घाटकोपरच्या मूर्तीकाराची किमया रिमोटचं एक बटन दाबायचा अवकाश की दागिन्यांनी मढवलेल्या गणेशमूर्तीच्या दागिन्यांतला हिऱ्यांचा रंग बदलतो. नमस्कार केलात की आशीर्वाद देण्यासाठी बाप्पाचा हात हलतो. या आगळ्यावेगळ्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत मूर्तीकार नितीन चौधरी यानं... कौस्तुभ तिरमल्ले, पाटकर-वर्दे कॉलेज सध्याचा जमाना डिजिटलचा असून गणेशमूर्तींमध्येही हा तंत्रज्ञानाचा डिजिटल टच दिसून येऊ लागला आहे. रिमोटच्या सहाय्यानं गणेशमूर्तीच्या दागिन्यांमधले हिऱ्यांचे रंग बदलणं, सेन्सरच्या मदतीनं बाप्पाचा आशीर्वादाचा हात हलणं अशी वैशिष्ट्यं असलेल्या गणेशमूर्ती घाटकोपरच्या नितीन चौधरी या मूर्तीकारानं तयार केल्या असून, या आगळ्यावेगळ्या मूर्तींना चांगली मागणी आहे. गणेशोत्सवामध्ये दरवर्षी काही ना काही नवनवीन गोष्टी येत असतात. नितीननं साकारलेल्या या वेगळ्या गणेशमूर्ती सध्या चर्चेत आहेत. या गणेशमूर्ती बनवताना त्यात सेन्सर आणि मोटरचा वापर करण्यात आला आहे. सेन्सरच्या मदतीनं गणपती बाप्पाचा हात जेव्हा हलतो तेव्हा समोर बसून साक्षात बाप्पाच आपल्याला आशीर्वाद देतोय असं वाटतं. नितीन गेल्या दहा वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करतो. तसंच नाटकांसाठी प्रकाशयोजना करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. हिऱ्यांचा रंग बदलणाऱ्या सुमारे पन्नास गणेशमूर्ती नितीननं तयार केल्या आणि त्या सर्व विकल्या गेल्या आहेत. या मूर्तीची किंमत साधारण साडेतीन हजारांपासून आहे. तर हात हलवणाऱ्या आठ मूर्ती त्यानं तयार केल्या. त्याच्या किंमती साधारण पाच हजारांपासून आहेत. कशी बनते मूर्ती? एखादी पीओपीची गणेशमूर्ती जशी बनते तशीच ही मूर्ती तयार होते. फक्त जिथे हिरे लावायचे आहेत तिथला भाग पोकळ सोडला जातो. गणेशमूर्तीचे हात हलावेत म्हणून हाताच्या पंजाचा भाग बाजूला ठेवून संपूर्ण गणपतीची मूर्ती बनवण्यात येते. नंतर हाताच्या पंजाला सेन्सर आणि मोटर लावून तो मूर्तीशी जोडण्यात येतो. हिऱ्यांकरीता सोडलेल्या पोकळ भागात एलईडी आणि सेन्सरचा वापर केला जातो. सेन्सर आणि एलईडी चालू करून, तो नीट काम करतोय ना हे तपासून पाहिलं जातं. सर्व सेन्सर बरोबर चालत आहेत याची खात्री झाल्यावर गणेशमूर्तीचं रंगकाम केलं जातं. अशा तऱ्हेनं ही डिजिटल गणेशमूर्ती तयार होते. सध्याचा जमाना हा इंटलिजन्स आणि स्मार्टनेसचा आहे. त्यामुळे मला गणेशमूर्तीमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं. पण, काय करावं हे नेमकं सुचत नव्हतं. एकदा एका लहान मुलाला रिमोट कंट्रोलची कार घेऊन खेळताना बघितलं. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. नितीन चौधरी संपर्क :- ९९८७०८७८७२ (9987087872)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट