कायद्याचं बोलणार आयएएस, आयपीएस होऊन देशाच्या प्रशासन व्यवस्थेत काही तरुणी आपला ठसा उमटवू पाहताहेत. आजच्या 'जागतिक महिला दिना'निमित्त, मूळची मुंबईकर आणि सध्या केरळमध्ये पोस्टिंग झालेल्या ऐश्वर्या डोंगरेशी (आयपीएस, एएसपी) 'मुंटा'नं संवाद साधत, देशाच्या प्रगतीविषयी तिच्या मनातल्या कल्पना जाणून घेतल्या. देशाच्या प्रशासन व्यवस्थेत काम करणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे. पण, आव्हान कितीही खडतर असो, ते स्वीकारुन आम्हाला बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी वाटचाल सुरू झालीय. युपीएससी झाल्यानंतर माझं पहिलंच पोस्टिंग झालंय ते केरळच्या तिरुवल्लम भागात. आम्हा तरुण मुलींच्या मनात देशाच्या विकासाचा ध्यास आहे. कोणत्याही प्रकारचं राजकारण, जाती-धर्मापलीकडे जाऊन प्रगतीच्या दिशेनं पाऊल टाकत पुढे जायचं आहे. देशाचा विचार करताना कायदा आणि सुव्यवस्थेला माझं सर्वोच्च प्राधान्य असेल. केवळ 'बोलाचीच कढी...' असं न करता आम्हाला तात्काळ निकाल दिसायला हवे आहेत. देशामध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी माझी संपूर्ण ऊर्जा मी पणाला लावतेय. जो बदल घडवायचा आहे तो साधासुधा नाही, तर परिणामकारक असायला हवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कामाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा लिंगभेद मी मनात ठेवत नाही. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना एका जबाबदार पदावर मी काम करतेय याचं पुरेपूर भान असतं. माझ्याकडे जेव्हा घरगुती हिंसाचाराची प्रकरणं येतात, तेव्हा मी महिला आहे म्हणून केवळ त्यांच्याच बाजूनं विचार करत नाही. दोन्ही बाजूंचा विचार करत, तटस्थ राहून मला ते प्रकरण हाताळायचं असतं. जेणेकरून कुणावरही अन्याय होता कामा नये. 'जागतिक महिला दिना'च्या निमित्तानं इथल्या शाळा-कॉलेजांमध्ये आम्ही काही खास कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांना फक्त मुलींनाच नव्हे, तर मुलांनाही आम्ही बोलावलं आहे. कारण महिलांच्या सुरक्षेचा विचार करताना फक्त मुलींशी संवाद साधण्यापेक्षा मुलांनाही त्यात सहभागी करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तसंच, कोणत्याही स्त्रीला अगदी निर्भयपणे पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली तक्रार नोंदवता आली पाहिजे असं वातावरण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. शब्दांकन - हर्षल मळेकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट