंतर ठेवणं सध्याची गरज बनलं आहे. कामाचे वाढते तास पाहता हे अंतर राखणं अवघड झालं असून, त्यावर वेळीच तोडगा काढला नाही, तर नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची भीती असते.
सध्याचे नोकरीचे तास वाढले आहेत. घरी किंवा कुटुंबाला वेळ देण्यापेक्षा अनेकजण ऑफिसमध्येच जास्त काळ असतात. मग एकटं राहून, घरच्यांशी विनाकारण अबोला धरून ऑफिसच्या चक्रातच गुरफटले जातो. एकमेकांना पुरेसा वेळ न देण्यावरून नात्यात वादाची ठिणगी पडते आणि वैवाहिक संबंधांत तेढ निर्माण होते. अशातही आनंदी राहून नात्याचा समतोल नक्कीच साधता येईल. यासाठी काही साध्या-सोप्या टिप्स आहेत...
१. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आधी करिअरचं ध्येय ठरवा. किती कालावधीत ऑफिसमध्ये कोणत्या पदावर पोहोचायचं आहे, हे स्पष्ट असल्यास धावपळ होणार नाही. यामुळे स्पर्धेचा ताणही जाणवणार नाही.
२. सातत्यानं कामाची अपेक्षा करणारा, सतत रिपोर्ट, प्रेझेंटेशनची मागणी करणारा बॉस असो किंवा स्पर्धा निर्माण करणारे सहकारी असोत, त्याचा ताण येणार यात शंका नाही. यामुळे अनेकदा घरीही काम करावं लागतं. यासाठी घरून काही कॉल करावे लागतील किंवा ई-मेल पाठवावे लागतीलही. हे टाळता येणार नाही नक्कीच; पण यामुळे तुमची एनर्जी किंवा मूड खराब होता कामा नये, हे लक्षात घ्या. ऑफिसचं काम सांभाळून घरच्यांसोबतही संवाद साधता आला पाहिजे.
३. घरी असताना ऑफिसचा एखादा ई-मेल किंवा कॉल घेण्यापूर्वी तो आत्ताच घेणं गरजेचं आहे का, उद्या ऑफिसला गेल्यावर उत्तर दिलं, तर चालेल का याचा आधी स्वत: विचार करा. याचं उत्तर ‘हो’ असेल, तर मोबाइल इंटरनेट बंद करा किंवा ई-मेलकडे दुर्लक्ष करा. झोपण्यापूर्वी तर ई-मेल तपासूच नका. तसं केलंच, तर एखादं महत्त्वाचं काम राहिल्याचं लक्षात आल्यानं झोपही येणार नाही.
४. सोशल मीडियाच्या सवयीवर नियंत्रण ठेवता आलं नाही, तर त्याचं व्यसन लागतं. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असताना व्हॉट्सअॅप, ट्विटर बंद ठेवा. अगदीच शक्य नसेल, तर त्याची विशिष्ट वेळ निश्चित करा.
५. ‘गुड वर्क मिन्स मोअर वर्क’ अशी म्हण इंग्रजीत आहे. तुम्ही चांगलं काम करत आहात, हे बॉसच्या लक्षात आल्यास तो विश्वासानं तुम्हाला आणखी जबाबदारी देतो. हे तुमच्या प्रगतीच्या दृष्टीनं नक्कीच चांगले आहे. मात्र, एका मर्यादेनंतर जास्तीचं काम तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या आड येतं आहे, हे लक्षात आल्यास तशी कमिटमेंट टाळा. यासाठी ‘नाही’ म्हणायला शिका.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट