अनुभव, अनुभूती, आत्मशोध या अनुषंगाने व्यक्ती आणि कलाकार म्हणून वाटचाल करत असताना, मागे वळून पाहिल्यास क्षणोक्षणी येणारे सांगीतिक तसेच वैयक्तिक अनुभव समृद्ध करताना दिसतात. ते पारखून त्यातील उत्तम अनुभवांचा संग्रह मला आत्मशोधाकडे नेत असतो. मी कोण, आपण कोठून आलो, आपले कार्य काय, या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरे देतो. \Bसानिया पाटणकर\B संगीत शिक्षण घेताना, त्यानंतर मैफिली करताना विविध अनुभवांनी मला समृद्ध केले. सांगीतिक अनुभवांत यमन, बागेश्री, भूप, मालकंस, भैरव, तोडी या राजांच्या दरबाराला तोड नाही; परंतु जयपूर-अत्रोली घराण्याच्या बुद्धिवादी, जोड, अनवट रागांची तालीम पं. मिलिंद मालशे यांच्याकडे घेत असताना, कानड्याचे १८ प्रकार, नटांचे प्रकार, डागुरी, मालीगौरा, अनेकविध गौऱ्या, खोकर, बहादुरी, खटतोडी, खंबावती, अनेक बिलावल या खजिन्यामुळे डोळे दिपून जातात. बुद्धीला चालना मिळते. डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे 'श्रुती' या विषयावर गहन अनुभव घेताना, सागराचा तळ शोधायला निघाल्याची अनुभूती आम्ही घ्यायचो. किती विविध रंग आणि ढंग होते ते. अश्विनीताईंची 'रागरचनांजली' असो किंवा त्यांनी दिलेले शेकडो ठुमरी, दादरे, लोकसंगीताचे प्रकार, भावसंगीत, अभंग, भजने, झूला, कजरी, बारामासा, होरी हे वैयक्तिक जीवनालाही स्पर्शून जायचे. अत्यल्प अशा सहवासात का होईना; पण पं. राजूरकर, पं. शरद साठे यांच्या टप्पा गायकीने माझ्यावर गारूड केले. त्यातून अनुभवलेले बामायना, नटवरी तराणा, चतुरंग आणि सरगमगीत अशा काही वेगळ्या प्रकारांना माझ्या मैफिलीत नेहमीच स्थान असते. मैफिलींमधील अनुभवांच्या शिदोरीवर आत्मभान येत गेले. रागातील संकल्पना, तानेतील विविधता, तयारी, तीन सप्तकांत खर्ज, सा ते तारसप्तक, षड्जापर्यंत संपूर्ण स्वच्छ आवाज लागणे, रागाचे फक्त शास्त्र न मांडता सौंदर्य आणि भावात्मक भागाकडेही लक्ष देणे, ही तारेवरची कसरत मैफिलींनी दिली. त्यातही विविध परिस्थितीमधील वैयक्तिक सुख-दु:ख बाजूला ठेवून, ऐकायला येणाऱ्यांना फक्त आणि फक्त आनंदाचे निधानच मिळावे, ही मानसिकताही निर्माण करावी लागली. श्रोत्यांनी केलेल्या भरपूर कौतुकामध्ये आणि समीक्षक, टीकाकारांनी केलेल्या भरपूपर टीकेमध्येही स्वत:ची बुद्धी जागृत ठेवून फक्त 'स्वयम'चा आतला आवाज ऐकते आणि पाय जमिनीवर ठेवून कणखर वाटचाल करते. भारतात आणि भारताबाहेर विविध ठिकाणी केलेल्या गाण्याचे खूप सुरेख अनुभव आहेत. 'तानसेन' महोत्सवामध्ये, ग्वाल्हेरला शून्य डिग्री तापमान होते. आवाज बसला होता. अशा वेळी स्टेजवर हिटर लावून अचानक मोकळ्या आवाजात गाऊ लागले. तीन ताप असताना एकदम दमखमची २५ सेकंदांची तान गळ्यातून गेली, की फक्त गुरूजनांच्या आशीर्वादाची आणि रात्रभर प्राण कानात आणून ऐकायला बसणाऱ्या रसिकांच्या प्रेमाची आठवण येते. नवरात्र, कोजागिरी, दिवाळीचा माहोल म्हणजे संगीत रसिकांची पर्वणी. चार निरनिराळ्या गावी रोज रात्री प्रवास करून, पहाटे पाच वाजता गायला बसल्यावर रसिकांशी एकतानता साधली गेली, की जागरण, प्रवास या सगळ्याचा विसर पडून ब्रह्मानंदी टाळी लागते. पुणे-मुंबईचा रसिक निराळा, कर्नाटक, कोलकाता, दिल्ली निराळे, मध्यप्रदेशचा निराळाच. त्या त्या प्रदेशातील रसिकांची आवड, नाडी ओळखली, की त्यांच्याबरोबरचा संगीत प्रवास खूप छान आणि सुकर होतो. त्यातही नवीन पिढीमधील श्रोत्यांकरता काही विशिष्ट विषय घेऊन, थीम ठरवून कार्यक्रम, वाद्यसंगीत, नृत्याबरोबर गायकी सादर करणे, स्पीकमॅकेसारख्या संस्थांमार्फत शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने, कार्यशाळा घेणे हे उपक्रमही मी करते. प्रयोगशील, काळानुसार प्रवाही असण्यात मला काहीही गैर वाटत नाही. अमेरिका, जर्मनी, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश येथील श्रोत्यांचे अनुभव अविस्मरणीय होते. अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी शिकले. अजूनही ते माझ्याकडे ऑनलाइन शिकत आहेत. प्रगती करत आहेत. मी विद्यार्थ्यांसाठी सुव्यवस्थित अभ्यासपद्धती तयार केली. सुरुवातीच्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचे आवाज साधनेमध्ये नुकसान होऊ नये, हा त्यामागचा उद्देश. 'या हृदयीचे त्या हृदयी' जावे हा दुसरा उद्देश. रियाजाबरोबरच श्रोत्यांसमोर कला प्रस्तुती करायची संधी मिळावी, म्हणून मी त्यांना व्यासपीठ देणारी 'प्रेरणा' ही संस्थाही स्थापन केली आहे. अमेरिकेतील हेल्गा हिने प्रथमच भारतीय शास्त्रीय संगीत ऐकले. मल्हार राग ऐकून, 'तू पावसाला बोलावते आहेस का,' असे विचारावे, याला काय म्हणावे? युरोपमध्ये मी मारिओचे व्याख्यान घेत असताना, त्यांनी मला अजून दहा नवीन रागांचे विवेचन द्यावे, हे अविश्वसनीयच. ऑस्ट्रेलियामध्ये जुर्गेनने मला तबल्यावर साडेसात मात्रांची एक तास संगत करावी, यावरून भारतीय संगीताची पाळेमुळे जगभरात किती खोलवर पसरली आहेत, हे जाणवले आणि अभिमानाने ऊर भरून आला. दूरदर्शन, आकाशवाणी आणि निरनिराळ्या वाहिन्यांसाठी गाणे, सीडी आणि अल्बममध्ये गाणे, हे अनुभव मैफिलींपेक्षा अजून वेगळे आणि संपन्न करणारे. कमी वेळात जास्तीत जास्त मांडण्याची हातोटी यामुळे निर्माण झाली. त्यातून बुजुर्ग कलाकारांचे कौतुक वाट्याला आले, ते निराळेच. लता मंगेशकर यांच्या हस्ते 'भजनांजली' प्रकाशित झाली. गानसरस्वती किशोरी अमोणकर यांनी 'गुज ज्ञानियाचे' प्रकाशित करून शाबासकीबरोबर सांगीतिक परीक्षाही घेतली. त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले! हे अनुभव स्वर्गीय होते. कुंदगोळला 'सवाई गंधर्व महोत्सवा'मध्ये पं. गंगूबाई हनगळांनी मला गायला बोलावले होते. त्यावेळी माझे वय फक्त १४ होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी एका मैफिलीत त्यांच्या आधी एक तास गाण्याची सुवर्णसंधी देऊन आयुष्यभरासाठी पावती दिली. उस्ताद अली अकबर खांसाहेबांनी अमेरिकेमध्ये समोर बसून माझे गाणे ऐकले. पं. जसराज, बेगम परवीन सुलताना, डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वत:च्या संस्थांमध्ये गाण्यासाठी आमंत्रण दिले. 'सदाफुली' या अल्बमच्या निमित्ताने श्रीधर फडके यांनी वेगळा संगीत प्रकार हाताळण्याची संधी दिली. साक्षात स्वरसम्राट पं. भीमसेन जोशी यांनी 'रियाज करोगे तो राज करोगे,' असा सल्लाही दिला. आयुष्यात आणखी काय हवे? कोण, कोठून आले मी? गळ्यातील स्वरांमुळे संयोजक प्रेमाने, आग्रहाने बोलावतात. जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, महेश काळे, श्रीनिवास जोशी, शर्वरी जमेनीस अशा या पिढीतील कलाकारांबरोबरही सौहार्दपूर्ण सुंदर कार्यक्रम झाले. सतत लेखन करत गेले, त्यामुळेही विचार प्रगल्भ होत, अनुभवविश्व समृद्ध होत गेले. असे सर्वव्यापी, सर्वंकष अनुभव हे रागांचे आणि गुरूंचे. संगीतप्रकार, मैफिली, श्रोत्यांचे. संयोजक, विद्यार्थी, माध्यमे, बुजुर्ग कलाकार आणि सहकलाकारांचेही. (लेखिका शास्त्रीय गायिका आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट