भास्कर सगर चित्रकाराच्या कलेची प्रेरणा कोण असेल, तर ती आहे स्त्री! स्त्रीला निसर्गत: अप्रतिम, अलौकीक सौंदर्य लाभलेले आहे. भावसुलभ आविष्कार तर तिला दैवाने जन्मजात बहाल केलेले आहेत. त्यातील कलाकारांना मोहविणारी तिची लयदार शरीर रचना, आकर्षक बांधा, एकंदरीतच तिच्या अप्रतिम सौंदर्याने चित्र-शिल्पकारांना भुरळ पडली नाही, तरच नवल! म्हणूनच भारतीय संस्कृतीत प्राचीन वास्तू, मंदिरांतील स्त्री शिल्पांचे स्थान अढळ आहे. तेच आपल्या संस्कृतीची शोभा वाढवित आहेत. स्त्रीचा रंग गोरा असो वा सावळा, तिची व्यक्तिरेखा चित्रांत खुलून दिसणार म्हणजे दिसणार. म्हणून तर जगप्रसिद्ध चित्रांत स्त्री चित्रे जास्त विख्यात आहेत. मोनालिसा, गर्ल विथ अ पर्ल इअरिंग, ऑलंपिया तसेच राजा रवी वर्मांच्या पौराणिक चित्रांतील व्यक्तिरेखा अशी कितीतरी उदाहरणे पाहता येतील. स्त्रीचे रूप, सौंदर्य हे पाण्यासारखे पारदर्शी असते. ते कोणत्याही रंगात रंगवा आणि कोणत्याही वस्त्रप्रावरणात दाखवा, ते खुलून दिसतेच. पांढऱ्या रंगात ती विरक्त, त्यागी, अभागी दिसेल, तर गुलाबी रंगात प्रेमसुलभ, तरल भावनेच्या हिंदोळ्यात दिसेल, हिरव्या रंगात ती लाजरीबुजरी, नवनवेली नवरी दिसेल, तर निळ्या रंगात सुरक्षितता, जबाबदारी, आत्मनिर्भरता, दृढता तिच्यात जाणवेल. एखाद्या भडक रंगातून ती आपली नाराजी, संतापही व्यक्त करेल. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सौंदर्यशास्त्र, शरीरशास्त्र शिक्षणाचा एक भाग म्हणून मॉडेल होऊनही बसेल. एवढ्या विविध रूपांत फक्त स्त्री असू शकते. स्त्रीकडे पाहण्याचा हा एक कलात्मक दृष्टिकोन होता. आजची स्त्री ही समाजात आदर्श नारी म्हणून उदयाला येत आहे. चूल आणि मूल एवढेच जिच्या नशिबी होते, ती आता आकाश भरारी घेते आहे. तिच्यामुळे आदर्श समाज घडतो आहे, याचा साऱ्यांनाच खूप अभिमान आहे. स्त्री कर्तृत्वास सलाम!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट