Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

नृत्याभिनयातलं ‘ऐश्वर्य’

$
0
0

नृत्य, अभिनय, भाषा, रायफल शूटिंग, फोटोग्राफी अशा विविध गोष्टींमध्ये रमणारी अष्टपैलू कलावंत म्हणजे ऐश्वर्या काळे. ज्येष्ठ साहित्यिक वपुंची नात असलेल्या ऐश्वर्यानं नृत्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आगामी 'कलंक' सिनेमातल्या तीन गाण्यांमधून ती माधुरी, आलिया आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत नृत्य करताना दिसेल...

गार्गी पेठे

मोठी बहीण तन्मयीच्या पावलावर पाऊल ठेवत ऐश्वर्या काळे नृत्यात रमू लागली. सातव्या वर्षापासून रत्नाकर शेळके यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवून काही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊ लागली. पुढे शामक दावर यांच्याकडूनही तिनं मार्गदर्शन घेतलं. 'दम दमा दम', 'फुल टू धमाल' या कार्यक्रमांची ती विजेती ठरली. 'बुगी-वूगी', 'कबूम', 'डान्स इंडिया डान्स' अशा कार्यक्रमांमध्ये तिनं तिच्यातल्या नृत्यांगनेची चुणूक दाखवली. एनसीसी कॅडेट म्हणून रशियामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करत तिनं 'ऑल इंडिया बेस्ट कॅडेट' होण्याचा मानही मिळवला.

नृत्यावर हुकूमत

नृत्य आणि भाषा शिकण्याच्या प्रवासाविषयी ती म्हणाली, की 'फर्ग्युसनमधून जर्मन आणि समाजशास्त्र या विषयात पदवी मिळवून मी पुढे लॅटिन, सालसा, बचाता, लोकनृत्य, ओडिसी, कथक, भरतनाट्यम्, बेली डान्स, कंटेम्पररी, भांगडा आणि हिप-हॉप या नृत्यप्रकारांचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर १०० इयर्स ऑफ बॉलिवूड, पंचम द इमॉर्टल, प्रभात ते सैराट, कपूर्स डायरी, डान्स इंडिया डान्स अशा थीमवर आधारित नृत्य कार्यक्रमांतून अमेरिका, रशिया, सिंगापूर, दुबई, ओमान, इस्त्रायल या देशांचे दौरे केले. या भटकंती दरम्यान हिब्रू, ग्रीक, रशियन या भाषा आत्मसात केल्या.'

सिनेमा-नाटक आणि बरंच काही

'बोकड', 'जय जय महाराष्ट्र माझा', 'सखे सोयरे' या सिनेमांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं आहे. 'मल्हार', 'मूड इंडिगो', 'फिरोदिया करंडक' स्पर्धांमध्ये यश मिळवत 'लवंगी मिरची कोल्हापूरची' या नृत्य नाटकात प्रमुख भूमिका तिनं साकारली. 'चिऊताई चिऊताई दार उघड' या ब्रॉडवे पद्धतीच्या आणि 'विठा' या पारंपरिक लावणीवर आधारित नाट्याचं तिनं केलेलं नृत्यदिग्दर्शन गाजलं. 'बेली डान्स फ्लॅश मॉब'च्या इंडिया बुक रेकॉर्ड्स फॉर बेली डान्समध्येही तिचा सहभाग होता. सापांच्या अभ्यासात रमणारी ऐश्वर्या रायफल शूटिंग, कलरीपयट्टूच्या प्रशिक्षणात रमतानाच छायाचित्रण-चित्रकला हे छंदही जोपासत आहे.

आणि 'कलंक' जमून आला

करण जोहरच्या 'कलंक' या बड्या सिनेमात माधुरी दीक्षित, आलिया भट आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत ऐश्वर्या तीन गाण्यांमध्ये झळकणार आहे. याबद्दल ती म्हणाली, 'शास्त्रीय नृत्याची पार्श्वभूमी असल्यानं ही तीन गाणी मिळाली. रेमो डिसूझा दिग्दर्शित गाण्यात आलियासोबत, तर सरोज खान दिग्दर्शित गाण्यात माधुरी दीक्षित यांच्यासमवेत नाचण्याचा स्वप्नवत अनुभव मिळाला. तिसऱ्या गाण्यात कियारा अडवाणीबरोबर लीड डान्सर म्हणून दिसणार आहे.'

आई सीमा काळे, गोपीकृष्ण, मनीषा साठे, रेमो, टेरेन्स लुईस, अझीजा देगवेकर, पुनीत पाठक आणि माधुरी दीक्षित ही माझी प्रेरणास्थान आहेत. वपु हे ऐश्वर्याचे आजोबा होते अशी ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहेन. आजोबांच्या साहित्यावर काम करायची माझी इच्छा आहे. माझ्या स्टुडिओतून विशेष व्यक्तींसाठी नृत्याचं व्यासपीठ तयार करायचं आहे.

- ऐश्वर्या काळे, नृत्यांगना-अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>