मुंबई टाइम्स टीम बॉडी शेमिंग अलीकडे सर्रास पाहायला मिळतं. पण, ही गोष्ट दिसायला जेवढी साधी वाटते तेवढी नाही. या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीच्या मनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र हे कधी कुणी लक्षात घेत नाही. यामुळे काही जण डिप्रेशनमध्येही जातात...हे म्हणणं आहे सुप्रसिद्ध लेखक सुदीप नगरकर याचं. या विषयावर आधारित 'शी फ्रेंडझोन माय लव्ह' या सुदीपच्या नव्या पुस्तकाचं अलीकडेच मुंबईमध्ये प्रकाशन झालं. यावेळी त्यानं तरुणाईमध्ये पाहायला मिळणाऱ्या बॉडी शेमिंगच्या प्रकारावर आपलं मत मांडलं. कुणाला जाड असण्यावरुन, कुणाला उंचीवरुन तर कुणाला दिसण्यावरुन वाट्टेल तसं बोललं जातं. पण त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो ते लक्षात घ्यायला हवं. यातून त्या व्यक्तीवर ताण येतो. ती व्यक्ती वाट्टेल ते करून यातून बाहेर पडण्याची धडपड करते. त्यातून जिममध्ये जाणं, सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो. म्हणूनच आपले मित्र-मैत्रिणी कुठल्याही दडपणाखाली येणार नाहीत याची काळजी घ्या, असं सुदीप सांगतो. 'शी फ्रेंडझोन माय लव्ह'च्या प्रकाशन कार्यक्रमाला तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. एक मुलगी आणि मुलगा यांच्यातली घट्ट मैत्री आणि त्या दोघांपैकी एकाला दुसऱ्याबद्दल वाटू लागलेलं प्रेम, त्यातून पुढे निर्माण होणारे प्रश्न यावर आधारित कथा या पुस्तकात आहे. नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या सुदीपनं या पुस्तकात फ्रेंडझोन आणि बॉडीशेमिंगवर आपले विचार मांडले आहेत. हे पुस्तक देखील वाचकांना आवडेल असा विश्वास त्यानं व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट