गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असतानाच, सोशल मीडियावर 'से नो टू पीओपी' हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पर्यावरणरक्षणासाठी एक पाऊल म्हणून प्रणय चव्हाण या मराठी तरुणानं तयार केलेल्या या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळत असून, तो चर्चेत आहे.
पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. याबाबत कितीही सांगितलं जात असलं, तरी लोकांमध्ये अद्याप पुरेशी जागरुकता निर्माण होताना दिसत नाही. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रणय चव्हाण या तरुणानं गणेशोत्सवाच्या आधी एक व्हिडिओ तयार केला आणि तो युट्यूबवर अपलोड केला. एफबी, तसंच युट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. आत्ता त्याला अकराशेहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरवर्षी गणेशविसर्जनानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती चौपाटीवर विखुरलेल्या बघायला मिळतात. पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी प्रणयनं हा व्हिडिओ बनवला. त्यातून लोकांना शाडूच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच शाळकरी मुलं 'से नो टू पी ओ पी' असं म्हणताना दिसतात. तिथून या व्हिडिओला सुरुवात होते. पुढे प्रणयचे आई-वडिल-भाऊ असे सर्व कुटुंबीय या व्हिडिओत दिसतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्यातूनच त्यांनी केलेल्या संकल्पाची माहिती ते या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवतात. पर्यावरणाबद्दल नेहमीच जागरूक असलेल्या चव्हाण कुटुंबियांनी यंदा हा आगळावेगळा संकल्प केला आहे. जिथे-जिथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती असतील तिथे दर्शनासाठी जाणार नाही असा हा संकल्प आहे. आपला हा संकल्प त्यांनी व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला आहे. या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं प्रणय सांगतो. या संकल्पामुळे शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी हा संदेश ठळकपणे लोकांपर्यंत जातोय. या व्हिडिओला काही लोकांनी प्रतिसाद देत, यंदा शाडूच्या मूर्तीच आणणार आहोत असं चव्हाण कुटुंबियांना कळवलं. पण, काहींनी शाडूच्या मूर्तीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीची देखील माहिती दिली. येत्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी आणखी लोकजागृती करणार असल्याचं प्रणय चव्हाणनं 'मुंटा'ला सांगितलं. प्रणय स्वत: खासगी क्लासेसमध्ये शिकवतो आणि आकाशवाणीवर निवेदक म्हणूनही काम करतो. साधारण चार मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. तो प्रणयनं घरातच शूट केला आहे.
कोणतीही गोष्ट ठरवली तरी त्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळावं लागतं. यामध्ये मला माझ्या संपूर्ण कुटुंबाची साथ मिळाली. निसर्गाचा आदर आपण करायलाच हवा. या सगळ्याची स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे सोशल मीडिया. म्हणून शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करा हे आम्ही लोकांना आग्रहपूर्वक सांगतोय आणि त्याला खूप प्रतिसाद देखील मिळतोय.
- प्रणय चव्हाण
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट