लेडीज स्पेशलच्या या भागात चाकोरी बाहेरच्या विषयाला हात घातला आहे, तो म्हणजे 'ऑफिस वाइफ'. नोकरीच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांच्या पुढे-पुढे करणारीला, त्याची अति काळजी घेणारीला ऑफिस वाइफ असं म्हणतात. अशा वर्तनामागील मानसिकता आणि या विषयाचे कंगोरे आपण जाणून घेऊ या...
'याला आमच्या भाषेत ऑफिस वाइफ असं म्हणतात', सध्या गाजत असलेल्या नाटकाच्या जाहिरातीतील हा संवाद ऐकल्यावर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. ऑफिस वाइफ हा काय प्रकार आहे? या प्रश्नानं अनेकांच्या मनात घर केलं. नवरा-बायको एकत्र एकाच कंपनीत काम करत असावेत, म्हणून त्याला 'ऑफिस वाइफ' असं म्हणत असावं, असे अनेकांनी तर्क लावले. पण वाचकहो, तुमच्या विचारांचं चक्राची गती जरा कमी करा. ऑफिसमध्ये पुरुष सहकाऱ्यांच्या सतत पुढे-पुढे करणारी, त्याच्या बायकोसारखी काळजी घेणारी, सतत बॉसची हांजी हांजी करणारी स्त्री म्हणजे ऑफिस वाइफ.
स्वहितासाठी पुरुष सहकाऱ्यांशी लाडानं वागणारी ही फक्त स्त्रीच असते का? पुरुष मंडळी असं काही करत नाहीत का? असा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे. पण काय आहे ना आपल्याकडे दोषी बाईलाच ठरवलं जातं, म्हणून ऑफिस वाइफ हे जास्त अधोरेखित केलं जातं. 'येस बॉस' या चित्रपटामध्ये शाहरुख खानची भूमिका ही याच प्रकारात मोडणारी होती. पण लोकांच्या लक्षात राहते ती 'तुला पाहते रे' या मालिकेतील मायरा. याला आपल्याकडची मानसिकता कारणीभूत आहे.
घरवाली-बाहरवाली याप्रमाणे ऑफिसवालीला कॉर्पोरेट भाषेत 'ऑफिस वाइफ' असं म्हटलं जातं. अर्थात ही संकल्पना एखादीचं कौतुक करण्यासाठी नव्हे तर टोमणात्मक अर्थानंच वापरली जाते. आतापर्यंत या संकल्पनेचा विचार करताना अनेकांच्या डोळ्यासमोर बॉसची सेक्रेटरी किंवा पीए नक्कीच आली असेल. कारण बहुतांश केसेसमध्ये ऑफिस वाइफच्या भूमिकेत सेक्रेटरीच असते. या विषयासंबंधीचे इतर कंगोरे आणि असं वागण्यामागील मानसिकता जाणून घेऊ या.
मानसिकता काय?
नातं बहरु द्यायला दोन व्यक्तींमध्ये संवाद, शेअरिंग-केअरिंग आणि भावना-विचारांची देवाण-घेवाण होणं गरजेचं असतं. पण हे झालं नाही तर दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जातो. नात्याचं संगोपन करण्यासाठी काही उरलं नाही की त्या शुष्क नात्यातील गरज दुसऱ्या मार्गानं भागवली जाते. काही नाती शारीरिकरित्या जवळ आलेली असतात. पण जेव्हा काही नात्यांमध्ये मानसिक सहभाग वाढतो तेव्हा ऑफिस वाइफ हे नातं निर्माण होतं. नवरा किंवा प्रियकराकडून भावनिक गरज भागली नाही की दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जातो. अशात नोकरी करणाऱ्या मंडळींचा बराचसा वेळ ऑफिसमध्ये जात असल्यानं दुसरा पर्याय म्हणून ऑफिसकडे बघितलं जातं. हे फक्त स्त्रीकडूनच होतं असं नाही. पुरुषही अशा दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जातो, मात्र त्याबद्दल काहीच बोललं जात नाही. अशा नात्यात भावनिक मागण्या वाढल्या की गडबड होते. भावनिक गरज सोडली तर कित्येकदा नोकरीच्या ठिकाणी स्वहितासाठी किंवा फायद्यासाठीही असं केलं जातं. तर अनेक जण विरंगुळा म्हणून किंवा कॅज्युअल फलर्टिंग म्हणूनही अशा नात्यात गुंततात. हे असे प्रकार दिवसागणिक वाढणार असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात. तरुण मंडळींमध्ये 'फ्रेंड्स विथ बेनिफिट' हा प्रकार पाहायला मिळतो. ऑफिस वाइफ हादेखील त्यातलाच एक प्रकार आहे. फारच थोडे जण अशा नात्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात, असं तज्ज्ञ म्हणतात.
कारणं
भावनिक गरज भागवण्यासाठी
स्वहित
हेतू साध्य करण्यासाठी
आधाराची गरज
एका नात्यात भावनिक गरज भागली नाही की, दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जातो. ऑफिस वाइफ हा त्यातलाच प्रकार आहे. कधी भावनिक आधार मिळवण्यासाठी तर कधी फायद्यासाठी हे केलं जातं. यात चुकीचं असं काहीच नाही, पण दोघांमधील एकाच्या भावनिक मागण्या वाढल्या की, सगळीच समीकरणं बदलतात.
डॉ. आशिष देशपांडे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ
वाचक मैत्रिणींनो, 'ऑफिस वाइफ' या विषयाबाबतची तुमची मतं आम्हाला muntainbox@gmail.com या ई-मेल आयडीवर नक्की पाठवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट