Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

रांगणारे पिल्लू

$
0
0

रांगणाऱ्या पिल्लाची गोष्टच वेगळी असते. घरातील आई आणि इतर सारे कधीही पळत सुटण्याच्या तयारीत असतात. घरातील साऱ्यांना पळविण्याचा तो निरागस आनंद ही पिल्ले मनापासून घेत असतात. वस्तू उलथ्यापालथ्या करणे, जमिनीवर ओतणे, तोडणे हे नियमितपणे सुरू असते.

पल्लवी अकोलकर

त्याचे वय किती? साधारणपणे ८ ते १० महिन्याचे. त्याचे काम काय? वाट दिसेल तिकडे रांगत सुटणे. असे पिल्लू जेव्हा जेव्हा पलंगावर झोपते, तेव्हा त्याच्या आईचे पहिले काम काय, तर पिल्लू झोपल्यानंतर त्याच्या सगळ्या बाजूने उशा-तक्के लावून ठेवणे.

का?

कारण अर्थातच ते खाली पडू नये म्हणून. आईचे दुसरे काम काय? आपले पिलू रांगत किंवा सरकत पलंगाच्या कडेपर्यंत तर आलेले नाही ना, याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे. बरे का मंडळी; पण एवढी सगळी काळजी घेऊनही त्या पिल्लाच्या अचानक ओरडण्याच्या आवाजावरून बेडरूमकडे धावत पळत जाणाऱ्या त्याच्या आईला अंदाज आलेला असतोच, की तेथे नेमके काय घडलेले आहे. 'ओ...ले माझ्या शोना...' म्हणत तिला त्याला जमिनीवरून उचलून घ्यावे लागते.

किती छान दिवस असतात ना ते; पिल्लू खाली पडू नये; म्हणून पलंगाच्या अवती भोवती उशा लावून ठेवण्याचे, जमिनीवरून रांगत येणाऱ्या पिल्लाला उचलून घेण्याचे, ते रांगत असताना त्याच्या मार्गात कोणतीही बारीकसारीक वस्तू येऊ न देण्याचे आणि फरशी अगदी स्वच्छ ठेवावी लागण्याचे. हो, या वयाच्या पिल्लांच्या घरातील फरशी अतिशय स्वच्छ ठेवावी लागते. नाही तर मग फरशीवर पडलेले त्याच्या तोंडात गेलेच म्हणून समजा.

प्रश्न : काय काय जाऊ शकते त्याच्या तोंडात?

उत्तर : काहीही. काहीही म्हणजे अगदी काहीही.

तोंडात काय घालायचे, काय नाही, यात रांगणारे पिल्लू अजिबातच भेदभाव करत नाही. अहो, कुलूप उघडायच्या चावीएवढे चवदार तर काहीच नसते त्याच्या दृष्टीने.� एवढेच काय तर देवघरातील बाळकृष्ण पळवायलाही ते कमी करत नाही. परवाच मैत्रिणीने सांगितले, की तिने तिच्या लेकराला दारातील पायपुसणे चोखताना रंगेहाथ पकडले. त्याचे काय झाले, पाहुणे जेवायला यायचे म्हणून मैत्रीण स्वयंपाकघरात अडकलेली आणि बाहेर तिचे लेकरू दारातील पायपुसणे चोखत पाहुण्यांच्या स्वागताला तयार! लक्ष तरी किती ठेवायचं सांगा त्याच्याकडे? बरे बदडताही येत नाही असल्या वयाच्या मुलांना.

भारीतील रंगीत खेळणी टाका तुम्ही या अडगुल्या-मडगुल्यासमोर. ते म्हणेल घरात चपला-बुट, कांदे-बटाटे, भांडी-कुंडीसारख्या गोष्टी असताना, कशाला महगड्या खेळण्यात पैसे घालवतात आपले आई-बाप? आता कल्पना करा, तुमचे पिलू रांगत रांगत शेजारच्या खोलीत गेलेले आहे. गंमत म्हणजे पाच-दहा मिनिटांनी तुमच्या लक्षात येते, की त्या खोलीतून कसलाच आवाज येत नाही. मग काय बिघडले? काय बिघडले? अरे देवा! धावा... पळा..;

कारण ही शांतता तर फारच भयानक. अशावेळी त्या खोलीत धावत जाऊन बघण्याचा तुमचा वेग खूपच जोरात असायला हवा.

ओह डिअर! तुम्हाला थोडासा उशीरच झालेला आहे.

रांगत रांगत खोलीत गेलेल्या पिल्लाने तोपर्यंत तेलाची बाटली किंवा पावडरचा डबा, व्हिक्सची डबी किंवा एखादी औषधाची ट्यूब, काजळाची अथवा कुंकवाची डबी आपल्या इवल्याशा हाताने उघडून, जमिनीवर उपडी केलेली आहे. कसे कळत नाही तुम्हाला, की त्या सांडलेल्या पदार्थाने जमीन सारवताना त्याला किती मज्जा येते. खासकरून तो त्याच्याच शरीरातून निघालेला द्रव पदार्थ असेल, तर विचारायलाच नको. त्यात थपथप हात मारण्याएवढे सुख तर कशातच नाही. अशावेळी त्या पाकातल्या गुलाबजामला उचलून बाथरूमकडे धाव घेण्याशिवाय मात्र तुम्हाला पर्यायच राहत नाही.

या धावाधाव प्रक्रियेत तुमचा अर्धा तास सहज गेलेला असतो आणि त्याला कारणीभूत असलेले तुमचे पिलू मात्र जसे काही घडलेच नाही, इतक्या साळसुदपणे (भलत्यावेळी) स्वच्छ अंघोळ करून, तुमच्या मांडीवर बसलेले असते.

पुढचा दिवस उजाडला, की परत 'नया दिन नयी रात और नये कारनामे शुरू!'

दिवस कुठे उगवतो आणि कुणीकडे मावळतो समजतही नाही, असा हा काळ. या वयातल्या गोडूल्याचे एकेक कारनामे बघून सरळ टीव्हीचा रिमोट घ्यावा आणि दोन मिनिटे याला 'पॉज' करून ठेवावे, असे दिवसातून किमान शंभरवेळा तरी तुमच्या येत मनात असते. घरात तुम्ही त्याच्याबरोबर एकट्या असताना, तुम्हाला निसर्गाची हाक ऐकू आल्यास तर नक्कीच. किती मजेचे दिवस असतात ना ते. त्या दिवसांत टीव्हीच्या रिमोटचा उपयोग त्यांना झटक्यात मोठे करून टाकण्यासाठीही व्हावा, असा दुष्ट विचार कित्येकदा तुमच्या मनात येऊन गेलेला असतो. खरेच ही पिल्ले मोठी होऊन, आकाशात भरारी घेण्याच्या बेतात असतात तेव्हा? अशावेळी मात्र त्यांच्या रांगण्याच्या वयातील जुनी छायाचित्र हातात घेऊन, त्या छायाचित्रांत कसे शिरता येईल, याचा तुम्ही विचार करत असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>