राम खरटमल सन १९२१मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लागला. या शोधामुळे पहिली मानवी वसाहत जगासमोर आली. अनेक सामाजिक, संस्कृतिक पुरावे जगासमोर आले. इ.स.पूर्व ३००० वर्षे जुनी असलेली ही संस्कृती. त्या उत्खननात साधारण १०.५ सेंटीमीटर उंचीचे ब्रांझ धातूचे पहिले स्त्री शिल्प जगासमोर आले. ते नर्तिकेचे असावे, असे मानले जाते; पण या शिल्पाला मी स्त्री अस्तित्व दाखविणारे पहिले शिल्प मानतो. ती ज्या आत्मविश्वसाने उभी आहे, त्यावरून तत्कालीन स्त्रीचा त्या संस्कृतीवर किती प्रभाव होता, ते दिसून येते. तिचा एक हात कंबरेवर आहे, तर दुसरा हात मांडीवर ठेवला आहे आणि तो हात कोपरापर्यंत काकणाने भरलेला आहे. तिची उभे राहण्याची ढब एकदम आत्मविश्वासाने भरलेली आहे. आजच्या मॉडेलही रॅम्प वॉकवर अशाच अविर्भावात उभ्या राहतात. या साधारण ४,५०० वर्षे जुन्या स्त्री शिल्पातील आत्मविश्वास, गर्व आणि तिच्यातील स्त्रीत्व, यांची दृश्यानुभूती मी माझ्या आजच्या स्त्री आकृतीबंधामधे पाहतो. आजची माझ्या आजूबाजूची स्त्री एवढ्याच आत्मविश्वासाने उभी असल्याचे जाणवते आहे. ती आजच्या युगातही कणखर आणि सौंदर्यांचे प्रतीक भासते. आद्य स्त्री नर्तिका शिल्पापासून आजतागायतची स्त्री मला तेवढ्याच आत्मविश्वासाने उभी असल्याचे जाणवते. हा विचार मी या चित्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नर्तिका शिल्प, हे स्त्री विषयीची पहिली तत्कालीन दृश्य अभिव्यक्ती असावी, जिला कोणतेही काल्पनीक ब्रीद किंवा उपमा लावता येत नाही. तशी आजची स्त्रीदेखील काल्पनीक ब्रीद व उपमांच्या पलिकडे गेलेली मला वाटते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट