Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

संसाराचा छंद नकोसा हा झाला

$
0
0

भक्तीचा ध्यास घेऊन जगलेल्या निर्मळेचे मागणे लौकीकाहून मोठे आहे. हे मागणे उरी-पोटी घेऊन जगणे इतकेच निर्मळा जाणून आहे. त्यामुळे शुद्ध-अशुद्धतेच्या समाजनिर्मिती कल्पना ओलांडून जाणारे सर्वव्यापी तत्व स्वत: अनुभवणे, जाणून घेणे तिला महत्त्वाचे वाटते.

प्रा. रूपाली शिंदे

चोखोबा, कर्ममेळा आणि सोयराबाई या तीन भक्तांनी जन्मजात अस्पृश्यतेचे दु:ख विठोबापाशी मांडलेले आहे. या तिघांचीही सामाजिक विषमता जाणून घेण्याची आणि ती व्यक्त करण्याची समज वेगळी आहे. चोखोबा त्यांचे दु:ख मांडताना समाजात येणारे अनुभव थेट मांडतात. त्याचबरोबर भक्त म्हणून असलेल्या त्यांच्या मर्यादा, निरूपायही मांडतात. चोखोबा प्राणसखा विठोबापाशी वाट्याला येणारे सामाजिक विषमतेचे, मानहानीचे दु:ख व्यक्त करतात.

एकासी कदान्न एकासी मिष्टान्न।

एका न मिळे कोरान्न मागतांची।

एकासी वैभव राज्याची पदवी।

एक गावोगावी भीक मागे।

हाचि न्याय तुमचे दिसतो की घरी।

चोखा म्हणे हरि कर्म माझे।।

चोखोबांच्या दु:खाच्या जाणीवेमध्ये संवेदनशीलता, भावनानिष्ठता, खंत, व्याकूळता जास्त आहे. खोलवर जाणवलेल्या वेदनेचा ठणका आणि ते सारे परोपरीने सोसणारे संवेदनशील मन, चोखोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दु:ख सोसूनही मागे उरलेली, दु:खापेक्षा काकणभर सरस झाली होती ती कोमलता, ऋजुता. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या शब्दकळेने जपले होते वेदनेच्या तळाशी असलेले मार्दव. ज्ञानेश्वर वेदनेच्या साहण्यातून माणसाच्या मनातील ऋजुतेला, मार्दवतेला साद घालणारे महाकवी होते. नामदेव आर्त भावनेतील मधुरता, माधुर्य जागविणारे, भक्तीमधील माधुरी जाणणारे भाव कवी होते. एकनाथांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये संयत वृत्तीला, समन्वयशीलतेला आणि समतोल साधण्याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे दिसते. त्यामुळे एकनाथ समतोल, संयत वृत्तीचा ध्यास घेऊन जगणारे कवी होते. तुकोबांनी व्याकूळता, विकारवशता, उद्रेक आणि विद्रोहाची दाहकता सर्वस्व गहाण ठेवून अनुभवली. तुकोबांची भक्ती जीवाची बाजी लावणारी, स्वत:ला खंक करून टाकण्यासाठी सिद्ध झालेली, प्राणाहुती देणारी होती. तिला समर्पणाची आग ठाऊक होती.

समर्पणातील धग आणि अर्पणशक्तीतून लाभणारी निस्सीम शांतता अनुभवणारी दुर्मीळ भक्ती तुकोबांनी केली. 'चणे खावे लोखंडाचे', 'भक्ती ही सुळावरची पोळी आहे,' असे तुकोबा म्हणत, तेव्हा अर्चनाशक्तीचा विकास अर्पणापर्यंत करण्याचे कठोर आव्हान पेलणे त्यांना अपेक्षित असते. भक्ती ही भक्ताने आपली आपण घेतलेली सत्वपरीक्षा आहे, हे तुकोबा वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. विश्व-ईश्वर-भक्त यांच्यातील सत्तासंबंधही तुकोबा स्पष्ट करतात. अंतिमत: भक्ताची आत्मसत्ताच महत्त्वाची आहे; कारण भक्तीमध्ये आत्मतत्त्वाचा विकास करणे आणि होणे ही मानवी कृती किंवा आचरण महत्त्वाचे आहे.

आता या पार्श्वभूमीवर चोखोबा यांचे समाजरचनेतील जन्मसिद्ध स्थान, त्यांना समूह जीवनामध्ये, लोकांच्या आदान-प्रदानातून कसे अनुभवास येते, हा अनुभव मांडतात. बंदित अशा जातीसंस्थेच्या अंतर्गत जगण्यातून होणारी 'मी कोण आहे,' ही आत्मतत्त्वाची जाणीव चोखोबा व्यक्त करतात.

नाही देह शुद्ध याति अमंगळ।

अवघे वोंगळ गुण दोष।।

करूं जाता विचार अवघा अनाचार।

आणिक प्रकार काय बोलू।।

वाणी नाही शुद्ध धड न ये वचन।

धि:कारिती जन सर्व मज।।

अंगसंग कोणी जवळ न बैसे।

चोखा म्हणे ऐसे जिवित माझे।।

बंदिस्त जातीसंस्थेच्या उतरंडीतील आपण तळातले मडके आहोत. अस्पृश्य असल्यामुळेच वाट्याला येणारी तुच्छता, हेटाळणी याचा विचार चोखोबा कसा करतात? तर ते देह शुद्ध आहे; पण याति अमंगळ आहे, असा देह आणि जातीचा स्वतंत्र विचार करतात. देहाला चिकटलेली अमंगलतेची जाणीव ही जातीसंस्थेची देणगी आहे आणि म्हणून 'अवघे वोंगळ गुण दोष.' जातीच्याच चष्म्यातून पाहिले, तर मग अवघे ओंगळच दिसणार. गुणही आणि दोषही. मग चोखोबा निष्कर्ष काढतात, 'अवघा अनाचार'. यापेक्षा वेगळे काही बोलण्याची गरजच नाही. चोखोबांनी देह आणि शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पना यांची फारकत केलेली आहे. या दोन गोष्टी स्वतंत्र, निराळ्या आहेत, हा जो निष्कर्ष नोंदविलेला आहे, तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो. बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी निरूपण केलेल्या आणि समाजात रुजविलेल्या भक्तिप्रवण कर्मयोगातून चोखोबांची विचारदृष्टी घडलेली आहे. नामदेवांनी केलेली 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।' ही प्रतिज्ञा चोखोबांच्या विचारसरणीमुळे फळाला आहे. अर्थात, त्यापूर्वी नामयाची दासी जनीने, नामदेवांच्या भक्तीचा भक्तिनिष्ठ कर्मयोग आत्मसात केला होता, हेदेखील विसरून चालणार नाही. त्यामुळे चोखोबा घडण्यास ज्ञानोबा-नामा आणि जनीचे 'जीवितऋण' हे प्रबळ कारण आहे. असो, तरीही चोखोबा देह आणि अस्पृश्यतेची कल्पना यांची ताटातूट करतात. हे धाडस खास त्यांचेच.

चोखोबा 'वाणी नाही शुद्ध धड न ये वचन' या स्वत:च्या मर्यादांबद्दल बोलतात. हे आणखी नवल! त्यानंतर म्हणतात, 'धि:कारती जन सर्व मज'. चोखोबांना स्वत:च्या उणिवांची झालेली जाणीव ते नम्र आणि स्पष्टपणे मांडतात. चोखोबा जातीशी जोडलेली स्वत:ची सामाजिक ओळख कशा प्रकारे स्वीकारतात? या समाजाने दिलेल्या जातीनिष्ठ अस्मितेपासून स्वत:ची सोडवणूक कशी करून घेतात? भक्त असण्याचे, मनाचे-जाणीवांचे स्वातंत्र्य अर्थात आत्मस्वातंत्र्य कसे प्रस्थापित करतात, हे त्यांच्या अभंग रचनेतून शोधले पाहिजे. जातिनिष्ठ ओळखीशी व्यवसाय आणि समूह जीवनात जोडलेले असणे अपरिहार्य आहे आणि असते. जातिनिष्ठ ओळख आत्मस्वातंत्र्याच्या बळावर पुसता येते; पण कायमस्वरूपी नष्ट करता येत नाही, याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. त्यांनी ती अनेक ठिकाणी व्यक्तही केलेली आहे.

चोखामेळा, कर्ममेळा, बंका महाराज यांनी अनुभवलेली समाजनिर्मित जन्मसिद्ध अस्पृश्यता आणि त्यावर भक्तीबळाने केलेली मात हा मराठी संतसाहित्याचा एक भाग आहे. त्याचा अभ्यासकांनी भरपूर अभ्यास केलेला आहे; पण स्त्रीचे समाजजीवनातील स्थान तथाकथित अस्पृश्याहून आणखी उपेक्षित. सर्व जाती-धर्मातील स्त्री दुय्यम आणि नगण्य असा भेदमूलक दृष्टिकोन, हे समाजजीवनाचे वैशिष्ट्य असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर भक्तश्रेष्ठ निर्मळा यांचे आज उपलब्ध असलेले चोवीस अभंग पाहिले, तर त्या अभंगरचनेमध्ये यातीहीन असणे कुठेच अधोरेखीत केलेले नाही. अस्पृश्यतेचे क्लेशदायक अनुभव मांडण्याच्या फंदात निर्मळाबाई का बरे पडल्या नाहीत?

या प्रश्नाचे उत्तर बंका महाराजांच्या अभंगरचनेत सापडते; तसेच ते निर्मळाबाईंच्या रचनेतही समाविष्ट आहे. बंका महाराजांनी चोखोबांच्या घरी पाहुणा होऊन भेटीला गेलेल्या विठोबाचे प्रसंगचित्र रेखाटले आहे. या पाहुणेऱ्या विठोबाला नम्रपणे वंदन करणाऱ्या, 'घालिती लोटांगण जीवेभावे' असा विनम्र, जिव्हाळ्याचा नमस्कार करणाऱ्या निर्मळा-सोयरा यांचे चित्रण बंका महाराजांनी केले आहे. मुळात निर्मळाबाईंनी 'मज नामाची आवडी। संसार केला देशधडी।' असा बंडखोर निर्णय घेतल्याचे जाहीरही करून टाकले आहे. त्यांना स्त्री असणे, उपेक्षित असणे या देहनिष्ठ मर्यादा ओलांडून जाणाऱ्या भक्तीभावाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांना भक्त म्हणून जगायचे आहे. त्यांना लौकीक संसारात चारचौघांसारखे आयुष्य जगायचेच नाही. त्यामुळे जगायचे कशासाठी, तर

विठ्ठल नाम मंत्र जपे।

नाही आणिक साधन।

सदा गाय नारायण।

नामस्मरण करीत जगणे।।

हेच जीवीचे जीवित असल्यामुळे स्वाभाविकच निर्मळाबाई संसार, समाज, इतर लोक यांनी दिलेल्या सुख आणि दु:खाबाबत निरिच्छ राहिल्या. म्हणूनच त्या म्हणतात,

नाही मज आशा आणिक कोणाची।

स्तुती मानवाची करूनी काय।।

काय हे देतील नाशिवंत सारे।

यांचे या विचारे यांसी न पुरे।।

निर्मळाबाईंना मानवाने केलेल्या स्तुती अथवा निंदेचे, सुख-दु:खाच्या जाणीवांचे नाशवंत असणे समजले होते, असे म्हणता येते. त्याचबरोबर 'यांचे या विचारे यांसी न पुरे,' हे माणसाचे अपुरेपणही त्यांना जाणवले होते.

ऐसे ज्याचे देणे कल्पांती न सरे।

तेचि एक बरे आम्हालागी।।

असे त्या म्हणतात. निर्मळाबाई माणसांकडे, समाजाकडे काही मागतच नाहीत.

संसाराचे कोण कोड।

नाही मज त्याची चाड।

एका नामेचि विश्वास।

दृत घालोनिया कांस।।

असे नामस्मरणाचे गाणे गात बाईंना जगायचे आहे. गुरू आणि बंधू चोखामेळा यांनी ही वाट त्यांना दाखविली आहे, 'नाम गाये अहर्निशी। तेणे संसार सुखाचा। इह परलोक साचा।'

संसाराचा छंद नकोसा हा झाला।

त्यापेक्षा परमार्थ भला संतांसंगे।।

असे वाटत असल्यामुळेच संसारातील रस, गोडी आटली आहे. म्हणून मग 'गोडाचे जे गोडु ते लागे कडु' असे वाटते आहे. निर्मळाबाई अखेरीस विठोबाला प्रेमाने; पण निर्वाणीचा इशारा देतात,

निर्मळा म्हणे आता तारा अथवा मारा।

तुमचे तुम्ही सारा बोझे आता।।

भक्तीचा ध्यास घेऊन जगलेल्या निर्मळेचे मागणे लौकीकाहून मोठे आहे. हे मागणे उरी-पोटी घेऊन जगणे इतकेच निर्मळा जाणून आहे. त्यामुळे शुद्ध-अशुद्धतेच्या समाजनिर्मिती कल्पना ओलांडून जाणारे सर्वव्यापी तत्व स्वत: अनुभवणे, जाणून घेणे तिला महत्त्वाचे वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>