बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. शर्विल करजगी या चिमुकल्याच्या बाबतीत असंच म्हणता येईल. अवघा दीड वर्षाचा असल्यापासून बाबा आमटे यांचा हा पणतू खूप सुंदर चित्रं काढतो. आता तो पाच वर्षांचा असून त्याची चित्रकला आणखी विकसित होतेय. या वयात त्याची ब्रशवर असलेली हुकूमत पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटतं. योग्य रंगसंगती निवडण्यापासून ते कागदावर उत्तम प्रकारे चितारण्यापर्यंत त्याचं कौशल्य पाहायला मिळतं.
शर्विल करजगी हा बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा मुलगा. तो दीड वर्षांचा असताना आईनं चित्रकार आभा भागवत यांच्याशी त्याची ओळख करून दिली. आभा डॉ. शीतल आमटे-करजगी यांना नेहमी सांगत की, 'लहान मुलांना रंगांमध्ये मनसोक्त न्हाऊ द्यायचं. म्हणजे त्यांना विविध रंग छटा आणि पोत समजतात'. त्यांच्या म्हणण्यानुसार डॉ. शीतल यांनी त्याला रंग आणून दिले. प्रथम बोटांनी चित्रविचित्र आकार रंगवता-रंगवता आकर्षक चित्रं आकार घेऊ लागली. आता तो अॅक्रॅलिक रंगांनी चित्र रंगवतो. पेन्सिलीशिवाय बोटांनी, चाकू वापरून, रंग ओतून, पानांचे ठसे आणि स्टेन्सिलचा वापर करून चित्र साकारतो.
शर्विल सध्या आनंदवनात राहत असून त्याच्या सवंगड्यांबरोबर तासनतास चित्रं रेखाटण्यात रमतो. 'मी कधी-कधी दिवसाला चार-पाच चित्रं काढतो. मला डायनोसॉर खूप आवडतो. मी सध्या विविध प्रकारे तो काढून बघतोय. माझ्याबरोबर कधी-कधी माझी आईसुद्धा चित्र काढायला बसते', असं छोटा शर्विल आनंदानं सांगतो. 'आम्हाला बऱ्याचदा एकमेकांकडून प्रेरणा मिळते. माझ्या पेंटिंग्सवर तो मला नियमित फीडबॅक पण देतो. त्याची पेंटिंग्स अनेक जणांनी नेऊन घरी लावली आहेत. मी आर्ट थेरपी कार्यशाळा घेते तेव्हा त्यात शर्विलही सहभागी होतो', असं डॉ. शीतल सांगतात. चित्रकलेशिवाय शर्विलला झाडं लावायलाही आवडतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट