इंग्लिशमध्ये पिरिएड या शब्दाचा अर्थ 'पुरे' किंवा 'स्टॉप' असाही होतो. पाळी सुरू होणे म्हणजे मुलीचे फुलणे, बागडणे, विकसित होणे याला 'स्टॉप' करणे, असा मुळीच नाही. अरण्या नावाची कवयित्री म्हणते, 'हर पिरिएड डझंट मिन्स ए स्टॉप'; त्यामुळे स्वत:ला आहे तसे स्वीकारून बाईने आपला मासिक पाळीचा काळ आत्मविश्वासाने आणि बाई असण्याच्या अभिमानातून सामान्यपणे व्यतीत करायला हवा. आश्लेषा महाजन ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणते, आणि जाताना फुले मागते... कविवर्य आरती प्रभू यांची ही कविता आपल्या प्रेयसीला उद्देशून आहे, असे वरवर वाटले, तरी ती मनातल्या प्रतिभेला उद्देशूनही आहे. वास्तविक या ओळी कुठल्याही संदर्भाला जोडता येतील, इतक्या त्या मोघम, तरीही सखोल आहेत. वयात येणाऱ्या मुलीला पाळी येते, चार दिवस मुक्काम करते आणि जाते! येताना ती मिटलेल्या कळ्यांसारखी अबोल असते; पण अंतर्यामी खूप सारे काहूर असते तिच्या. उमलतानाची उलघाल असते. जाताना मात्र ती फुले मागते. उत्फुल्ल आनंदाने ती नाहते. एखाद्या कवितेच्या किती परिमिती असाव्यात! स्त्री आणि तिच्या शरीरातून दर महिन्याला स्रवणारा लाल प्रवाह, अर्थात रजोप्रवृत्ती (पाळी) हा एक मूलभूत, सार्वकालिक आणि सार्वत्रिक विषय आहे. यामध्ये गरीब-श्रीमंत, काळी-गोरी, शिक्षित-अशिक्षित, जाड-हडकुळी, अमक्या वर्ण-वर्गाची, अमक्या जातीची-धर्माची, भारतीय-परदेशी, असे कुठलेही भेदाभेद नाहीत. जगातील कुठलीही स्त्री असो, तिला साधारण नवव्या/दहाव्या वर्षी पाळी येते. साधारण पंचेचाळीस/अठ्ठेचाळीस वय झाल्यावर रजोनिवृत्ती (मेनॉपॉज) येईपर्यंत हे पाळी प्रकरण स्त्री जन्माला चिकटलेले असते. स्त्रियांना प्रति महिन्याला चार दिवस गुणिले वर्षाचे १२ महिने, म्हणजे वर्षाला ४८ दिवस रक्तस्राव होतो. स्राव जवळजवळ २४ तास ठिबकतच राहतो. पाळी सुरू झाल्यापासून मेनॉपॉज येईपर्यंत आयुष्यातील सुमारे १,६०० दिवस स्त्री आपल्या शरीरातील एका अवयवातून सतत बाहेर पडणाऱ्या रक्ताचे अहोरात्र व्यवस्थापन करत असते. १,६०० दिवस म्हणजे सुमारे ५ ते ६ वर्षे. पाच ते सहा वर्षे असे काहीसे मोघम आकडे सांगण्याचे कारण शारीरिक, मानसिक, सामाजिक व्यवहारातील आहे. यातील काही कारणे स्त्रीशी संबंधित आहेत, काही पुरुषसापेक्ष आहेत, काही समलैंगिक वा तृतीयपंथी असण्याने निर्माण होतात, तर काही अन्य सामाजिक कारणांमुळे आहेत. काही कारणांनी 'नॉर्मल परिस्थितीत' स्त्रियांना अपत्य होत नाही, पर्यायाने त्यांची पाळी चुकत नाही. त्यामुळे त्यांचा मासिक रक्तस्राव रजोनिवृत्तीपर्यंत होतच राहतो. अशा स्त्रियांचा रक्तस्रावाचा काळ सहा पेक्षा अधिक काळाचा असू शकतो. शरीरातून क्षणाक्षणाला रक्त ठिबकत असताना ते कपड्यांवर वा अन्यत्र सांडत राहू नये म्हणून ते शोषून घेण्यासाठी, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सतत सतर्क आणि दक्ष राहायचे, ही गोष्ट सोपी नाही. कंबरदुखी, पोटदुखी, रडू येणे, चिडचिड यांवर नियंत्रण मिळवून शांत राहणे, नव्हे दिनक्रम सुरळीत ठेवणे सोपे नाही. या काळात पतीने पत्नीची काळजी घेणे, धीर देणे आवश्यक असते; पण अधिकतर घरांमध्ये बाईची पाळी म्हणजे काहीतरी घाण, किळसवाणे, अस्पृश्य, गेल्या जन्मीचे पाप असे काहीही समजले जाते. आजही! जसा झाडाला मोहर येतो, ते त्याच्या सर्जनाचे स्वरूप असते, तसा बाईला मासिक स्राव येतो. या आत्यंतिक नैसर्गिक आणि जैविक घटनेकडे स्वच्छपणे का पाहता येत नाही? वास्तविक तो लाल प्रवाह म्हणजे तिच्या रसरशीत तारुण्याचे, तिच्यातल्या सर्जनोत्सवाचे द्योतक आहे. त्याला अपवित्र समजून त्याचे देहातून वहन करणाऱ्या बाईलादेखील अपवित्र मानून शिवाशिव पाळणे हे मागासलेपण आहे. त्याचे अवडंबर मानून, शुभाशुभाचे कुतर्क लढवून रजस्वला स्त्रियांना सणसमारंभात मज्जाव करून आपल्या समाजाला कोणती क्रांती अभिप्रेत असते? पूर्वी बाई 'विटाळशी' असली, की तिला 'बाजूला बसावे' लागे. तिला 'कावळा शिवल्यामुळे' ती चार दिवसांसाठी अस्पृश्य ठरवली जात असे. त्यात सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना होत्या, तसा काही समंजस घरांमध्ये तिला चार दिवस आराम मिळावा, हाही हेतू होता/असतो. घरातील काकू-आजी वगैरे महिलावर्ग आणि बाबा-काका वगैरे पुरुष मंडळीही बाईच्या 'बाजूला बसण्यातून' उद्भवणाऱ्या साऱ्या कौटुंबिक उठाठेवी नाईलाजाने किंवा अटळ कर्तव्य म्हणून करत होते. काही घरांत विटाळशी बाईला कुजकट टोमणे ऐकावे लागतात. तिच्या अशा विटाळशी होण्याने नवऱ्याला आपला पुरुषी अहंकार बाजूला ठेवून घरात चार कामे करावी लागत. पोरांचे हाल होत. त्याचे खापरही तिच्यावर फोडले जाई. शिवाय या दिवसांत देवपूजा, व्रत-वैकल्ये, मंदिरात जाणे इत्यादी निषिद्ध मानले जात होते, आजही काही घरात हे घडते. आता बहुसंख्य घरांमधून 'कावळा शिवला' तरी नेहमीसारखे दिनचक्र फिरवले जात आहे. आधुनिक बाई तर या काळात 'भूपाळी ते अंगाई' अशी तारेवरील कसरतही करत असते. पाळी चालू आहे म्हणून तिला कार्यालयीन कामात सूट मिळत नाही. पाळी आहे म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या बिगारी बाईला विशेष सवलत मिळत नाही. पाळी आहे म्हणून सुट्टी घेऊन आराम करणाऱ्या मोजक्या स्त्रिया सोडल्या, तर बहुसंख्य बायका चेहऱ्यावरील हसू कायम ठेवून अनेक आघाड्यांवर लढत असतात. तो अगदी खासगी मामला असतो. तो जगाला ओरडून सांगण्याचा आणि त्यातून कामचुकारपणा करता आला तर करायचा, असे प्रकार फार क्वचित घडत असतील. स्त्रिया रोजच्या दिवसाप्रमाणे पाळीचे चार दिवसही नॉर्मल पद्धतीने पार पाडतात. पर्याय नसतो. संत चोखा मेळा यांची पत्नी सोयराबाई अभंगातून विटाळाची आणि अस्पृश्यतेविषयीची कैफीयत अशी मांडते : देहासी विटाळ, म्हणती सकळ। आत्मा तो निर्मळ, शुद्ध-बुद्ध ।।१।। देहींचा विटाळ, देहींच जन्मला। सोवळा तो झाला, कवण धर्म ।।२।। विटाळा वाचून, उत्पत्तेचे स्थान। कोणा देह निर्माण, नाही जगी ।।३।। म्हणुनी पांडुरंगा, वानितसे थोरी । विटाळ देहांतरी, वसतसे ।।४।। देहाचा विटाळ, देहींच निर्धारी। म्हणतसे महारी, चोखीयाची ।।५।। सोयराबाईचे दु:ख बहुपेडी आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत बाईच्या देहाचा विटाळ आहे. जातींच्या उतरंडीत महार स्त्रीचा घरात व समाजात होणारा विटाळ आणि स्पृश्यास्पृश्य कल्पनांनी माखलेल्या वर्णभेदाच्या उतरंडीचा विचार, असा अनेक अंगांनी या अभंगाकडे पाहता येईल. विटाळावाचून उत्पत्तीचे स्थान नाही, मानवी वा कुठलाच जन्म विटाळाविना शक्य नाही. बाईच्या लाल प्रवाहाच्या थांबण्या-वाहण्यात मनुष्यजन्माचे रहस्य दडलेले असते, हे माहीत असूनही मासिक पाळीविषयी समाज इतका असंवेदनशील कसा असू शकतो? पुरुषांनी जरा कल्पना करावी, की आयुष्यातील पाच ते सहा वर्षे सातत्याने त्यांच्या अवयवातून रक्तस्राव होत राहिला, तर ते तो त्रासदायक प्रकार कसा सहन करतील? बहुसंख्य असंवेदनशील पुरुषांच्या भाऊगर्दीत काही मोजके पुरुष आहेत, जे स्त्रीवादी भूमिकेतून विचार आणि कृती करत असतात. स्त्री समजून घेण्याचा ते प्रेमाने आणि नेटाने प्रयत्न करतात. हल्ली तरुण-तरुणींत मैत्री-प्रेम-सहवास या गोष्टींमधला मोकळेपणा वाढला आहे. पाळीच्या दिवसांत ओटीपोटात खूप दुखते, हे मैत्रिणीकडूनच कळलेले असते. त्या काळात तिला समजून घेणारे काही प्रेमवीर असतात. माध्यमांमधील सॅनेटरी नॅपकिन्सच्या जाहिराती खूप काही 'कुजबुजत' सांगतात. सॅनेटरी नॅपकिन्स तुलनेने आरामदायी असले, तरी त्यातही त्रुटी आहेत व त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार सॅनेटरी नॅपकिन्स वापरणाऱ्या महिलांचे जगातील प्रमाण आहे फक्त १२ टक्के. म्हणजे ८८ टक्के महिला फडकी वा अन्य बाबी वापरतात. स्वच्छता व आरोग्य या दोन्ही दृष्टीने फडकी वापरणे अयोग्य होय. अर्थात, सॅनेटरी नॅपकिन्स सुद्धा खूप आरामदायी व हायजेनिक असतात, असे नाही. परदेशी पॅड्सच्या तुलनेत स्वस्त स्वदेशी पॅड्स देणाऱ्या अनेक समाजसेवी संस्था निर्माण झाल्या बाईविषयीच्या तळमळीतून. छोट्या बाळांना, रुग्णांना आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठीही विविध प्रकारचे व विविध उद्देशांचे पॅड्स माफक किमतीत देणे आणि वापर झाल्यावर त्यांचे योग्य रीतीने विघटन होणे, ही काळाची गरज आहे. तमिळनाडू राज्यातील कोईमतूर इथल्या अरुणाचलम् मुरुगानंदम् हा असाच एक संवेदनशील पुरुष. आधी आईचे व नंतर पत्नीचे पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड्सविना होणारे हाल त्याला बघवले नाही. त्याने विविध प्रयोग करून अधिक शोषणक्षमता असलेले रास्त किंमतीतले इकॉनॉमी पॅड्स विकसित केले. आपल्याला आवश्यक असलेल्या पॅड्सपैकी ३६ टक्के भारतात बनतात, उरलेले ६४ टक्के आयात करावे लागतात. या पार्श्वभूमीवर मुरुगानंदचे कार्य पहायला हवे. आधुनिक समाजात ५० टक्के म्हणजे अर्धी लोकसंख्या स्त्रिया आहेत असे गृहीत धरले, तर त्या निम्म्या घटकाच्या शरीरातून आयुष्यातील सुमारे पाच ते सहा वर्षे वाहणाऱ्या रक्ताला सामावून घेण्याचे काम किती मोठे, नोबल आहे! परदेशी कंपन्यांचे पॅड्स महाग असतातच, शिवाय ते विघटनशील असतीलच, असे नाही. स्त्रियांनी वापरलेले कितीतरी पॅड्स रस्त्यांवर, उकिरड्यात, सार्वजनिक शौचालयात फेकले जातात. पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होतो. त्या कचऱ्याचे काय करायचे, हा प्रश्न जिकिराचा आहे. तरुण कवयित्री अरण्या जोहर हिची एक कविता 'टू ब्लीड विदाउट व्हायोलन्स' ही एकूणच अमंगळ असे भेदाभेदभ्रम मानणाऱ्या व्यवस्थेच्या विषयीची बोलकी प्रतिक्रिया आहे. इंग्लिशमध्ये पिरिएड या शब्दाचा अर्थ 'पुरे' किंवा 'स्टॉप' असाही होतो. पाळी सुरू होणे म्हणजे मुलीचे फुलणे, बागडणे, विकसित होणे याला 'स्टॉप' करणे, असा मुळीच नाही. अरण्याला तो अर्थ मान्य नाही. ती म्हणते, 'हर पिरिएड डझंट मिन्स ए स्टॉप'; त्यामुळे स्वत:ला आहे तसे स्वीकारून बाईने आपला मासिक पाळीचा काळ आत्मविश्वासाने आणि बाई असण्याच्या अभिमानातून सामान्यपणे व्यतीत करायला हवा. तिने कवितेतून घोषवाक्यच दिले आहे 'ब्लीड विथ प्राइड.' (लेखातील आकडेवारी समाजमाध्यमांच्या साहाय्याने घेतली आहे.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट