Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मस्त राहा, स्वस्थ राहा, नाचत राहा...

$
0
0

नृत्य करणाऱ्या, नृत्याची आवड जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीला नृत्याने काय दिले? उत्तर अगदी सोपे आहे. प्रत्येक स्त्रीला या नृत्याने जगण्याचा, आनंदाचा मंत्र दिला आणि कसे जगावे याचे सूत्र, तंत्र शिकविले. आजच्या धावपळीच्या युगातील स्त्रीला नृत्यातील लय साधली, तिला जगण्याचीदेखील लय साधली. नृत्याने स्त्रीला सौंदर्य दिले, समाधान दिले, उत्तम प्रकृती, शारीरिक स्थैर्य दिले, मानसिक खंबीरता दिली आणि ऊर्जाही दिली.

नीलिमा हिरवे

नुकताच, आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन झाला. हा दिवस संपूर्ण जगात उत्साहाने साजरा केला जातो. स्त्री ही माता, ताई, आई, बहीण, सखी, प्रेयसी, अर्धांगिनी अशा कितीतरी भूमिका बजावते. या जीवनयात्रेच्या नाटकात, या रंगमंचावर एवढ्या भूमिका चोख बजावणारे हे महत्त्वाचे पात्र आहे. महिला दिन हा या सगळ्या भूमिकांमधून बाहेर पडून स्वत:साठी जगण्याचा दिवस असतो. होय मी स्त्री आहे, हे अभिमानाने मिरविण्याचा हा दिवस. आपल्यातील सक्षमतेला, धैर्याला, शौर्याला, स्वाभिमानाला अजून थोडे जागे करण्याचा दिवस.

आजच्या युगातील महिला ही पुरुषांच्या बरोबरीने जीवनाची घोडदौड करते आहे. मी खास आहे आणि कायम खासच राहणार आहे, याच आनंदाचा उत्सव, जल्लोष करण्याचा तो खास दिवस. महिला दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्रे, बातम्या, विविध संस्था, सांस्कृतिक कार्यक्रमांतून फक्त स्त्री, स्त्री आणि स्त्रीचाच उत्सव झाला आहे.

मी एक कथक नृत्यांगना आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या क्लासच्या मुलींसाठी काहीतरी करू, हा विचार राहून राहून मनात येत होता. काय करावे, ते मात्र सुचत नव्हते. अचानक वाटले, की क्लासच्या वेळेत या मुलींनाच बोलते करू. या सगळ्या नृत्य का शिकत आहेत, यावर गप्पाष्टक रंगवू. याची सुरुवात १ मार्चला केली. भरभरून गप्पा, प्रतिक्रिया यांनी सत्र रंगले. माझ्याकडे काही महिलादेखील नृत्य शिकतात. दिवसभराची सारी कामे संपल्यावर, नृत्याच्या क्लासला आल्यानंतर सारे कसे विसरायला होते, याविषयी खूप सांगितले. घरी परतताना या साऱ्या गप्पा मनात होत्याच. त्याचवेळी माझ्या मनाचा माझ्यातील स्त्रीशी संवाद सुरू झाला. पुनवडी ते पुण्यनगरी या प्रवासाचा. आज या पुण्यनगरीतील महिला स्वतंत्र विचारांची आहे. आजच्या प्रत्येक स्त्रीला आपल्या भूमिकांविषयी, त्या निभावण्याविषयी आत्मविश्वास आहे. चूल आणि मूल याच्या पलीकडे जात ती प्रबळ झालेली आहे.

स्त्रीमधील ऊर्जा तेवत ठेवण्याचे श्रेय तिला जन्माला घातलेल्या कुटुंबातील वातावरणापासून, ती काम करत असलेल्या क्षेत्रातील बऱ्या-वाईट अनुभवांनाही आहे. साधारण १९४६-४७चा काळ. तेव्हा स्त्री आणि नृत्य हे दोन शब्द एकत्र म्हणणेही पाप होते. 'नृत्य हे खानदानी, घरंदाज महिलांसाठी नाहीच,' असा विचार प्रबळ होता. जन्माला आल्यानंतर प्रत्येक मुलीच्या मनावर तो कोरला गेला असावा. आज ६०-७० वर्षांनंतर चित्र अगदी वेगळे आहे. माझ्याकडे वय वर्षे सहा ते ६०पर्यंतच्या वयोगटातील महिला नृत्याचे धडे घेत आहेत. शाळा, महाविद्यालय, गृहिणी, नोकरदार अशा चार टप्प्यांतील स्त्रियांच्या जीवनाची कसरत आणि त्यातून नृत्यातील आनंद उपभोगण्यासाठी केलेली धडपड मी खूप जवळून अनुभवते आहे.

आज पुण्यामध्ये नृत्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या शेकडोने आहे. काही नृत्यांगना आहेत, तर काही नृत्यशिक्षिका आहेत. नृत्य हे आनंदाचे माध्यम, उत्तम व्यायाम म्हणून शिकणाऱ्यांची संख्या तर हजारोने आहे. आज नृत्य हे व्यवसायाचे महत्त्वाचे साधन आणि यशस्वी माध्यम बनले आहे. त्यामुळे नृत्यवर्गांची संख्याही मोठी आहे. हे क्षेत्र एवढे समृद्ध करण्यामागे अनेक कलाकारांनी आपले आयुष्य सपर्पित केले आहे. ज्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची चोरी होती, त्याच काळात रोहिणी भाटे हे नाव नृत्यासाठी धडपड करत होते. लकडी पुलाच्या डेक्कन जिमखान्याच्या दिशेच्या जवळ एका दुमजली इमारतीत नृत्याचा एकुलता एक क्लास निघाला होता. वयाच्या अठराव्या वर्षी रोहिणीताईंनी तो सुरू केला होता. हा वसा इतिहास बनून गेला. घरोघर जाऊन, नृत्याचे महत्त्व पटवून देऊन, त्या मुलींना शिकण्यासाठी घेऊन येत. नृत्यवर्ग झाला, की पुन्हा घरापर्यंत सोडण्यास जात. रोहिणीताईंच्या नृत्यदर्शनात सात्विकता होती. या सात्विकतेनेच नृत्यकलेतील उदात्ततेकडे पाहण्याची नजर प्रेक्षकांना दिली. पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य माझ्या मनात घर करून आहे, 'कलेचे चारित्र्य सांभाळण्याची जबाबदारी कलावंताची असते. नृत्यातील एखाद्या सुकृतीचे लहानशा, चुकीच्या हालचालीमुळे कुरूप, कलाहीन विकृतीत रूपांतर होऊ शकते. ते न होऊ देण्याची दिशा चांगले गुरू देतात.' हा आणि हाच ध्यास रोहिणीताईंनी आयुष्यभर सांभाळला.

मला त्यांचा प्रत्यक्ष सहवास कधी लाभला नाही; पण कार्यक्रमातील त्यांच्या दर्शनानेही मी भारावून जायचे. त्या काळात त्यांच्या अथक कथक या ध्यासामुळेच समाजातील सर्व स्तरांवरील स्त्रियांपर्यंत नृत्य पोहोचू शकले. हा वसा त्यांच्या शिष्यांनी त्याच ध्यासाने जपला. प्रभा मराठे, सुजाता नातू, मनीषा साठे, सुचेता भिडे, शमा भाटे अशा एक नव्हे अनेक व्यक्तिमत्वांनी नृत्याचा प्रसार, प्रचार करण्यासाठी आयुष्य पणाला लावले आहे. एका मुलीला रंगमंचावर आणणे अवघड होते, अशा पुण्यामध्ये आज 'नृत्योत्सव'सारख्या कार्यक्रमातून १,२०० शास्त्रीय नृत्य कलाकार सहभागी होत आहेत. कथक, भरतनाट्यम, ओडीसी, कुचिपुडी या चार शास्त्रीय कला पुण्यात नांदत आहेत. त्याबरोबरीने व्यायाम, रिलॅक्सेशनसाठी नृत्य या नव्या युगाच्या कल्पनेतून जीममध्येही एरोबिक्स, झुंबा, साल्सा, हिपहॉपसारख्या पाश्चिमात्य नृत्यवर्गांनाही महिलांची तेवढीच गर्दी दिसते. याही पुढे जाऊन कलाकारांचे एकत्रिकरण होऊन कार्यक्रम करण्याचे प्रमाण पुण्यात वाढते आहे. मनीषा साठे, शमा भाटे यांच्या पुढाकाराने नुकतेच सर्व नृत्यगुरू, कलाकार, विद्यार्थिनी यांना एकाच छताखाली आणणाऱ्या 'शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थे'ची स्थापना झाली आहे.

आज मिरवणुकीपासून ते आयटी कंपनीतील मेगा इव्हेंट पार्टीपर्यंत सर्व स्तरावर मनमोकळेपणे नाचणारी स्त्री सहज पाहायला मिळते आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक लोकनृत्य जपणाऱ्या स्त्रियांना अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांतून जावे लागले आहे. त्यांच्या कलेवरील प्रेमामुळेच लोकनृत्य आज आपले स्थान टिकवून आहे. विचारांचे असे अनेक तरंग मनात निर्माण होत असलेल्या नादावर लय पकडून जणू नाचत होते. मी या काळातील स्त्री आहे, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो; कारण आज माझे विचार, कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. नृत्य करणाऱ्या, नृत्याची आवड जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीला नृत्याने काय दिले? उत्तर अगदी सोपे आहे. प्रत्येक स्त्रीला या नृत्याने जगण्याचा, आनंदाचा मंत्र दिला आणि कसे जगावे याचे सूत्र, तंत्र शिकविले. आजच्या धावपळीच्या युगातील स्त्रीला नृत्यातील लय साधली, तिला जगण्याचीदेखील लय साधली. नृत्याने स्त्रीला सौंदर्य दिले, समाधान दिले, उत्तम प्रकृती, शारीरिक स्थैर्य दिले, मानसिक खंबीरता दिली आणि ऊर्जाही दिली. निखळ आनंदी वृत्तीने अनुभवलेले नृत्य तणाव नामक खलनायकाला नक्कीच दूर ठेवते.

सुंदर जीवनाला अधिक सुंदर, लयदार बनविण्याचे काम नृत्य कलेने केले. आज त्यामुळे मी या आनंदाचा परिपूर्ण अनुभव घेऊ शकते आहे. महिला दिनाच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि नाचत राहा. आपल्या हरवलेल्या आनंदाला जागे करण्यासाठी, मनाशी सुंदर संवाद साधण्यासाठी.

(लेखिका कथक नृत्य कलाकार आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>