रोहिणी हट्टंगडी
'चार दिवस सासूचे' ही माझी पहिली मराठी मालिका. तब्बल तेरा वर्षे चाललेल्या या मालिकेच्या आठवणी माझ्यासाठी खास आहेत. डेली सोपचे युग तेव्हा नुकतेच सुरू झाले होते. या मालिकेमधील देशमुख कुटुंबावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. यामध्ये मी साकारलेली आशालता देशमुख ही व्यक्तिरेखा तसेच कविता लाड हिची सुनेची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी, की लोड शेडिंगमुळे एपिसोड पाहायचा राहिल्यास रात्री २ वाजता लागणारा रिपीट टेलिकास्ट पाहणारेही काही प्रेक्षक होते. अर्थात, या यशाचे श्रेय संपूर्ण टीम आणि चॅनेललाही जाते. आशालताची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी वाटण्याची बरीच कारणे होती. सुरुवातीला नकारात्मक छटा असणारी; मात्र त्यानंतर स्वभाव बदलत गेलेली ही भूमिका होती. आशालता एक परिपूर्ण स्त्री होती. घर आणि करिअर या दोन्ही आघाड्यांवर ती सक्षमपणे उभी होती. अभिनेत्री म्हणून करिअर करताना मीसुद्धा या दोन्ही आघाड्यांवर संतुलन राखण्यासाठी झटलेली आहेच; त्यामुळे आशालता उभी करणे सोपे गेले. माझ्यामधील ते संतुलन येथे उपयोगी पडले. आशालता एक आदर्श महिला, एक आदर्श सासू ठरली. केवळ कठोर होऊनच नव्हे, तर प्रेमानेही घर एकत्र बांधून ठेवता येते, हे तिने दाखवले. तिच्यामधील स्पष्टवक्तेपणा मला भावला.
चित्रपट करताना शूटिंगसाठी मर्यादित कालावधी असतो. सामान्यतः ३०-४० दिवसांत एका पात्राचे चित्रीकरण संपते. मालिकेमध्ये मात्र कलाकार त्या पात्रामध्ये हळूहळू मुरत जातो. ते पात्र अधिक खोलीने समजून घेण्यास, अनुभवानंतर त्यात सुधारणा करण्यास वेळ मिळत जातो.
माझ्या वयापेक्षा कितीतरी अधिक वयाच्या भूमिका मला मालिकांमध्ये अनेकदा मिळाल्या आहेत. त्या साकारताना अवघडलेपण येते का, असेही मला विचारण्यात येते. मालिकाच काय, चित्रपटांमध्येही मी अनेकदा वयापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मग ती कस्तुरबा गांधी यांची भूमिका असो, 'अग्निपथ' असो, की 'मुन्नाभाई एमबीबीएस'. 'होणार सून मी या घरची' या प्रचंड गाजलेल्या मालिकेतही माझी भूमिका आजेसासूची होती. मुख्य पात्रांइतकीच त्यातील आईआज्जीही लोकप्रिय झाली. नुकत्याच येऊन गेलेल्या 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतही मी आजेसासू साकारली; मात्र हे पात्र आईआज्जीच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होते. माई आज्जी प्रेमळ, कडक आणि पारंपरिक होती, तर 'ब्रेकअप'मधील आजी मॉडर्न, खुल्या विचारांची, नातसुनेशी मोकळेपणाने वागणारी होती. ही वैशिष्ट्ये लक्षात घेता ही आज्जी नेमकी कशी दिसावी, हे आम्ही ठरवत होतो. ही आज्जी अंबाडा घालणारी, साडी नेसणारी टिपिकल आजी नको, असे कटाक्षाने सांगण्यात आले होते. तेव्हा वापरून बघितलेला ब्लंट कटचा विगचा कायम ठेवावा, असा निर्णय घेण्यात आला. या पात्राचे एकंदरित व्यक्तिमत्त्व पाहता जॉगिंगसाठी या आजीने टी-शर्ट घालावा, असे मी सुचवले. ते मान्यही झाले. आताच्या युगात आजीने असे राहणे-वागणे भोवताली सहजपणे दिसून येते; त्यामुळे पात्रे वास्तवाच्या अधिक जवळ जाऊन प्रेक्षकांशी जोडली जातात.
पात्राचे वागणे, व्यक्त होणे, मनापासून पटले किंवा तार्किकदृष्ट्या योग्य वाटले, तरच कलाकारही ते व्यवस्थित साकारू शकतो. असा अजिबात न पटणारा प्रसंग मराठी मालिकांमध्ये माझ्या वाट्याला कधी आला नाही. एका हिंदी मालिकेत असा अनुभव मला आला. त्या मालिकेत मी सासूची भूमिका करीत होते. तो प्रसंग होता, माझा मुलगा पुरात वाहून बेपत्ता झाल्याचा. त्या वेळी तो मृत झाल्याचे सगळ्यांनी मान्य केलेले असते; मात्र सुनेला ते पटत नसते. तिला ते पटवून देण्यासाठी सासू आपल्या सुनेच्या बांगड्या फोडते, असे दृष्य लेखकाने लिहिले होते. आता ज्या स्त्रीचा मुलगाच वारला आहे, ती शोक करील की सुनेच्या बांगड्या फोडेल? दिग्दर्शकाने समजूत घालूनही हा प्रसंग करण्यास मी साफ नकार दिला. अशी अतार्किक दृष्ये प्रसंगी मला नाकारावीही लागली.
हिंदी आणि मराठी मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप भिन्न आहे. दोन्हीमध्ये काम केलेले असल्याने मोठा फरक मला जाणवला. हिंदी मालिकांचा प्रेक्षक भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे, अगदी यूपी, बिहारमधील एका छोट्याशा खेड्यापर्यंत. तुलनेने महाराष्ट्रातील समाज पुढारलेला, प्रगत आहे. अगदी ग्रामीण भागातही किमान शहाणपण दिसून येते. आपली संस्कृतीच वेगळी आहे. याचे प्रतिबिंब मालिकांमध्ये दिसते. हिंदी मालिका बनविताना याचा विचार निर्माता, दिग्दर्शकाला करावा लागतो. त्यामुळे हिंदी मालिकांमधील कथा, त्यातील नाट्यमयता वेगळीच दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून तर हिंदी मालिका मला पाहवतच नाहीत. त्याच्या कथेला ना शेंडा ना बुडखा, असा प्रकार दिसतो.
काही हिंदी मालिका करताना नियोजनबद्धतेचा अभावही जाणवला. एपिसोड बँक नसणे, सणावारांसाठीचे विशेष एपिसोड करण्याबाबत आयत्या वेळी निर्णय घेऊन धावाधाव करणे, कथा कमालीची भरकटणे, असे प्रकारही मी जवळून पाहिले. याउलट मराठीत चांगला अनुभव आला. 'चार दिवस सासूचे' करताना हे नियोजन जाणवले. तेरा वर्षे सलग ही मालिका सुरू होती; पण महिन्याकाठी केवळ १२-१३ दिवस शूटिंग चालायचे. त्यामुळे एवढी वर्षे काम करूनही आमच्या टीममधील कोणताही सदस्य कधीच कंटाळलेला दिसला नाही. आता मराठी मालिकांसाठीही दिवसाला १०-१२ तास काम करावे लागते, असे ऐकिवात आहे. हे लोण मराठीत येत असेल, तर वेळीच थोपवायला हवे.
मराठी सिनेमे आणि मालिकांसाठी आताचा काळ खूप चांगला असून प्रेक्षकांना अधिक वेगवेगळ्या, अधिक चांगल्या भूमिकांमधून भेटण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.
(शब्दांकन : श्रद्धा सिदीड)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट