अमित ढाणे आई हे या जगातील सर्वश्रेष्ठ नाते. त्यापेक्षा दैवत म्हणणे अधिक योग्य होईल. अशा या सुंदर विषयावर अनेक पद्धतीने भाष्य करता येते. साऱ्या जगानेच नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प अशा कलांतून आईची महानता दर्शविली आहे. खास चित्रकलेचा विचार केल्यास राजा रवी वर्मा यांचे नाव माझ्या डोळ्यासमोर येते. ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांचा ध्यास घेऊन त्यांनी स्त्री व्यक्तिरेखेला प्राधान्य दिल्याचे दिसते. तैलरंग कसे वापरावेत हेही त्यांनी भारतापुढे प्रथम मांडले. भारतभर किंवा जगभरातही फिरताना आई आणि मुले हे चित्र दिसते. मला भेटलेल्या आई आणि मुलीचे हे जलरंगातील चित्र मुलांना आईविषयी किती ओढ वाटते, याचे दर्शन घडविते. या चित्रामध्ये आईच्या सोबत मोठ्या विश्वासाने चाललेली ही चिमुकली आश्वासक वाटते. आईचा आधार तिला प्रचंड बळ देणारा आहे, हे जाणवते. हेच महिला दिनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आईच्या चेहऱ्यावरील भाव सौंदर्याच्या साऱ्याच व्याख्या ओलांडून जाणाऱ्या असतात. आईच्या चेहऱ्यावरील तोच पारदर्शकपणा दाखविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अंतिमत: हे सारे विश्व आईभोवतीच फिरत असते. सध्याच्या युगात विद्रुपता असली, तरी आपल्या देशात ते खोटेच ठरेल आणि सारे जग आपल्या संस्कारांचा खजिना स्वीकारेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट